पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरच्या सर्व नागरिकांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने आयुष्मान भारत पीएम-जय सेहत योजनेचा प्रारंभ करताना केलेले भाषण
Posted On:
26 DEC 2020 11:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 डिसेंबर 2020
“आज मला जम्मू-कश्मीरच्या दोन लाभार्थ्यांशी आयुष्मान भारत योजनेसंबंधी त्यांचा अनुभव ऐकण्याची संधी मिळाली. माझ्यासाठी हे केवळ तुमचे अनुभव नाहीत. काम करताना, निर्णय घेताना कधी-कधी ज्यांच्यासाठी करतो, त्यांच्याकडून जेव्हा समाधानाचे शब्द ऐकायला मिळतात, तेव्हा ते शब्द माझ्यासाठी आर्शीवाद बनतात. मला गरीबांसाठी आणखी जास्त काम करण्यासाठी, आणखी मेहनत करण्यासाठी आणि धावण्यासाठी हे तुमचे आर्शीवाद मोठे बळ देतात. आणि योगायोगाने पहा, दोन्ही भाऊ , जम्मूवाले सज्जन आणि श्रीनगर वाले देखील, आपला छोटा व्यवसाय , कुणी एक वाहन चालवते तर दुसरा आणखी काही, मात्र संकट प्रसंगी ही योजना त्यांच्या जीवनात किती मोठे काम करत आहे. तुमचे म्हणणे ऐकून मला खूप छान वाटले. विकासाच्या योजनांचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचावा, गरीबातील गरीबांपर्यंत पोहचावा, प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहचावा, सर्वांपर्यंत पोहचावा यासाठी आमचे सरकार वचनबद्ध आहे. आज या समारंभाला उपस्थित माझे मंत्रिमंडळातील सहकारी गृह मंत्री अमित शाह, आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन, पंतप्रधान कार्यालयात माझ्याबरोबर राज्यमंत्री म्हणून काम करत असलेले जितेंद्र सिंह, जम्मू-कश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, संसदेतील माझे अन्य सहकारी, जम्मू -काश्मीरचे लोक प्रतिनिधिगण आणि माझे जम्मू-काश्मीरचे प्रिय बंधू आणि भगिंनीनो,
आजचा दिवस जम्मू काश्मीरसाठी खूप ऐतिहासिक आहे. आज जम्मू काश्मीरच्या सर्व लोकांना आयुष्मान योजनेचा मिळणार आहे. आरोग्य योजना - हे एक खूप मोठे पाऊल आहे. आणि जम्मू-काश्मीरला आपल्या लोकांच्या विकासासाठी हे पाऊल उचलताना पाहून मलाही खूप आनंद होत आहे. आणि म्हणूनच मनोज सिन्हा आणि त्यांच्या पूर्ण टीमचे, सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांचे, जम्मू-काश्मीरच्या नागरिकांचे माझ्या वतीने खूप-खूप अभिनंदन. तसेही माझी इच्छा होती की हा कार्यक्रम काल व्हावा. जर 25 तारखेला अटलजी यांच्या जन्मदिनी हे झाले असते मात्र माझ्या स्वतःच्या काही व्यस्ततेमुळे काल मी ते करू शकलो नाही. म्हणून मला आजची तारीख ठरवावी लागली. अटलजींचा जम्मू-काश्मीरशी एक विशेष स्नेह होता. अटलजी इंसानियत, जम्हूरियत आणि कश्मीरियत बाबत आम्हा सर्वाना पुढील कामांसाठी नियमितपणे मार्गदर्शक सूचना द्यायचे. हेच तीन मंत्र घेऊन आज जम्मू-काश्मीर, याच भावनेला मजबूत करत पुढे वाटचाल करत आहे.
मित्रांनो,
या योजनेच्या लाभांबाबत सविस्तर बोलण्यापूर्वी मी आज, मला संधी मिळाली आहे तुमच्याबरोबर सहभागी होण्याची, तर मी सांगू इच्छितो की मी जम्मू-काश्मीरच्या लोकांना लोकशाही मजबूत केल्याबद्दल अनेक-अनेक-अनेक-अनेक शुभेच्छा देतो. जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकांनी एक नवीन अध्याय लिहिला आहे. मी या निवडणुकांच्या प्रत्येक टप्प्यात पाहत होतो की इतक्या थंडीतही, कोरोना असूनही तरुण, वृद्ध, महिला मतदान केंद्रावर पोहचले आहेत. तासनतास रांगेत उभे आहेत. जम्मू -काश्मीरच्या प्रत्येक मतदाराच्या चेहऱ्यावर मला विकासासाठी एक आशा दिसून आली, उमेद दिसली. जम्मू कश्मीरच्या प्रत्येक मतदाराच्या डोळ्यांमध्ये मी भूतकाळाला मागे सारत उत्तम भविष्याचा विश्वास देखील पाहिला आहे.
मित्रांनो,
या निवडणुकांमध्ये जम्मू-काश्मीरच्या लोकांनी लोकशाहीची मुळे अधिक मजबूत करण्याचे काम केले आहे. आणि मी हे देखील सांगू इच्छितो की जम्मू-काश्मीरचे प्रशासन, सुरक्षा दल ज्याप्रकारे त्यांनी या निवडणुकांचे आयोजन केले आहे आणि सर्व पक्षांकडून ही निवडणूक खूपच पारदर्शक झाली, प्रामाणिकपणे झाली. हे जेव्हा मी ऐकतो तेव्हा इतका अभिमान वाटतो. कारण जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका निष्पक्ष होणे, स्वतंत्र होणे, ही गोष्ट जम्मू-कश्मीरकडून ऐकतो तेव्हा लोकशाहीच्या ताकदीवरील विश्वास आणखी मजबूत होतो. मी प्रशासनाचे, सुरक्षा दलांचेही खूप अभिनंदन करतो. तुम्ही छोटे काम केलेले नाही. खूप मोठे काम केले आहे. आज मी जर प्रत्यक्ष तिथे असतो तर सर्व प्रशासनातील लोकांची इतकी प्रशंसा केली असती, कदाचित माझे शब्द कमी पडले असते. एवढे मोठे काम तुम्ही केले आहे. तुम्ही देशात एक नवीन विश्वास निर्माण केला आहे. आणि याचे संपूर्ण श्रेय मनोज जी आणि त्यांचे सरकार, प्रशासनातील सर्व लोकांना जाते. भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे.
मित्रांनो
जम्मू-काश्मीरमध्ये ही त्रि-स्तरीय पंचायत व्यवस्था एक प्रकारे महात्मा गांधींचे ग्राम स्वराजचे स्वप्न आहे. एक प्रकारे या निवडणूका गांधीजींचे ग्राम स्वराजचे स्वप्न जिंकले आहे आणि देशात जी पंचायती राज व्यवस्था आहे, तिने आज जम्मू-काश्मीरच्या धरतीवर पूर्णत्व प्राप्त केले आहे. या नवीन दशकात, नव्या युगाच्या नवीन नेतृत्वाची सुरुवात आहे. मागील वर्षांमध्ये आम्ही जम्मू-काश्मीरमध्ये तळागाळापर्यंत लोकशाही संस्थांना मजबूत करण्यासाठी दिवस-रात्र प्रयत्न केले आहेत. आणि जम्मू-काश्मीरच्या बंधू-भगिनींना माहीतच असेल एक काळ होता, आम्ही लोक जम्मू-काश्मीरच्या सरकारचा भाग होतो, आमचे उप-मुख्यमंत्री होते, आमचे मंत्री होते, मात्र आम्ही ते सत्ता सुख सोडून दिले होते. आम्ही सरकारमधून बाहेर पडलो होतो. कोणत्या मुद्यावरून आलो होतो, तुम्हाला माहित आहे ना, आमचा मुद्दा हाच होता पंचायत निवडणुका घ्या, जम्मू-कश्मीरच्या गावागावांमधील नागरिकांना त्यांचा अधिकार द्या. त्यांना त्यांच्या गावाचा निर्णय करण्याची ताकद द्या. या मुद्द्यावरून आम्ही सरकार सोडून तुमच्याबरोबर रस्त्यावर येऊन उभे राहीलो आणि आज मला आनंद होत आहे कि तालुका स्तरावर, पंचायत स्तरावर किंवा मग जिल्हा स्तरावर तुम्ही ज्या लोकांना निवडले आहे, त्यापैकी बहुतांश तर तुमच्यामध्येच राहतात. ते तुमच्यातून बाहेर पडून निवडणुका जिंकले आहेत. त्यांनीही तो त्रास सहन केला आहे जो तुम्ही सहन केला आहे. त्यांची सुख-दुख, त्यांची स्वप्ने, त्यांच्या अपेक्षा देखील तुमचे सुख-दुख, तुमची स्वप्ने आणि अपेक्षांशी पूर्णपणे जुळतात. हे ते लोक आहेत ज्यांनी आपल्या नावाच्या बळावर नाही तर आपल्या कामाच्या जोरावर तुमचा आशीर्वाद घेऊ शकले आहेत आणि आज तुम्ही त्यांना तुमच्या प्रतिनिधित्वाचा अधिकार दिला आहे. आज तुम्ही ज्या युवकांना निवडले आहे ते तुमच्याबरोबर काम करतील तुमच्यासाठी काम करतील आणि जे लोक निवडून आले आहेत, त्यांचेही मी खूप-खूप अभिनंदन करतो. आणि जे यावेळी विजयी होऊ शकले नाहीत, त्यांनाही मी सांगेन की तुम्ही निराश होऊ नका, जनतेची सेवा निरंतर करत राहा. आज नाहीतर उद्या तुमच्या नशिबातही विजय येऊ शकतो. लोकशाहीत हेच होते, ज्याला संधी मिळेल तो सेवा करेल, ज्याला संधी मिळणार नाही त्याने सेवेच्या फळापासून जे वंचित राहिले आहेत त्यांच्यासाठी कायम सक्रिय राहावे. आगामी काळात तुम्ही त्यांना आपल्या क्षेत्राबरोबरच देशासाठी मोठ्या भूमिकांसाठी देखील तयार करत आहात. जम्मू-काश्मीरमधील या निवडणुकांनी हे देखील दाखवून दिले की आपल्या देशात लोकशाही किती मजबूत आहे. मात्र मी आज देशासमोर आणखी एक दुःख व्यक्त करू इच्छितो.
जम्मू-काश्मीरने तर केंद्रशासित प्रदेश बनल्यानंतर एका वर्षातच त्रि-स्तरीय पंचायती राज व्यवस्स्थेसाठी निवडणुका घेतल्या. त्या शांततेत पार पडल्याने लोकांना त्याचे अधिकार दिले. आता हेच निवडलेले लोक जम्मू-काश्मीरमधील आपल्या गावांचे,आपल्या जिल्ह्याचे, आपल्या तालुक्याचे भविष्य ठरवतील. मात्र दिल्लीत काही लोक सकाळ-संध्याकाळ दररोज मोदींवर टीका करत असतात. अपशब्दांचा वापर करतात आणि दररोज मला लोकशाही शिकवण्यासाठी रोज नवनवीन पाठ सांगत असतात. मी त्या लोकांना आज आरसा दाखवू इच्छितो. हे जम्मू-कश्मीर पहा, केंद्रशासित प्रदेश बनल्यानंतर एवढ्या कमी वेळेत त्यांनी त्रि-स्तरीय पंचायती राज व्यवस्था स्वीकारून काम पुढे नेले. मात्र दुसरीकडे विडम्बना पहा, पुडुचेरी मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असूनही पंचायत आणि महापालिका निवडणुका होत नाहीत आणि इथे मला रोज लोकशाहीचे पाठ शिकवत आहेत ना त्यांचा पक्ष सध्या तिथे सत्तेवर आहे. तुम्ही हैराण व्हाल. सर्वोच्च न्यायालयाने 2018 मध्ये हा आदेश दिला होता. मात्र तिथे जे सरकार आहे, ज्यांचा लोकशाहीवर कणभरही भरवसा नाही, हा मुद्दा कायम टाळत आहेत.
मित्रांनो,
पुदुचेरीमध्ये दशकांच्या प्रतीक्षेनंतर 2006 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका झाल्या होत्या. या निवडणुकांमध्ये जे निवडून आले त्यांचा कार्यकाळ 2011 मध्येच संपलेला आहे. काही राजकीय पक्षांच्या कथनी आणि करनीमध्ये किती मोठा फरक आहे, लोकशाहीप्रति ते किती गंभीर आहेत हे या गोष्टीवरूनही लक्षात येते. एवढी वर्षे झाली, पुदुच्चेरीमध्ये पंचायत वगैर निवडणुका होऊ दिल्या जात नाहीत.
बंधू आणि भगिनींनो ,
केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे की गावाच्या विकासात, गावातील लोकांची भूमिका सर्वात जास्त असावी. नियोजनापासून अंमलबजावणी आणि देखरेख पर्यंत पंचायती राजशी संबंधित संस्थांना जास्त अधिकार दिले जात आहेत. तुम्ही देखील पाहिले आहे, गरीबांशी निगडित गरजा पूर्ण करण्यासाठी पंचायतींची जबाबदारी आता किती वाढली आहे. याचा लाभ जम्मू काश्मीरमध्ये पहायला मिळत आहे. जम्मू काश्मीरच्या गावागावांमध्ये वीज पोहचली आहे. इथली गावे आज उघडयावरील शौचापासून मुक्त झाली आहेत. गावागावांपर्यंत रस्ते पोहचवण्यासाठी मनोज जी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण प्रशासन संकटांचा सामना करत वेगाने काम करत आहे. प्रत्येक घराला पाणीपुरवठा करण्याचे अभियान जम्मू कश्मीरमध्ये वेगाने सुरु आहे. पुढील 2-3 वर्षात राज्यतील प्रत्येक घरापर्यंत पाईपद्वारे पाणी पोहचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जम्मू-कश्मीरमध्ये स्थानिक प्रशासन मजबूत झाले तर विकास कामांमध्ये ते खूप मोठी तेजी घेऊन येईल.
मित्रांनो,
आज जम्मू-काश्मीरच्या लोकांचा विकास, आमच्या सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक आहे. मग ते महिला सशक्तिकरण असेल, युवकांसाठी संधी निर्माण करणे असेल, दलित-पीडित - शोषित-वंचितांच्या कल्याणाचे लक्ष्य असेल, किंवा मग लोकांचे घटनात्मक आणि मूलभूत अधिकार, आमचे सरकार राज्याच्या हिताचे अनेक निर्णय घेत आहे. आज पंचायती राज सारख्या लोकशाही संस्था आशेचा हाच सकारात्मक संदेश देत आहेत. आज आम्ही लोकांना हा विश्वास देण्यात यशस्वी झालो आहोत की परिवर्तन शक्य आहे आणि त्यांचे निवडून आलेले पसंतीचे प्रतिनिधि हे परिवर्तन घडवून आणू शकतात. वास्तविक पातळीवर लोकशाही आणून आम्ही लोकांच्या आकांक्षाना संधी देत आहोत. जम्मू-कश्मीरचा स्वतःचा आपला वारसा आहे आणि तिथले लोक आपला प्रदेश सशक्त करण्यासाठी विविध पद्धती अवलंबत आहेत, नवीन पद्धती सुचवत आहेत.
मित्रांनो,
जम्मू-काश्मीरची जीवन रेखा झेलम नदी, रावी, बियास, सतलजला मिळण्यापूर्वी अनेक उपनद्या देखील मिळतात आणि पुन्हा या सर्व नद्या महान सिंधु नदीत सामावून जातात. महान सिंधु नदी आपली सभ्यता, आपली संस्कृती आणि विकास यात्रेचा पर्याय आहे. अशाच प्रकारे विकासाची क्रांती देखील उपनद्या, सहाय्यक नद्यांप्रमाणे अनेक प्रवाहात येते आणि मग मोठा प्रवाह बनते. याच विचारासह आम्ही आरोग्य क्षेत्रातही परिवर्तन आणण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या सरकारने अनेक छोट्या छोट्या प्रवाहांप्रमाणे अनेक योजनांची सुरुवात केली आहे. आणि सर्वांचे एकच लक्ष्य आहे - आरोग्य क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणणे. जेव्हा आम्ही उज्वला योजनेअंतर्गत देशातील भगिनींना, मुलींना गॅस जोडणी दिली, तेव्हा याकडे केवळ इंधन पोहचवण्याची योजना म्हणून पाहिले जाऊ नये. आम्ही या माध्यमातून आपल्या बहिणी, मुलींना धुरापासून मुक्ती दिली, संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न केला. महामारी दरम्यान देखील इथे जम्मू-काश्मीर मध्ये सुमारे 18 लाख गैस सिलेंडर रिफिल करण्यात आले. त्याचप्रमाणे तुम्ही स्वच्छ भारत अभियानाचेच उदाहरण घ्या. या अभियानांतर्गत जम्मू काश्मीरमध्ये 10 लाख पेक्षा अधिक शौचालये बांधण्यात आली. मात्र याचा उद्देश केवळ शौचालय बांधण्यापुरता मर्यदित नव्हता, लोकांचे आरोग्य सुधारण्याचा देखील हा प्रयत्न आहे. शौचालयांमुळे स्वच्छता तर आलीच आहे, अनेक आजार देखील रोखता आले आहेत. आता याच मालिकेत आज जम्मू कश्मीर आयुष्मान भारत- सेहत योजना सुरु करण्यात आली आहे. तुम्ही विचार करा, जेव्हा या योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक व्यक्तीला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतील, तेव्हा त्यांचे आयुष्य किती सुकर होईल. आतापर्यन्त आयुष्मान भारत योजनेचा लाभ राज्यातील सुमारे 6 लाख कुटुंबांना मिळत होता. आता सेहत योजनेनंतर हा लाभ अंदाजे 21 लाख कुटुंबांना मिळेल.
मित्रांनो
मागील 2 वर्षांमध्ये, दीड कोटींहून अधिक गरीबांनी आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेतला आहे. यामुळे जम्मू काश्मीरच्या लोकांना कठीण प्रसंगात खूप दिलासा मिळाला आहे. इथल्या सुमारे 1 लाख गरीब रुग्णांवर रुग्णालयात 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करण्यात आले आहेत. यातही ज्या आजारांवर सर्वात जास्त उपचार केले जात आहेत, त्यात कर्करोग, हृदयरोग आणि हाडांसंबंधित आजार सर्वात जास्त आहेत. हे असे आजार आहेत ज्यावर होणारा खर्च कुणाही गरीबाची झोप उडवतो आणि आपण तर पाहिले आहे की कुणीही गरीब कुटुंब मेहनत करून थोडे वर आले आणि पुढे जायला लागले असताना जर कुटुंबात कुणी आजारी पडले तर तो पुन्हा गरीबीच्या जाळ्यात अडकतो.
बंधू-भगिनींनो,
जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यात हवा इतकी शुद्ध आहे, प्रदूषण इतके कमी आहे कि स्वाभाविकपणे कुणालाही वाटेल आणि मला तर नक्कीच वाटेल की तुम्ही नेहमी निरोगी राहावे. हो, आता मला समाधान आहे की आजाराच्या काळात आयुष्मान भारत- सेहत योजना एका मित्राप्रमाणे तुमच्या बरोबर असेल.
मित्रांनो
या योजनेचा आणखी एक लाभ होईल ज्याचा उल्लेख वारंवार केला जाणे आवश्यक आहे. तुमचे उपचार केवळ जम्मू कश्मीरच्या सरकारी आणि खासगी रुग्णालयांपर्यंत सीमित असणार नाहीत. तर देशभरात या योजनेंतर्गत जी हजारो रुग्णालये संलग्न आहेत तिथेही ही सुविधा तुम्हाला मिळू शकेल. समजा तुम्ही मुंबईला गेला आहात आणि अचानक गरज भासली तर हे कार्ड मुंबईतही तुम्हाला उपयोगी पडेल. तुम्ही चेन्नईला गेलात तर तिथेही ते उपयोगी पडेल, तिथल्या रुग्णालयातही मोफत तुमची सेवा करेल. तुम्ही कोलकात्याला गेला असाल तर तिथे कठीण असेल, कारण तिथले सरकार आयुष्मान योजनेत सहभागी नाही, काही लोक असतात, काय करणार. देशभरात अशी 24 हजार पेक्षा अधिक रुग्णालये आहेत जिथे आरोग्य योजनेंतर्गत तुम्ही इलाज करून घेऊ शकता. काही बंधने नाहीत, अडवणारे नाहीत. कुणालाही कमीशन नाही, कटचा तर नामोनिशाण नाही , काहीही शिफारस नाही, कुठलाही भ्रष्टाचार नाही. सेहत योजनेचे कार्ड दाखवून तुम्हाला प्रत्येक ठिकाणी उपचारांची सुविधा मिळेल.
मित्रांनो,
जम्मू-काश्मीर आता देशाच्या विकासाबरोबर खांद्याला खांदा भिडवून वाटचाल करत आहे. कोरोना संदर्भातही जयपरकरे राज्यात काम झाले आहे ते प्रशंसनीय आहे. मला सांगण्यात आले आहे कि 3 हजारांहून अधिक डॉक्टर, 14 हजारांहून अधिक निमवैद्यकीय कर्मचारी, आशा कार्यकर्ता, रात्रंदिवस झटत होते आणि आताही झटत आहेत. तुम्ही खूप कमी वेळेत राज्यातील रुग्णालयांना कोरोना विरोधात लढण्यासाठी सज्ज केले. अशाच व्यवस्थेमुळे कोरोनाचे जास्तीत जास्त रुग्ण वाचवण्यात आपल्याला यश आले.
बंधू आणि भगिनींनो ,
जम्मू काश्मीरमध्ये आरोग्य क्षेत्राकडे आज जितके लक्ष दिले जात हे, तितके यापूर्वी कधीही देण्यात आलेले नाही. आयुष्मान भारत योजने अंतर्गत राज्यात 1100 पेक्षा अधिक आरोग्य आणि कल्याण केंद्र स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे. यापैकी 800 पेक्षा अधिक केंद्रांचे काम पूर्ण झाले आहे. जन औषधी केंद्रांवर खूप कमी दरात मिळत असलेली औषधे आणि मोफत डायलिसिसच्या सुविधेने हजारो लोकांना लाभ पोहचवला आहे. जम्मू आणि श्रीनगर विभागात दोन्ही ठिकाणी 2 कर्करोग संस्था देखील उभारण्यात येत आहेत. दोन एम्स उभारण्याचे कामही वेगाने सुरु आहे. युवकांना वैद्यकीय आणि निम-वैद्यकीय शिक्षणासाठी जम्मू कश्मीर मध्येच जास्तीत जास्त संधी मिळावी यासाठी देखील काम सुरु आहे. जम्मू काश्मीरमध्ये 7 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी मिळाली आहे. यामुळे MBBS च्या जागा दुपटीने अधिक वाढतील. याशिवाय ज्या 15 नवीन नर्सिंग महाविद्यालयांना मंजुरी देण्यात आली आहे, त्यातून युवकांसाठी नव्या संधी निर्माण होतील. याव्यतिरिक्त जम्मूमध्ये आयआयटी आणि आयआयएम ची स्थापना देखील इथल्या युवकांना उच्च शिक्षणाच्या उत्तम संधी उपलब्ध करून देईल. राज्यात क्रीडा सुविधा वाढवणायसाठी जे प्रकल्प सुरु आहेत ते इथल्या गुणवत्तेला क्रीडा विश्वात दबदबा निर्माण करण्यात मदत करतील.
बंधू आणि भगिनींनो ,
आरोग्याबरोबरच अन्य पायाभूत विकासात देखील नव्या जम्मू काश्मीरची पावले वेगाने पुढे जात आहेत. मागील 2-3 वर्षात यासंदर्भात कशी तेजी आली आहे याचे एक उत्तम उदाहरण जलविद्युत हे आहे. 7 दशकांमध्ये जम्मू कश्मीरमध्ये साडेतीन हजार मेगावॅट वीज निर्मिती क्षमता तयार करण्यात आली होती. मागील 2-3 वर्षांमध्येच यात 3 हजार मेगावॅट आम्ही आणखी जोडली. पंतप्रधान विकास पॅकेज अंतर्गत सुरु असलेल्या प्रकल्पांवरही आता खूप वेगाने काम सुरु आहे. विशेषतः संपर्क सुविधेशी संबंधित प्रकल्पांमुळे राज्याचे चित्र आणि नशीब दोन्ही पालटणार आहे. मी चिनाब नदीवर बांधण्यात येत असलेल्या उत्तम रेलवे पुलाची छायाचित्रे पाहिली आहेत. आणि आजकाल तर सोशल मिडियावर तर बहुधा भारतातील प्रत्येकाने पाहिली असतील. ती छायाचित्रे पाहून कोणत्या नागरिकांची मान अभिमानाने उंचावणार नाही. आगामी 2-3 वर्षात हे खोरे रेल्वेशी जोडले जावे यासाठी रेलवे पूर्ण प्रयत्न करत आहे. जम्मू आणि श्रीनगरमध्ये लाइट रेल ट्रांज़िट मेट्रो संदर्भात बोलणी सुरु आहेत. बनिहाल बोगद्याचे काम देखील पुढील वर्षापर्यंत पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जम्मू मध्ये जे सेमी रिंग रोडचे काम सुरु आहे, ते देखील लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
मित्रांनो,
संपर्क व्यवस्था जेव्हा उत्तम असते तेव्हा त्यामुळे पर्यटन आणि उद्योग दोन्हींना बळ मिळते. पर्यटन ही जम्मूची देखील ताकद आहे. वाहतुकीच्या ज्या प्रकल्पांवर सरकार काम करत आहे, त्यामुळे जम्मूला देखील लाभ होईल आणि काश्मीरला देखील लाभ होईल. कालीन पासून केसर पर्यंत, सफरचंदापासून बासमती पर्यंत जम्मू कश्मीरमध्ये काय नाही ? कोरोनामुळे झालेल्या लॉकडाउन काळात देखील सरकारने याकडे लक्ष दिले की इथल्या सफरचंद उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी कमी व्हाव्यात. बाजारपेठेत योग्य पद्धतीने वेळेवर माल पोहचावा यासाठी आमच्या सरकारने काही महिन्यांपूर्वी हा देखील निर्णय घेतला कि सफरचंद खरेदीसाठी बाजार हस्तक्षेप योजना गेल्यावर्षी प्रमाणे याहीवर्षी लागू असेल. या अंतर्गत सरकार द्वारा सफरचंदांची खरेदी नाफेडच्या माध्यमातून आणि थेट शेतकऱ्यांकडून केली जात आहे. जी सफरचंद खरेदी केली जात आहेत, त्याचे पैसे देखील थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवले जात आहेत. या योजनेअंतर्गत 12 लाख मेट्रिक टन सफरचंदाची खरेदी केली असून जम्मू-कश्मीरच्या शेतकऱ्यांना एक प्रकारे ही खूप मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. आमच्या सरकारने नाफेडला यासाठी देखील मान्यता दिली आहे की ते 2500 कोटी रुपयांच्या सरकारी हमीचा उपयोग करु शकतील. सफरचंदाच्या खरेदीसाठी आधुनिक विपणन मंच उपलब्ध करून देण्यासाठी, वाहतुकीची सुविधा वाढवण्यावर सरकारने सातत्याने प्रगती केली आहे. सफरचंदाच्या साठवणुकीसाठी सरकार जी मदत करत आहे, त्यामुळेही शेतकऱ्यांना खूप लाभ झाला आहे. इथे नव्या शेतकरी उत्पादक संघ- FPO's ची निर्मिती व्हावी, जास्तीत जास्त बनाव्यात यासाठी देखील प्रशासन निरंतर प्रयत्न करत आहे. नव्या कृषी सुधारणांमुळे जम्मू मध्येही आणि खोऱ्यातही खाद्य प्रक्रिया उद्योगासाठी नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. यामुळे हजारो लोकांना, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी मिळणार आहेत.
बंधू आणि भगिनींनो,
आज जम्मू-कश्मीरमध्ये जिथे एकीकडे हजारो सरकारी नोकऱ्या अधिसूचित केल्या जात आहेत. तर दुसरीकडे स्वयंरोजगारासाठी देखील पावले उचलली जात आहेत. बँकांच्या माध्यमातून आता जम्मू काश्मीरच्या युवा उद्योजकांना सुलभपणे कर्ज मिळणे सुरु झाले आहे. यातही आपल्या भगिनी, ज्या बचत गटांशी जोडलेल्या आहेत त्या मोठ्या संख्येने पुढे येत आहेत.
मित्रांनो,
पूर्वी देशासाठी बहुतांश ज्या योजना तयार केल्या जायच्या, जे कायदे तयार केले जात होते त्यात लिहिलेले असायचे -Except J and K. आता ही गोष्ट इतिहासजमा झाली आहे. शांतता आणि विकासाच्या ज्या मार्गावर जम्मू आणि काश्मीर पुढे जात आहे त्यामुळे राज्यात नवीन उद्योग येण्याचा मार्ग देखील सुकर झाला आहे. आज जम्मू-कश्मीर आत्मनिर्भर भारत अभियानात आपले योगदान देत आहे. पूर्वी 170 पेक्षा अधिक केंद्रीय कायदे जे पूर्वी लागू नव्हते ते आता प्रशासकीय कामकाजाचा भाग बनले आहेत. जम्मू-कश्मीरच्या नागरिकांना अधिकाराची संधी आहे.
मित्रांनो,
आमच्या सरकारच्या निर्णयानंतर प्रथमच जम्मू कश्मीरच्या गरीब सामान्य वर्गाला आरक्षणाचा लाभ मिळाला आहे. प्रथमच डोंगराळ भागातील लोकांना आरक्षणाचा लाभ मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवर राहणाऱ्याना देखील 4 टक्के आरक्षणाचा लाभ आमच्या सरकारने दिला आहे. वन कायदा लागू झाल्यामुळे देखील लोकांना नवीन अधिकार मिळाले आहेत. यामुळे गुज्जर बकरवाल, अनुसूचित जमाती आणि पारंपरिक रित्या जंगलांच्या आसपास राहणाऱ्यांना वन जमिनीच्या वापराचा कायदेशीर अधिकार मिळाला आहे. आता कुणाबरोबरही भेदभाव होणार नाही. जम्मू कश्मीर मध्ये दशकांपासून राहत असलेल्या सहकाऱ्यांना अधिवास प्रमाणपत्र देखील दिली जात आहेत. हेच तर आहे सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास.
मित्रांनो,
सीमेपलिकडून होणारा गोळीबार नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. गोळीबाराच्या समस्येच्या निराकरणासाठी सीमेवर बंकर उभारण्याचे काम जलद गतीने केले जात आहे. सांबा, पुंछ, जम्मू, कठुआ आणि राजौरी सारख्या संवेदनशील ठिकाणी मोठ्या संख्येने न केवळ बंकर बांधण्यात आले तर नागरिकांच्या सुरक्षेसाठी सैन्य आणि सुरक्षा दलांना देखील खुली सूट देण्यात आली आहे.
मित्रांनो,
आपल्या देशात ज्या लोकांनी अनेक दशके राज्य केले, त्यांची एक खूप मोठी चूक ही देखील होती कि त्यांनी देशाच्या सीमावर्ती म्हणजे सीमेलगतच्या भागांच्या विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्यांच्या सरकारच्या या मानसिकतेमुळे जम्मू-कश्मीर असो किंवा ईशान्य प्रदेश असो, हा भाग मागासलेला राहण्यासाठी प्रवृत्त केले गेले. आयुष्यातील पायाभूत गरजा, एक सन्मानजनक जीवनाच्या गरजा, विकासाच्या गरजा, इथल्या सामान्य माणसापर्यंत तेवढ्या पोहचल्या नाहीत, जेवढ्या पोहचायला हव्या होत्या. अशी मानसिकता कधीही देशाचा संतुलित विकास करू शकत नाही. अशा नकारात्मक विचारांना आपल्या देशात अजिबात स्थान नाही. सीमेजवळही नाही, सीमेपासून दूर देखील नाही. देशातील कुठलाही भाग विकासाच्या प्रवाहात आता आणखी वंचित राहणार नाही यासाठी आमचे सरकार वचनबद्ध आहे. या भागांमधील लोकांचे उत्तम जीवन भारताच्या एकता आणि अखंडतेला देखील बळकट करेल.
मित्रांनो,
देशाच्या या भागाचा विकास व्हावा, जम्मूचा विकास व्हावा ,या काश्मीरचा विकास व्हावा यासाठी आपल्याला निरंतर काम करायचे आहे. पुन्हा एकदा मी मनोज सिन्हा यांचे आणि त्यांच्या टीमचे आज अभिनंदन करतो. जेव्हा मी मनोज यांचे भाषण ऐकत होतो, किती कामे त्यांनी सांगितली आणि जम्मू-कश्मीरच्या लोकांमध्ये उपस्थित राहून त्यांनी याचा उल्लेख केला. ज्या गतीने कामे सुरु आहेत, संपूर्ण देशात एक नवा विश्वास, नवी आशा निर्माण करेल, आणि मला विश्वास आहे, जम्मू-काश्मीरच्या नागरिकांचे अनेक दशकांचे जे काम अपूर्ण राहिले आहे ते मनोज जी आणि वर्तमान प्रशासन चमूच्या माध्यमातून नक्कीच पूर्ण होईल, वेळेच्या आधी पूर्ण होईल. असा मला पूर्ण विश्वास आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वाना सेहत योजनेसाठी, आयुष्मान भारत योजनेसाठी खूप-खूप शुभेच्छा देतो. माता वैष्णो देवी आणि बाबा अमरनाथ यांचा वरदहस्त आपणा सर्वांवर कायम राहो. याच अपेक्षेसह
खूप-खूप धन्यवाद !
* * *
G.Chippalkatti/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1683972)
Visitor Counter : 259
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam