सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
खादी आणि ग्रामोद्योग विभागाने पहिल्यांदाच गायीच्या शेणापासून तयार केलेल्या ‘खादी प्राकृतिक पेंट’चे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन
Posted On:
12 JAN 2021 8:44PM by PIB Mumbai
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने विकसित केलेल्या नाविन्यपूर्ण रंगाचे उद्घाटन झाले. गायीच्या शेणापासून तयार करण्यात आलेला हा देशातला पहिलाच पेंट आहे. पर्यावरण स्नेही आणि विषारी नसलेला ‘खादी प्राकृतिक पेंट’ बुरशी रोधक आणि जीवाणू रोधक गुणधर्म असलेले नाविन्यपूर्ण उत्पादन आहे. गायीचे शेण या मुख्य घटकावर आधारित हा रंग कमी खर्चातला आणि गंध हीन असून भारतीय मानक ब्युरोने प्रमाणित केला आहे.
पशुपालन मंत्री गिरीराज सिंह, एमएसएमई विभागाचे राज्यमंत्री प्रताप चंद्र सरंगी आणि केवीआयसी चे अध्यक्ष विनय कुमार सक्सेनाही यावेळी उपस्थित होते.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेच्या अनुषंगाने हा अभिनव प्रयोग केला जाणार आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी टाकलेले हे पाऊल असून, त्याद्वारे ग्रामीण भागातून शहराकडे होणारे स्थलांतर रोखण्यासही मदत होईल, अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली
खादी प्राकृतिक पेंट, डिस्टेम्पर आणि प्लास्टिक इमल्शन अशा दोन स्वरुपात उपलब्ध आहे. डिस्टेम्पर 120 रुपये प्रती लिटर आणि इमल्शन 225 रुपये प्रती लिटर अशी किंमत असून मोठ्या पेंट कंपन्यांच्या तुलनेत ही किंमत अर्ध्यापेक्षाही कमी आहे, असे गडकरी यावेळी म्हणाले. सरकारने केवळ ही सुविधा उपलब्ध करुन देत असून पेंटची विक्री व्यावसायिक पद्धतीने संपूर्ण देशभरात केली जाणार आहे, असे गडकरी यांनी सांगितले.
खादी प्राकृतिक पेंटच्या या प्रकल्पाची संकल्पना केव्हीआयसीचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यानी मार्च 2020 मध्ये मांडली आणि जयपूरच्या कुमारप्पा राष्ट्रीय हँडमेड संस्थेने ती प्रत्यक्षात आणली.
शिसे, पार, क्रोमियम, अर्सेनिक आणि इतर जड धातूपासून हा रंग मुक्त आहे. स्थानिक उत्पादनाला यामुळे चालना मिळणार असून तंत्रज्ञान हस्तांतरणाद्वारे शाश्वत स्थानिक रोजगार निर्माण होणार आहे. पर्यावरण स्नेही उत्पादनासाठी कच्चा माल म्हणून गायीच्या शेणाचा वापर वाढून शेतकरी आणि गौशाला यांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्त्रोत मिळणार आहे. यातून शेतकरी/ गोशाळा यांच्यासाठी अतिरिक्त उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. गायीच्या शेणाचा उपयोग केल्याने पर्यावरण स्वच्छ राहण्यासाठी मदत होणार आहे.
खादी प्राकृतिक डीस्टेपर आणि इमल्शन रंगाच्या चाचण्या तीन नामांकित राष्ट्रीय प्रयोग शाळांमध्ये पूर्ण करण्यात आल्या आहेत.
नॅशनल टेस्ट हाऊस मुंबई,
श्री राम औद्योगिक संशोधन संस्था नवी दिल्ली,
नॅशनल टेस्ट हाऊस गाझियाबाद.
खादी प्राकृतिक इमल्शन BIS 15489:2013 मानकाची तर खादी प्राकृतिक डीस्टेपर BIS 428:2013 मानकाची पूर्तता करतो.
***
S.Tupe/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1688072)
Visitor Counter : 401