आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
राष्ट्रपतींच्या हस्ते 2021साठी देशव्यापी पल्स पोलिओ कार्यक्रमाचा प्रारंभ
उद्याच्या ‘पोलिओ रविवारी’ 17 कोटींपेक्षा जास्त बालकांना देणार पोलिओचा डोस
देशात 2011 मध्ये अखेरचा पोलिओ रुग्ण सापडला ; पोलिओमुक्त दशक होण्याच्या मार्गावर - डॉ. हर्षवर्धन
राज्ये, केंद्रशासित प्रदेश, आरोग्य सेवक, स्वयंसेवक, नागरी संस्था यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे भारताला तीन दशकांपासून पोलिओमुक्त ठेवण्यात यश
प्रविष्टि तिथि:
30 JAN 2021 9:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जानेवारी 2021
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज 2021 साठी देशव्यापी पल्स पोलिओ कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. राष्ट्रपती भवनामध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चैबे यांच्या उपस्थितीत पाच वर्षाच्या आतल्या बालकाला पोलिओचा डोस देऊन या कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला.

प्रथम महिला सविता कोविंद यांनी पल्स पोलिओ राष्ट्रीय लसीकरण दिनाच्या पूर्वसंध्येला मुलांना पोलिओचे थेंब पाजले. पल्स पोलिओ मोहीम 31 जानेवारी, 2021 रोजी संपूर्ण देशभरामध्ये राबविण्यात येणार आहे. हा रविवार ‘पोलिओ रविवार’ म्हणून ओळखला जातो. देश यापुढेही पोलिओमुक्त रहावा, यासाठी सरकारने पाच वर्षांच्या आतल्या बालकांना पोलिओचा डोस देण्याची मोहीम सुरू केली आहे. यामध्ये देशातल्या 17 कोटी मुलांना पोलिओचे थेंब देण्यात येणार आहेत. देशभरामध्ये यासाठी 24 लाख स्वयंसेवक, 1.5 लाख निरीक्षक कार्यरत असणार आहेत. विविध नागरी समाज संस्था, जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ, रोटरी यासारख्या संस्थांच्या पाठबळाने ही मोहीम राबविण्यात येणार आहे. आरोग्य सेवक या दिवशी जवळपास दोन कोटी कुटुंबांच्या घरी जावून मुलांना डोस पाजणार आहेत जेणेकरून पोलिओचा थेंब देण्यापासून आणि त्यामुळे मिळत असलेल्या संरक्षणामुळे कोणतेही बालक वंचित राहू नये.

याप्रसंगी बोलताना डॉ. हर्षवर्धन यांनी राष्ट्रपती आणि पहिला महिला यांच्या उपस्थितीविषयी विशेष कृतज्ञता व्यक्त केली. तसेच कोविड महामारीच्या काळामध्ये देशातल्या सर्व मुलांचा सर्व आजारांपासून बचाव करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, यावर भर दिला.
दिल्ली सरकारमध्ये आरोग्य मंत्री म्हणून कार्यरत असताना पोलिओविरुद्ध लढा देण्यासाठी आपण वैयक्तिक स्तरावर प्रयत्न सुरू केले होते, असे सांगून डॉ. हर्षवर्धन म्हणाले, जागतिक स्तराचा विचार केला तर एकूण पोलिओग्रस्तांपैकी भारतामध्ये 60 टक्के प्रकरणे आढळत होती. मात्र सरकारने पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम डिसेंबर 1993 मध्ये तयार केला आणि 2 आॅक्टोबर, 1994 पासून या कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करण्यात आली. यादिवशी पोलिओमुक्त भारत करण्यासाठी पहिल्या बालकाला पोलिओचा डोस देण्यात आला. देशातल्या 4000 केंद्रांवरून जवळपास 12 लाख बालकांना डोस देण्यात आला. पल्स पोलिओ कार्यक्रमाचा दृष्य परिणाम 1995 पासून जाणवू लागला. आणि त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर अशाच पद्धतीने पोलिओच्या कार्यक्रमाचे अनुकरण करण्यात आले. एक वर्षानंतर जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण-पूर्व अशियातल्या अनेक देशांनी या रणनीतीचे अनुकरण केले आणि तसाच कार्यक्रम राबविला. आफ्रिकेमध्ये नेल्सन मंडेला यांनी ‘किक पोलिओ आउट ऑफ आफ्रिका’ ही मोहीम सुरू केली, अशी माहिती आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.
या मोहिमेचे कौतुक करताना ते म्हणाले, कार्यक्रम सुरू होण्याआधी जगभरातील पोलिओ रुग्णांपैकी भारतामध्ये पोलिओचे 60 टक्के रुग्ण होते. दि. 13 जानेवारी, 2011 रोजी हावडा येथे देशातला शेवटचा पोलिओ रूग्ण सापडल्याची नोंद आहे. त्यांनतर गेल्या एक दशकापासून देश पोलिओमुक्त झाला आहे.
यावेळी डॉ. हर्षवर्धन यांनी सावधगिरीच्या उपायांसह भारताने या मोहिमेत केलेल्या कामाचे कौतुक केले. त्यामुळेच 27 मार्च 2014 रोजी भारतासह संपूर्ण दक्षिण-पूर्व अशिया पोलिओ मुक्त झाल्याचे प्रमाणपत्र जागतिक आरोग्य संघटनेने दिले. ही देशाच्या आरोग्य क्षेत्राने केलेली मोठीच कामगिरी आहे, असेही ते म्हणाले. भारत आणि जागतिक आरोग्याचा इतिहास लक्षात घेवून संपूर्ण विश्वातून पोलिओचे निर्मूलन होईपर्यंत आपण जागरूक राहण्याची आणि हा आजार बळावू नये म्हणून दक्षता घेण्याची गरज आहे. यासाठी जनतेची रोग प्रतिकारशक्ती कायम राखणे आवश्यक आहे. पोलिओचा विषाणू आपल्या आजूबाजूच्या, शेजारी देशांमध्ये आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये अजून पोलिओमुक्ती झालेली नाही. पोलिओची प्रकरणे नोंदली जात आहेत, त्यामुळे दक्षता घेण्याची गरज आहे, असेही आरोग्यमंत्री यावेळी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वैश्विक लसीकरण कार्यक्रम पूर्वीपेक्षा जास्त आजारांपासून मुलांना संरक्षण देण्यासाठी लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. न्यूमोकोकल कॉंज्युगेट लस, रोटाव्हायरस लस आणि गोवर, कांजिण्या प्रतिबंधक लस, यांच्या अनेक नवीन लसी आता तयार करण्यात आल्या आहेत. आपल्या मुलांना अतिरिक्त संरक्षण देण्यासाठी पोलिओची लस नियमित लसीकरण कार्यक्रमात आणली आहे, असेही त्यांनी सांगितले.
नियमित लसीकरण कार्यक्रम अधिक मजबूत करण्यासाठी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती यावेळी डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. अधिकाधिक आजारांपासून मुलांचे संरक्षण करतानाच देशातल्या प्रत्येक मुलापर्यंत लस पोहोचणे आवश्यक आणि महत्वाचे आहे. त्यामुळे पोलिओ कार्यक्रमातून बोध घेवून मिशन इंद्रधनुष, ग्राम स्वराज अभियान, विस्तारित ग्राम स्वराज अभियान आणि विस्तारित मिशन इंद्रधनुष एक आणि दोन कार्यक्रम राबवून नियमित लसीकरण कार्यक्रमाला बळकटी देण्यात आली आहे. यामुळे आता देशात 2018 पर्यंत 90 टक्के लसीकरण पूर्ण केेले आहे. कोविड महामारीच्या काळामध्ये संपूर्ण देशभर निर्माण झालेली तूट भरून काढण्यासाइी इंटेन्सिफायईड मिशन इंद्रधनुष कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. देशातल्या 250 उच्च जोखीम असलेल्या जिल्ह्यात फेब्रुवारी आणि मार्च 2021मध्ये यासाठी नियोजन करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त संवेदनशील भागात दक्षता घेण्यास राज्यांना सांगण्यात आले आहे, असे यावेळी सांगितले.
आरोग्यमंत्र्यांनी यावेळी राज्य सरकारे आणि जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ आणि रोटरी यांच्यासारख्या समर्थन देणा-या संस्था यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. पोलिओ कार्यक्रमामध्येच नाही तर लसीकरणाबरोबरच इतर उपक्रमामध्ये सरकारच्या प्रयत्नांना यामुळे बळकटी मिळत असल्याचे सांगितले. देशाला पोलिओमुक्त ठेवण्यासाठी अथक प्रयत्न केल्याबद्दल राज्यांमधले हजारो स्वयंसेवक, आघाडीचे कामगार आणि आरोग्य अधिकारी यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. आपल्या मुलांना पोलिओ कक्षामध्ये घेवून येणा-या सर्व मातांचेही त्यांनी मनापासून आभार मानले. पोलिओ मुक्त देश बनविण्याचा कार्यक्रम यशस्वी करणा-या सर्व महिला आणि पुरूषांचे आपण आभार व्यक्त करीत आहोत, असे डॉ. हर्षवर्धन यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण,अतिरिक्त आरोग्य सचिव डॉ. मनोहर अगनानी, जागतिक आरोग्य संघटनेचे देशातले प्रतिनिधी डॉ. रोडेरिकोद ऑर्फिन, युनिसेफचे देशातले प्रतिनिधी डॉ. यास्मिन अलि हक, आणि आरोग्य मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
S.Kane/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1693679)
आगंतुक पटल : 1111