सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने आयटीबीपीसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या


निमलष्करी दले वापरणार खादीच्या सतरंज्या

Posted On: 06 JAN 2021 5:22PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वदेशीच्या संकल्पनेला मोठा पाठींबा दर्शवत निमलष्करी दलांनी त्यांच्या वापरासाठी खादीच्या सतरंज्यांचा पुरवठा करण्याबाबतचा एक नवा करार केला आहे. आणखी एक पाऊल पुढे टाकत आज खादी आणि ग्रामोद्योग आयोग आणि आयटीबीपी अर्थात भारत-तिबेट सीमा पोलीस यांनी खादीच्या 1 लाख 72 हजार  सतरंज्यांचा पुरवठा करण्यासंदर्भातील सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. हा करार सध्या एका वर्षासाठी असून नंतर त्याचे नवीकरण करण्यात येईल. या 1 लाख 72 हजार सतरंज्यांची किंमत 8 कोटी 74 लाख रुपये आहे.

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

प्राप्त तपशिलानुसार, खादी आणि ग्रामोद्योग आयोग 1.98 मीटर लांबी आणि 1.07 मीटर रुंदीच्या, निळ्या रंगाच्या सतरंज्यांचा पुरवठा करणार आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा, आणि पंजाब येथील खादी कारागीर या खादीच्या सतरंज्या तयार करणार आहेत. यानंतर, खादीच्या रजया, बेडशीट, उशांचे अभ्रे, लोणची, पापड आणि सौंदर्य प्रसाधने यांच्यासाठी देखील अशाच प्रकारचे उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

हा करार ऐतिहासिक असून अशा उपक्रमामुळे आपल्या संरक्षण दलांमध्ये स्वदेशी उत्पादनांच्या वापराला प्रोत्साहन मिळेलच, पण त्याच सोबत खादीच्या वस्तू तयार करणाऱ्या कारागिरांसाठी मोठ्या प्रमाणात अतिरिक्त रोजगारनिर्मिती होईल असे मत खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या अध्यक्षांनी व्यक्त केले.

यापूर्वी, गेल्या वर्षी 31 जुलैला खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने कच्च्या घाणीतून काढलेले मोहरीचे तेल पुरविण्याबाबत आयटीबीपी सोबत करार केला होता आणि आयोगाने यशस्वीरीत्या तेलाचा पुरवठा केला. आयटीबीपी ही केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयाने सर्व निमलष्करी दलांच्या वतीने आवश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी नियुक्त केलेली नोडल संस्था आहे.

 

S.Tupe/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1686567) Visitor Counter : 236