पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जागतिक आर्थिक मंचाच्या दावोस चर्चासत्रामध्ये भाषण
भारताने कोरोनाचे प्रभावी नियंत्रण केल्यामुळे मानवतेची मोठी शोकांतिका टाळणे शक्य झाले- पंतप्रधान
Posted On:
28 JAN 2021 11:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जानेवारी 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक आर्थिक मंचाच्या दावोस चर्चासत्रामध्ये दूरदृश्य प्रणालीव्दारे संवाद साधला. ‘‘चौथी औद्योगिक क्रांती - मानवतेच्या हितार्थ तंत्रज्ञानाचा वापर’’ या विषयावर पंतप्रधानांनी भाषण केले. या कार्यक्रमामध्ये त्यांनी विविध संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशीही संवाद साधला.
याप्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 1.3 अब्ज भारतीयांकडे असलेला आत्मविश्वास, सकारात्मकता आणि आशा यांचा संदेश आपण घेऊन आलो आहोत. महामारीच्या काळात भारताने ज्या पद्धतीने आपल्या क्षमता सिद्ध केल्या आणि या संकटाशी सामना केला, त्याचा अतिशय फायदा झाला. प्रारंभीच्या काळात संकटाची जाणीव झाल्यानंतर भारताने सक्रियता आणि सहभागीदारीच्या माध्यमातून सक्षम होण्याचा दृष्टिकोन स्वीकारला. त्याचा लाभ म्हणजे भारतामध्ये कोविडसाठी आवश्यक असणाऱ्या आरोग्यविषयक पायाभूत सुविधा बळकट करण्याचे काम वेगाने करण्यात आले. आम्ही आमच्या मनुष्यबळाला संसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशिक्षण दिले. त्याचाही फायदा झाला. कोरोना रुग्णांचा शोध घेणे, चाचण्या करणे यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला. भारतामध्ये कोरोनाविरुद्धच्या लढाईला चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले, त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांचे प्राण वाचविण्यात भारताला यश आले. जगाच्या लोकसंख्येचा विचार केला तर त्यापैकी 18 टक्के लोक भारतामध्ये राहतात. इतक्या प्रचंड लोकसंख्येला सुरक्षित ठेवण्यात आम्हाला यश मिळाले. भारताने कोरोनाचे प्रभावी नियंत्रण केल्यामुळे मानवतेची मोठी शोकांतिका टाळणे शक्य झाले, असेही पंतप्रधान म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी जगातल्या सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेविषयीही माहिती दिली तसेच या महामारीच्या काळामध्ये भारताने जागतिक स्तरावर किती मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले, याचीही माहिती त्यांनी दिली. अनेक देशांमध्ये प्रवासी हवाई वाहतुकीवर निर्बंध असतानाही भारताने तिथल्या नागरिकांना मुक्त करण्यासाठी मदत केली. जगातल्या दीडशेपेक्षा जास्त देशांना कोरोना काळात आवश्यक असलेल्या औषधांचा पुरवठाही भारताने केला. आज भारत अनेक देशांना ऑनलाइन प्रशिक्षण देत आहे, त्यामध्ये आमच्या देशामध्ये असलेले पारंपरिक औषधोपचाराचे ज्ञान, लसीकरण आणि लसीकरण कार्यक्रम राबविण्यासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती कशी करावी, याची माहिती दिली जात आहे. भारतामध्ये तयार करण्यात आलेल्या दोन लसींव्यतिरिक्त आणखी काही लसींच्या निर्मितीचे कामही भारतामध्ये सुरू आहे, असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले की या लसींमुळे भारत जगाला मोठ्या प्रमाणावर आणि जास्त वेगाने मदत करू शकणार आहे.
भारतामध्ये आर्थिक आघाड्यांवर कोणती पावले उचलण्यात येत आहेत, याचीही माहिती पंतप्रधानांनी या आर्थिक मंचावर दिली. देशात कोट्यवधी रुपयांचे पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत तसेच देशात रोजगार निर्मितीसाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येत आहेत. यामुळे भारताची आर्थिक क्रियाशीलता कायम राहण्यास मदत झाली आहे. याआधी आम्ही जीवन वाचविण्यासाठी लक्ष केंद्रीत केले होते. आता प्रत्येकजण देशाच्या विकासाकडे लक्ष देत आहे. भारताला स्वावलंबी बनविण्याची महत्वाकांक्षा आम्ही बाळगली आहे, नव्या जागतिकीकरणाच्या समिकरणात भारत अधिक सक्षम होईल, उद्योगांसाठीही मदत करेल, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.
उद्योग 4.0 अंतर्गत भारत, संपर्क यंत्रणा, ऑटोमेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा मशीन लर्निंग आणि रिअल टाइम -डेटा या चार घटकांचा प्राधान्याने विचार करीत आहे, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की भारतामध्ये डेटाचे दर स्वस्त आहेत आणि मोबाइल संपर्क यंत्रणा तसेच स्मार्ट फोनचा आता सर्वत्र प्रसार झाला आहे. भारतामध्ये ऑटोमेशन डिझाइन तज्ञ मोठ्या संख्येने आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रामध्ये भारताने विक्रमी कामगिरी केली आहे. तसेच मशीन लर्निंग क्षेत्रातही भारताने आपले विशेष स्थान निर्माण केले आहे. डिजिटल क्षेत्रामध्ये असलेल्या पायाभूत सुविधांमुळे कोणत्याही समस्येवर डिजिटल उपाय शोधून काढणे आता भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. आज भारतामध्ये 1.3 अब्ज लोकांना आधार ओळखपत्रे देण्यात आली आहेत. ती मोबाइल फोन आणि बँक खात्यांबरोबर जोडण्यात आली आहेत. डिसेंबरमध्ये देशामध्ये 1.8 ट्रिलियन रुपयांचे व्यवहार यूपीआयच्या माध्यमातून झाले. तसेच महामारीच्या काळामध्ये 760 दशलक्ष भारतीयांच्या बँक खात्यांमध्ये अनुदानाचा मदतनिधी थेट हस्तांतरीत करण्यात आला. डिजिटल पायाभूत सुविधांमुळे सार्वजनिक सेवा वितरण अधिक कार्यक्षम झाले आणि त्यामध्ये पारदर्शकताही आली. भारतातल्या नागरिकांना युनिक हेल्थ आय.डी. देऊन आरोग्य सेवा सहजतेने उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे, अशी माहितीही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिली.
भारताने सुरू केलेली आत्मनिर्भर भारत मोहीम विश्वाच्या कल्याणासाठी आणि जागतिक पुरवठा साखळी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे. भारताकडे असलेल्या क्षमतांचा वापर करून विश्वासार्हतेने ही साखळी बळकट होवू शकणार आहे. यामुळे ग्राहक आधाराची व्याप्ती वाढणार असून जागतिक अर्थव्यवस्थेला पुढे नेण्यासाठी भारताची मदत होईल, अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी या मंचावरून दिली.
पंतप्रधानांनी अनेक सकारात्मक शक्यतांसह भारत आत्मविश्वासाने वाटचाल करीत आहे. त्याचबरोबर भारतात सुधारणांना प्रोत्साहन देण्यावर सातत्याने भर दिला जात आहे, असे सांगितले. कोरोना काळामध्ये संरचनात्मक सुधारणा करून उत्पादनाशी निगडीत प्रोत्साहनाला पाठिंबा देण्यात आला आहे. कर सवलती, थेट परकीय गुंतवणूकीचे निकष, उद्योगस्नेही वातावरण, यामुळे भारतामध्ये आता व्यवसाय करणे अधिक सुलभ झाले आहे, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की हवामानातील बदलांविषयी निश्चित करण्यात आलेल्या उद्दिष्टांशी सुसंगत धोरण भारताने तयार केले आहे.
तंत्रज्ञान हा काही सापळा नाही तर अधिक चांगले आयुष्य जगण्यासाठीचे साधन आहे, असे सांगून पंतप्रधानांनी कोरोना संकटकाळामध्ये सर्वांना माणुसकीचे मूल्य समजले, याचे स्मरण करून दिले.
यावेळी झालेल्या प्रश्नोत्तराच्या सत्रामध्ये सीमेन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी जो काइसर यांनी पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत अभियानाविषयी प्रश्न उपस्थित विचारला. त्याला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले की भारताला उत्पादन आणि निर्यातीचे केंद्र बनविणे, हा यामागचा महत्वाचा दृष्टिकोन आहे. 26 अब्ज डॉलर मूल्याच्या उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्यासाठी जागतिक स्तरावरील उद्योजकांना त्यांनी आमंत्रित केले. एबीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीजॉर्न रोसेनग्रेन यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मोदी यांनी देशात सध्या सुरू असलेल्या पायाभूत प्रकल्पांची यादीच सादर केली आणि राष्ट्रीय पायाभूत सुविधांच्या ज्या प्रकल्पांचे काम येत्या पाच वर्षात करण्यात येणार आहे, त्यांचीही माहिती दिली. हे प्रकल्प एकूण 1.5 ट्रिलियन अमेरिकी डॉलर मूल्याचे आहेत, असेही त्यांनी सांगितले. मास्टरकार्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय एस.बंगा यांच्या प्रश्नावर मोदी यांनी अलिकडच्या काळामध्ये झालेल्या देशातल्या मोठ्या प्रमाणावरील वित्तीय समावेशनाचा तपशील सादर केला. तसेच एमएसएमई क्षेत्राच्या मजबुतीकरणासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. आयबीएम कंपनीचे अरविंद कृष्णा यांच्या निरीक्षणासंबंधी बोलताना पंतप्रधानांनी डिजिटल इंडिया मोहीम आता किती खोलवर रूजली आहे, याची माहिती देण्यावर भर दिला. भारताचे डिजिटल प्रोफाइलच आता पूर्ण बदलून गेले आहे. डिजिटल व्यवहारकर्त्यांची गोपनीयता सुनिश्चित करण्यात येत आहे. तसेच वापराची सुविधा, समावेशन आणि सक्षमीकरण यांच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य करण्याचा सरकारचा मानस आहे. एनईसी महामंडळाचे अध्यक्ष नोबुहिरो एंडो यांच्या प्रश्नावर पंतप्रधान मोदी यांनी भारत सरकार शाश्वत शहरीकरणावर लक्ष केंद्रीत करीत असून लोकांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांचे जीवन सुकर बनविणे यासाठी काम करीत आहे. त्याचबरोबर हवामान बदलासारख्या संवेदनशील विषयाचा विचार करून विकास करण्यासाठी बांधिल आहे, असेही स्पष्ट केले. 2014 ते 2020 या काळात भारतातल्या शहरांमध्ये 150 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
M.Pange/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1693070)
Visitor Counter : 800
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada