पंतप्रधान कार्यालय

रेल्वेद्वारे आम्ही मागास भागांना जोडून घेत आहोत: पंतप्रधान

Posted On: 17 JAN 2021 5:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 जानेवारी 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले"देशातील जे भाग जोडलेले नव्हते आणि जे मागे पडले होते त्यांना आम्ही रेल्वेने जोडून घेत आहोत. देशातील विविध प्रातांना गुजरातमधील केवाडीयाशी जोडणाऱ्या आठ रेल्वेगाड्यांना हिरवा कंदील दाखविताना आणि राज्यातील रेल्वेशी संबंधित अनेक प्रकल्पांचे उद्घाटन दूरदृष्य प्रणालीद्वारे करतांना श्री. मोदी बोलत होते.

पंतप्रधानांनी प्रतिपादन केले, की ब्रॉडगेजिंग आणि विद्युतीकरणाच्या कामांना गती प्राप्त झाली असून वेगाने धावण्यासाठी मार्ग आखले जात आहेत. यामुळे सेमी हाय स्पीड गाड्यांचे सक्षमीकरण झाले असून आम्ही वेगवान गाड्यांच्या क्षमतेकडे वाटचाल करत आहोत, यासाठी अर्थसंकल्पात अनेक पटींनी वाढ करण्यात आली आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

 

पंतप्रधानांनी असेही निदर्शनास आणून दिले, की रेल्वेने पर्यावरण स्नेही रहावे हेदेखील सुनिश्चित केले जात आहे. केवाडीया रेल्वे स्थानक हे भारतात प्रथम सुरु होणारे हरीत इमारत प्रमाणित रेल्वे स्थानक आहे.

पंतप्रधानांनी रेल्वेशी संबंधित उत्पादने आणि तंत्रज्ञान यातील आत्मनिर्भरतेच्या महत्वावर भर दिला, ज्यामुळे आता उत्तम परिणाम मिळत आहेत.उच्च हॉर्स पावरच्या इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हजच्या स्थानिक उत्पादनांमुळे भारत जगातील पहिली डबल  स्टॅक असलेली लांब पल्ल्याची कंटेनर रेल्वेगाडी सुरू करू शकला.आज स्वदेशात निर्माण झालेल्या आधुनिक गाड्यांची मालिका हा भारतीय रेल्वेचा एक भाग असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

रेल्वेत परीवर्तन आणण्यासाठी कुशल, तज्ञ मनुष्यबळ आणि व्यावसायिकांची आवश्यकता आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. त्यामुळेच बडोदा येथे अभिमत  रेल्वे विद्यापीठाची स्थापना झाली.अशी उच्च प्रतीची संस्था असलेला भारत हा काही देशांपैकी एक आहे. या ठिकाणी रेल्वे वाहतुकीसाठी आधुनिक सुविधा, बहुशास्त्रीय संशोधन आणि प्रशिक्षण देण्यात येत आहे. 20 राज्यांतील प्रतिभावंत युवकांना रेल्वेच्या वर्तमान आणि भविष्यकालीन स्थितिबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे. यामुळे नाविन्यपूर्ण संशोधन आणि रेल्वेचे आधुनिकीकरण करण्यात मदत होईल, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

 

* * *

M.Chopade/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1689398) Visitor Counter : 108