वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज स्टार्ट अप्सशी संवाद साधणार आणि ‘प्रारंभ : स्टार्ट अप इंडिया आंतरराष्ट्रीय परिषदेला’ संबोधित करणार


25 देश आणि 200 हून अधिक जागतिक वक्त्यांचा सहभाग असलेली ही परिषद म्हणजे 2016 मध्ये केंद्र सरकारने स्टार्ट अप इंडिया उपक्रम सुरु केल्यापासून आयोजित केलेली सर्वात मोठी स्टार्ट अप परिषद

Posted On: 16 JAN 2021 4:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 जानेवारी 2021

 

स्टार्ट अप परीसंस्थाना चालना देण्यासाठी देशांमधल्या सहकार्याचे महत्व यावर लक्ष केंद्रित करण्यासाठीच्या  ‘प्रारंभ : स्टार्ट अप इंडिया आंतरराष्ट्रीय परिषदेच्या पहिल्या दिवशी जगभरातल्या सर्वश्रेष्ठ धोरणात्मक विद्धतजनांनी एका मंचावर आपले विचार व्यक्त केले. तंत्रज्ञान, नवोन्मेश, मजबूत धोरण आणि उपक्रमाशी संबंधित मुद्यांवर यावेळी  विचारविमर्श करण्यात आला. युवा संशोधक आणि उद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी आपले विचार मांडण्याची संधी सरकारी आणि आंतरराष्ट्रीय संस्थाना, या उपक्रमामुळे मिळत आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने हा दोन दिवसांचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 5 वाजता स्टार्ट अप्सशी संवाद साधणार असून परिषदेलाही दुरदृष्य प्रणालीद्वारे संबोधित करणार आहेत.

दोन दिवसीय या  शिखर परिषदेचे  उद्‌घाटन वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल केले. भारत आणि बिमस्टेक देशांसह जगभरातले उद्योजक, गुंतवणूकदार, नियामक, नवोन्मेशी, आघाडीचे उद्योजक, शिक्षण क्षेत्रातले तज्ञ सहभागी झाले. गोयल यांनी आभासी स्टार्ट अप शोकेसचा प्रारंभ केला.

शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी  1,20,000 पेक्षा जास्त नोंदणी झाली. बिमस्टेक सदस्य राष्ट्राच्या स्टार्ट अप समुदायाचे मान्यवर, यामध्ये सहभागी झाले असून त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली आणि आपल्या नवोन्मेषाचे दर्शन घडवले. दिवसभरात 54 स्टार्ट अपनी 75 गुंतवणूकदारांसमवेत आपल्या कार्यक्षेत्राचे दर्शन घडवले.

जागतिक उत्तम प्रथा, अधिक बळकट स्टार्ट अप यंत्रणेला पोषक वातावरण, बिमस्टेक सदस्य राष्ट्राच्या स्टार्ट अप संस्थापकांना आणि तज्ञांना एकत्र आणून त्यांचे अनुभव कथन आणि आपल्या कल्पना वास्तवात आणण्यासाठी युवकांना मार्गदर्शन अशा विविध पैलूंवर यावेळी चर्चा झाली. स्टार्ट अप्स खरेदी आणि ते बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी अधिक सक्षम करण्यासाठीच्या धोरणावर यावेळी चर्चा झाली.

परिषदेदरम्यान गोलमेज बैठकीचे आयोजनही करण्यात आले. यावेळी स्टार्ट अप्स साठी आंतरराष्ट्रीकरण आणि भारतीय स्टार्ट अपसाठी जागतिक भांडवलाला चालना देण्यासह व्यवसाय सुलभतेला प्रोत्साहन देण्याबाबत चर्चा झाली.या बैठकीत भारतीय नियामक, धोरणकर्ते, आंतरराष्ट्रीय व्हीसी फंड सहभागी झाले.

परिषदेच्या पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमात जगभरातल्या नवोन्मेश आणि उद्योजकता यांच्याशी संबंधित उद्योग जगतातले  आघाडीचे  उद्योजक सहभागी झाले. यामध्ये कृष्ण गोपालकृष्णन (अध्यक्ष आणि संस्थापक, एक्सिलर वेंचर्स), शोबाना कामिनेनी (कार्यकारी उपाध्यक्ष, अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज)दीप कालरा (संस्थापक आणि समूह सीईओ, मेक माय ट्रिप)मनोज कोहली (देश प्रमुख- सॉफ्टबँक  इंडिया)कुणाल बहल (मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक, स्नॅप डील) आणि इतर मान्यवर  सहभागी झाले.

यावेळी स्टार वार्ता या विशेष चर्चा सत्राचेही आयोजन करण्यात आले होते. चित्रपट अभिनेत्री प्रियांका चोपडा जोनास यांच्याशीही या सत्रात विशेष वार्तालाप करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 जानेवारी 2016 ला स्टार्ट अप इंडिया उपक्रमाचा प्रारंभ केला होता, त्याला पाच वर्ष होत असल्याबद्दल प्रारंभ : स्टार्ट अप इंडिया आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. स्टार्ट अप इंडिया उपक्रमाच्या 19 सूत्री कृती आराखड्यावर ही परिषद आधारलेली आहे.

इन्वेस्ट इंडिया, फिक्की, इंडियन एंजल नेटवर्क, आयव्हीसीए, टीआयई दिल्ली- एनसीआर, सीआयआय, नॅसकॉम, सिडबी, टीआयई ग्लोबल लॅड इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन यांच्या सहाय्याने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

S.Tupe/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1689078) Visitor Counter : 180