उपराष्ट्रपती कार्यालय

एकल वापराच्या प्लास्टिक विषयी माध्यमांनी व्यापक प्रचार करण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन


प्लास्टिक ही समस्या नसून प्लास्टिक हाताळण्याबाबत असलेली आपली वृत्ती कारणीभूत आहे-उपराष्ट्रपती

Posted On: 28 DEC 2020 6:28PM by PIB Mumbai

 

प्लास्टिक उत्पादनांची विल्हेवाट लावताना लोकांनी आपल्या वागणुकीत बदल घडवून आणण्यासाठी माध्यमांनी व्यापक प्रचार करण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी आज केले. प्लास्टिक ही समस्या नसून प्लास्टिक हाताळण्याबाबत असलेली आपली वृत्ती कारणीभूत आहे यावर त्यांनी भर दिला.

आज विजयवाडा येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (सीआयपीईटी) मधील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकांना संबोधित करताना उपराष्ट्रपतींनी प्लास्टिकच्या टिकाऊपणा आणि दीर्घकाळ टिकाव धरण्याची त्याची क्षमता यामुळे उद्भवलेल्या पर्यावरणीय आव्हानाबद्दल चिंता व्यक्त केली. प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापनाच्या सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला तसेच कमी वापर, पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया या त्रिसूत्रीच्या महत्वाविषयी जनजागृती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. प्लास्टिक वापर टाळणे हा उपाय नसून त्याची काळजीपूर्वक हाताळणी आणि पुनर्प्रक्रिया याबाबत खात्री व्हावी असे ते म्हणाले.

स्वच्छ भारत मिशनचे उदाहरण देतानाच त्यांनी एकल वापर प्लास्टिकविषयी लोकांना शिक्षित करण्यासाठी अशीच देशव्यापी मोहिम राबवून माध्यमे, नागरी संस्था, विद्यार्थी आणि कार्यकर्ते यांनी या जागरूकता अभियानाचा अविभाज्य भाग व्हावे असे आवाहन त्यांनी केले. 2023 च्या अखेरीस भारतातील प्लास्टिक पुनर्प्रक्रिया उद्योग 6.5 % दराने वाढून 53.72 अब्ज डॉलर मूल्य गाठण्याचा अंदाज असून त्यामुळे कचरा व्यवस्थापन म्हणजे आमच्या उद्योजकांसाठी सुवर्ण संधी आहे असे नायडू यांनी सांगितले. गुवाहाटी येथे प्लास्टिक कचरा व्यवस्थापन केंद्र उभारून प्लास्टिक  पुनर्प्रक्रिया आणि कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम देण्यावर भर देणाऱ्या सीआयपीईटीचे त्यांनी कौतुक केले.

वजनाने हलके, टिकाऊ आणि सहज उपलब्ध स्रोत पॉलिमरला आश्चर्यकारक सामग्री म्हणून संबोधित करताना उपराष्ट्रपती म्हणाले की वजनाने हलके, टिकाऊ आणि सहज उपलब्ध स्रोत यामुळे ते जागतिक अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा भाग झाले आहे. त्यांनी नमूद केले की त्याचे वैविध्य आणि प्रगत किफायतशीर उत्पादन तंत्र याद्वारे पारंपरिक वापराच्या विविध क्षेत्रात बदल झाला आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पॉलिमरचे महत्त्व अधोरेखित करताना उपराष्ट्रपती म्हणाले की 30,000 पेक्षा अधिक प्लास्टिक प्रक्रिया उद्योग देशभरात चार दशलक्षांहून अधिक लोकांना रोजगार देत आहेत. दरवर्षी साधारणत: 12 किलोग्रॅम दरडोई राष्ट्रीय वापरामुळे जगातील पॉलिमरच्या पहिल्या सर्वाधिक पाच ग्राहकांमध्ये भारत आहे.

पॉलिमरची मागणी 8% वाढत असल्याचे लक्षात घेऊन उपराष्ट्रपती म्हणाले की, जागतिक पेट्रोकेमिकल उद्योग 2025 पर्यंत 958.8 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. पेट्रोकेमिकल क्षेत्रात भावी पिढीचे संशोधन आणि देशी तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार करण्याचा मार्ग हा मेक इन इंडिया आणि स्टार्ट-अप इंडिया यासारख्या विविध सरकारी कार्यक्रमांद्वारे दीर्घकाळ सुरु राहील.

सीआयपीईटीने गेल्या पाच वर्षांत कौशल्य विकास कार्यक्रमांद्वारे तीन लाखांहून अधिक बेरोजगार / अल्प-रोजगार असणार्‍या तरुणांना प्रशिक्षण देऊन कौशल्य क्षेत्रात चांगली कामगिरी केली असल्याचे त्यांनी नमूद केले.

वाढत्या पेट्रोकेमिकल उद्योगाच्या कौशल्याची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी 2015-16 पासून 16 नवीन सीआयपीईटी केंद्रे सुरू केली गेली आहेत, हे लक्षात घेऊन सीआयपीईटी या क्षेत्रात आपल्या देशाचे तांत्रिक वर्चस्व प्रस्थापित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल अशी अपेक्षा उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली.

 

संपूर्ण भाषण पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

M.Iyangar/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1684153) Visitor Counter : 250