पंतप्रधान कार्यालय

स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत थेट जाणाऱ्या आठ रेल्वेगाडयांना पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला


गुजरातमध्ये रेल्वे क्षेत्राशी संबंधित अन्य अनेक प्रकल्पांचे केले उद्घाटन

एमजीआर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण केली

केवडिया हे जगातील सर्वात मोठे पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले आहेः पंतप्रधान

ध्येय केंद्रीत प्रयत्नातून भारतीय रेल्वे परिवर्तन घडवत आहेः पंतप्रधान

Posted On: 17 JAN 2021 4:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 जानेवारी 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशाच्या विविध भागांमधून गुजरातच्या केवडियाला जाणाऱ्या आठ रेल्वेगाडयांना हिरवा कंदील दाखवला.  या गाड्या स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत थेट प्रवासाची सेवा उपलब्ध करून देतील.  दाभोई - चांदोड गेज  रूपांतरित ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, चांदोड - केवडिया नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, नव्याने विद्युतीकरणं केलेला  प्रतापनगर - केवडिया मार्ग आणि दाभोई, चांदोड व केवडिया या नवीन स्थानक इमारतींचेही  पंतप्रधानांनी उद्घाटन केले. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय रेल्वेमंत्री उपस्थित होते.

पंतप्रधान म्हणाले की, बहुधा रेल्वेच्या इतिहासात प्रथमच  देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून एकाच ठिकाणी जाणाऱ्या गाडयांना हिरवा कंदील दाखवून रवाना करण्यात आले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि सरदार सरोवर यामुळे केवडीयाचे महत्त्व वाढले आहे. आजचा हा कार्यक्रम रेल्वेची दूरदृष्टी आणि सरदार पटेल यांच्या मिशनचे उदाहरण आहे.

केवडिया जाण्यासाठी एक रेल्वेगाडी पुरुचि थालियावार डॉ. एमजी रामचंद्रन सेंट्रल  रेल्वे स्थानकातून सुरू होत असल्याचे नमूद करून पंतप्रधानांनी भारतरत्न एमजीआर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. चित्रपट पडद्यावर आणि राजकीय व्यासपीठावर त्यांनी केलेल्या कामगिरीची मोदींनी प्रशंसा केली.  त्यांनी नमूद केले की एमजीआर यांचा राजकीय प्रवास गरीबांना समर्पित आहे आणि त्यांनी वंचितांना प्रतिष्ठेने जगता यावे यासाठी अथक परिश्रम घेतले. पंतप्रधान म्हणाले की आम्ही त्यांची आदर्श मूल्य जपण्याचे कार्य करत आहोत आणि कृतज्ञ राष्ट्राने एमजीआर यांचे नाव चेन्नई मध्य रेल्वे स्थानकाला दिल्याचे स्मरण करून दिले.

पंतप्रधानांनी केवडिया आणि चेन्नई, वाराणसी, रेवा, दादर आणि दिल्ली दरम्यान तसेच केवडिया व प्रतापनगर दरम्यान मेमू सेवेसह दाभोई-चांदोड ब्रॉडगेजिंग व चांदोड-केवडिया दरम्यान  नवीन मार्गाकडे लक्ष वेधले. यामुळे केवडियाच्या विकासात नवा अध्याय लिहिला जाईल. याचा फायदा पर्यटक आणि स्थानिक आदिवासी दोघांनाही होईल. कारण यामुळे स्वयं रोजगार व रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. हा रेल्वेमार्ग नर्मदावरील कर्नाली, पोईचा आणि गरुडेश्वर यासारख्या श्रद्धास्थानांना जोडेल.

केवडियाच्या विकासाचा प्रवास सुरू ठेवत पंतप्रधानांनी प्रतिपादन केले की केवडिया हा काही आता दुर्गम भागातील छोटासा भाग राहिला नाही, तो जगातील सर्वात मोठे पर्यटन स्थळ म्हणून उदयाला आला आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा  अधिक पर्यटक आकर्षित करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.  देशाला समर्पित झाल्यानंतर स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी 50 लाखाहून अधिक पर्यटक येऊन गेले  आहेत आणि कोरोना काळात  बंद राहिल्यानंतर ते आता पुन्हा लक्ष वेधून घेत आहे. संपर्क व्यवस्था जसजशी सुधारेल , तसतसे केवडियामध्ये दररोज सुमारे एक लाख पर्यटक भेट देतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.  पर्यावरणाचे रक्षण करताना अर्थव्यवस्था आणि पर्यावरणाच्या नियोजित विकासाचे केवडिया हे उत्तम उदाहरण असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

सुरुवातीला केवडिया हे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव स्वप्नवत वाटत  होता.  जुन्या पद्धतीचे कामकाज पाहता, रस्ते, पथदिवे, रेल्वे, पर्यटकांची राहण्याची काहीही सोय नव्हती  आता केवडिया सर्व सुविधांसह संपूर्ण कुटुंबासाठी उत्तम पर्यटन स्थळ बनले आहे.  येथील आकर्षणांमध्ये, भव्य स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार सरोवर, विशाल सरदार पटेल प्राणीविज्ञान पार्क, आरोग्य वन आणि जंगल सफारी आणि पोषण  पार्क यांचा समावेश आहे. यात ग्लो गार्डन, एकता क्रूझ आणि वॉटर स्पोर्ट्स देखील आहेत. पंतप्रधान म्हणाले, वाढत्या पर्यटनामुळे आदिवासी तरुणांना रोजगार मिळत आहे आणि स्थानिक लोकांना आधुनिक सुविधा मिळत आहेत. एकता मॉलमध्ये स्थानिक हस्तकलेच्या वस्तूंसाठी नवीन संधी आहेत. आदिवासी गावांमध्ये होम स्टेसाठी सुमारे 200 खोल्या विकसित केल्या जात आहेत  असेही त्यांनी नमूद केले.

वाढते पर्यटन लक्षात घेऊन केलेल्या  केवडिया स्थानकाच्या विकासाबाबत पंतप्रधानांनीही माहिती दिली. इथे आदिवासी आर्ट गॅलरी आणि प्रेक्षक गॅलरी आहे जिथून स्टॅच्यू ऑफ युनिटीची  झलक पाहता येईल.

ध्येय-केंद्रित प्रयत्नातून  भारतीय रेल्वेच्या कायापालटाबाबत पंतप्रधानांनी विस्तृत भाष्य केले. ते म्हणाले की, प्रवासी आणि वस्तू वाहतुकीच्या पारंपारिक भूमिकेशिवाय रेल्वे पर्यटन आणि धार्मिक महत्त्व असलेल्या ठिकाणांना थेट संपर्क व्यवस्था पुरवत आहे. ते म्हणाले की अहमदाबाद-केवडियासह अनेक मार्गांवरील जनशताब्दीमध्ये आकर्षक ‘व्हिस्टा-डोम कोच’ असतील.

पंतप्रधानांनी रेल्वे पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या दृष्टीकोनात झालेला बदल अधोरेखित केला.  ते म्हणाले की पूर्वी विद्यमान पायाभूत सुविधा चालू ठेवण्यावर  भर  होता आणि नवीन विचार किंवा नवीन तंत्रज्ञानाकडे  फारसे लक्ष दिले जात नव्हते. हा दृष्टिकोन बदलणे अत्यावश्यक होते. अलिकडच्या वर्षांत, संपूर्ण रेल्वे प्रणालीच्या  व्यापक परिवर्तनावर काम केले गेले  आणि ते अर्थसंकल्पीय तरतूद  आणि नवीन गाड्यांच्या घोषणांपुरते मर्यादित नव्हते. परिवर्तन अनेक आघाड्यांवर झाले. केवडियाला जोडण्याच्या सध्याच्या प्रकल्पाचे त्यांनी उदाहरण दिले ज्यात  बहुआयामी ध्येयामुळे विक्रमी वेळेत काम पूर्ण झाले.

पूर्वीच्या काळापासून दृष्टिकोन बदलण्याचे उदाहरण म्हणून पंतप्रधानांनी समर्पित मालवाहतूक मार्गिकेचे उदाहरण देखील सादर केले. पंतप्रधानांनी नुकतेच  ईस्टर्न आणि वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर समर्पित केले.  या प्रकल्पाचे काम सुरु होते आणि 2006-2014  दरम्यान केवळ कागदावर काम झाले, एक किलोमीटरचा मार्ग देखील टाकण्यात आला नव्हता. आता येत्या काही दिवसांत एकूण 1100 किलोमीटरचे काम पूर्ण होणार आहे.

पंतप्रधानांनी नवीन जोडणीबाबत सांगितले की आतापर्यन्त जे भाग जोडले नव्हते ते आता जोडले जात आहेत.   ब्रॉडगेजिंग आणि विद्युतीकरणाच्या कामाना  वेग आला आहे आणि उच्च  वेगासाठी रेल्वेमार्ग तयार केले जात आहेत.  आता  सेमी हायस्पीड गाड्यां धावण्यासाठी सक्षम झाली असून  आपण अतिजलद  क्षमतेच्या दिशेने वाटचाल करत आहोत आणि यासाठी अर्थसंकल्पात अनेक पटींनी वाढ करण्यात आली आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

रेल्वे पर्यावरणस्नेही रहावी याची काळजी घेतली जात असल्याचेही पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले. केवडिया स्थानक हे हरित इमारत प्रमाणीकरणासह  प्रारंभ करणारे भारताचे पहिले रेल्वे स्थानक आहे.

रेल्वेशी संबंधित उत्पादन आणि तंत्रज्ञानात आत्मनिर्भरतेचे महत्त्व यावरही त्यांनी भर दिला ज्यामुळे आता चांगले परिणाम दिसून येत आहेत.  हाय हॉर्स पॉवर इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हच्या स्थानिक उत्पादनामुळेच भारत जगातील प्रथम डबल स्टॅक असलेली लांब पल्ल्याची कंटेनर ट्रेन सुरू करू शकला.  आज स्वदेशी निर्मित आधुनिक गाड्या भारतीय रेल्वेचा एक भाग असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी रेल्वे परिवर्तनाची गरज भागवण्यासाठी कुशल तज्ञ मनुष्यबळ आणि व्यावसायिकांची गरज यावर भर दिला. यासाठी वडोदरामध्ये अभिमत रेल्वे विद्यापीठाची स्थापना झाली. या दर्जाची संस्था असणार्‍या काही मोजक्या देशांपैकी भारत एक आहे. रेल्वे वाहतुकीसाठी आधुनिक सुविधा, बहु-शाखीय संशोधन, प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यात येत आहे. 20 राज्यांमधील  प्रतिभावान तरुणांना रेल्वेच्या वर्तमान आणि भावी विकासासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. यामुळे नावीन्यपूर्ण संशोधनातून रेल्वेचे आधुनिकीकरण करण्यात मदत होईल, असे पंतप्रधान म्हणाले.

 

* * *

Jaydevi PS/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1689381) Visitor Counter : 142