वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
उद्योग मंथन : भारतीय उद्योग क्षेत्राची उत्पादकता आणि दर्जा यांना प्रोत्साहन देण्यासाठी संबंधित मुद्यांवर आधारित केंद्रिभूत वेबिनार्सचे आयोजन केले जात आहे
हा उपक्रम म्हणजे देशातील दर्जा आणि उत्पादकता संबंधित अभियानाची फक्त सुरुवात आहे
Posted On:
03 FEB 2021 12:26PM by PIB Mumbai
देशातील उत्पादन आणि सेवा यांच्याशी संबंधित सर्व प्रमुख क्षेत्रातील दर्जा आणि उत्पादकता यांच्या वाढीबाबत केंद्रिभूत चर्चा करण्यासाठी उद्योग मंथन या दीर्घकाळ चालणाऱ्या वेबिनार मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. 4 जानेवारी 2021 ला सुरु झालेल्या या वेबिनारमध्ये सुमारे 45 विविध विभागांवर चर्चा होणार आहे. केंद्र सरकारचा डीपीआयआयटी अर्थात उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग, वाणिज्य विभाग, भारतीय दर्जा मंडळ, राष्ट्रीय उत्पादकता मंडळ, भारतीय ब्युरो, इंडियन चेम्बर्स आणि संबधित मंत्रालये यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते 6 जानेवारी 2021 ला या वेबिनार्सचे उद्घाटन झाले. गोयल यांनी यावेळी बोलताना, आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी, भारतीय उद्योग क्षेत्राने दर्जा आणि उत्पादकता यांच्या वाढीकडे लक्ष द्यायला हवे, यावर जोर दिला. हे वेबिनार्स आपल्या कामाची पद्धत बदलण्यासाठीची आपली मानसिकता मुळातून बदलणारे अग्रदूत म्ह्णून कार्य करतील याकडे त्यांनी लक्ष वेधले.
गेल्या 4 आठवड्यांच्या कालावधीत झालेल्या वेबिनार्समध्ये विविध निर्मिती आणि सेवा क्षेत्रातील खेळणी, चामड्याच्या वस्तू, फर्निचर,रसायने,पर्यटन, ड्रोन, आर्थिक सेवा,इत्यादी क्षेत्रांसह अनेक विषयांवर चर्चासत्रे आयोजित करण्यात आली. या उपक्रमात, आतापर्यंत, 175 तज्ञ वक्ते, वेबएक्स मधील 1800 सहभागी आणि विविध सामाजिक माध्यमांतून 7000पेक्षा जास्त व्यक्तीं सहभागी झाल्या आहेत. यातील प्रत्येक वेबिनारमध्ये, विशिष्ट क्षेत्रातील दर्जा आणि उत्पादकता सुधारण्याशी संबंधित मुद्यांवर सखोल चर्चा होत आहे. यापैकी प्रत्येक वेबिनारमध्ये संबंधित मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह उद्योग क्षेत्रातील तज्ञ आणि मुख्य व्यक्तींच्या नेतृत्वात चर्चा होत आहेत.
येत्या काही आठवड्यात,उद्योग मंथन मध्ये औषध निर्मिती, वैद्यकीय साधने, क्लोज सर्किट कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक प्रणाली आरेखन आणि निर्मिती, नवीकरणीय तसेच पुनर्नवीकरणीय ऊर्जा, रोबोटिक्स, हवाई क्षेत्र, संरक्षण क्षेत्र, सरकारी प्रक्रियांमधील दर्जात्मक सुधारणा यांसह इतर अनेक क्षेत्रांशी संबंधित वेबिनार होणार आहेत. यावेळी होणाऱ्या चर्चा आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठीच्या मार्गावर प्रकाशदायी ठरतील. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक व्यक्तींनी https://udyogmanthan.qcin.org/and या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच https://tinyurl.com/UMparticipation येथे नोंदणी करावी.
U.Ujgare/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1694683)