पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 27 डिसेंबर, 2020 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधन

Posted On: 27 DEC 2020 12:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 डिसेंबर 2020

 

माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. आज 27 डिसेंबर आहे. चार दिवसांनी 2021 सुरू होणार आहे. आजची 'मन की बात' ही एकप्रकारे 2020 ची शेवटची 'मन की बात' आहे. पुढील 'मन की बात' 2021 मध्ये सुरू होईल. मित्रांनो, माझ्यासमोर तुमची असंख्य पत्रे आहेत. आपण Mygov वर पाठविलेल्या सूचनासुद्धा माझ्यासमोर आहेत. अनेक लोकांनी दुरध्वनी करून आपले म्हणणे सांगितले आहे. बर्याच संदेशांमध्ये मागील वर्षाचे अनुभव आणि 2021 शी संबंधित संकल्प यांच्या बद्दल लिहिले आहे. अंजली जी यांनी कोल्हापूरहून लिहिले आहे की, आपण नेहमीच एकमेकांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा देतो, पण यावेळी आपण काहीतरी नवीन करूया. आपण यावर्षी आपल्या देशाला शुभेच्छा देऊया, त्याचे अभिनंदन करूया. अंजली जी, खरोखर ही एक चांगली कल्पना आहे. आपला देश, 2021 मध्ये यशाची नवी शिखरे पादाक्रांत करेल, संपूर्ण जगात भारताची ओळख निर्माण होईल आणि त्याचे स्थान अधिक सशक्त व्हावे, याहून अधिक मोठी इच्छा दुसरी कोणती असू शकते.

मित्रांनो,

मुंबईच्या अभिषेक जी यांनी नमोॲप वर एक संदेश पाठवला आहे. त्यांनी लिहिले आहे की 2020 ने आम्हाला जे काही दाखवले, जे शिकवले त्याचा कधी विचार देखील केला नव्हता. त्यांनी कोरोनाशी संबंधित सर्व गोष्टी लिहिल्या आहेत. या सगळ्या पत्रांमध्ये, या संदेशांमध्ये, मला एक गोष्ट समान दिसून आली आहे, मला एक विशेष गोष्ट दिसते आहे, ती मी आज आपल्यासोबत सामायिक करू इच्छितो. बहुतेक पत्रांमध्ये लोकांनी देशाचे सामर्थ्य, देशवासीयांच्या सामूहिक शक्तीचे कौतुक केले आहे. जनता कर्फ्यूसारखा अभिनव प्रयोग जेव्हा संपूर्ण जगासाठी प्रेरणा बनला, देशवासीयांनी जेव्हा टाळ्या वाजवून, थाळ्या वाजवून आपल्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान करून आपली एकता दाखविली होती या सर्व गोष्टींचे लोकांनी स्मरण केले आहे.

मित्रांनो,

देशातील सामान्यातील सामान्य माणसाला हा बदल जाणवला आहे. मी देखील देशात आशेचा एक अद्भुत प्रवाह पाहिला आहे. अनेक आव्हाने आली. बर्याच समस्याही आल्या. कोरोनामुळे जगातील पुरवठा साखळीत देखील अनेक अडथळे आले, परंतु आम्ही प्रत्येक संकटापासून नवीन धडे घेतले. देशात एक नवीन क्षमता देखील जन्माला आली. जर तुम्हाला हे शब्दांतच सांगायचे असेल तर या क्षमतेचे नाव आहे ‘आत्मनिर्भरता’.

मित्रांनो,

दिल्लीमध्ये राहणाऱ्या अभिनव बॅनर्जी यांनी त्यांचा जो अनुभव मला पाठविला आहे, तो खूप मनोरंजक आहे. अभिनव यांना आपल्या नातेवाईकांच्या मुलांना काही भेटवस्तू म्हणून काही खेळणी द्यायची होती,  खेळणी खरेदी करण्यासाठी ते दिल्लीच्या झंडेवालान बाजारात गेले. आपल्यातील बर्याच जणांना हे माहित असेलच की दिल्लीमध्ये हा बाजार सायकल आणि खेळण्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे. पूर्वी महागड्या खेळण्यांचा अर्थ म्हणजे बाहेरून आयात केलेली खेळणी असाच होता आणि स्वस्त खेळणी देखील बाहेरून येत असत. पण, अभिनव यांनी पत्रात लिहिले आहे की, आता तिथले बरेच दुकानदार ग्राहकांना खेळणी विकताना खेळणी दाखवून असे सांगताना की ही खेळणी खूप छान आहेत, कारण ही 'मेड इन इंडिया' आहेत. ग्राहकही भारतात बनवलेल्या खेळण्यांची मागणी करत आहेत. विचारांमध्ये घडून आलेला हा खूप मोठा बदल आहे –आणि हा एक उत्तम पुरावा आहे. देशवासीयांच्या मानसिकतेत किती मोठा बदल घडून येत आहे आणि तोही एका वर्षाच्या आत. या बदलाचे मूल्यांकन करणे सोपे नाही. अर्थशास्त्रज्ञसुद्धा स्वतःचे आराखडे मांडून यांचे मोजमाप करू शकत नाहीत.

मित्रांनो,

विशाखापट्टणम मधून व्यंकट मुरलीप्रसाद यांनी मला पत्र पाठविले आहे, यामध्ये देखील एक वेगळी कल्पना आहे. व्यंकट यांनी लिहिले आहे की, मी तुम्हाला ट्वेंटी ट्वेंटी वन साठी दोन हजार एकवीस साठी माझा एबीसी जोडतो. मला सुरुवातीला काहीच कळले नाही, एबीसी म्हणजे त्यांना नक्की काय म्हणायचे आहे. मग मी पाहिले की वेंकटजींनी त्यांच्या पत्राला एक चार्ट देखील जोडला आहे. मी तो  चार्ट नीट पहिला आणि मग मला एबीसी म्हणजे काय ते समजले –आत्मनिर्भर भारत चार्ट....एबीसी. हे खूप मनोरंजक आहे. व्यंकट यांनी त्यांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूंची एक यादी तयार केली होती. यात इलेक्ट्रॉनिक्स, स्टेशनरी, सेल्फ केअर आयटम आणि बऱ्याच गोष्टींचा समावेश होता. यात त्यांनी नमूद केले होते कि आपण कळत-नकळत अशी परदेशी उत्पादने वापरत आहेत ज्यांचे पर्याय भारतात सहज उपलब्ध आहेत. आता त्यांनी शपथ घेतली आहे की आपल्या देशवासीयांनी घाम गाळून कठोर परिश्रम करून तयार केलेली उत्पादनच वापरेन.

मित्रांनो,

परंतु, या सगळ्यासोबत त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली आहे जी मला खूप मजेशीर वाटते. त्यांनी लिहिले आहे की आम्ही आत्मनिर्भर भारताला पाठिंबा देत आहोत, पण आमच्या उत्पादकांनीही ते तयार करत असलेल्या उत्पादनांच्या गुणवत्तेशी तडजोड करू नये असे त्यांना स्पष्ट शब्दात सांगण्यात यावे. ही गोष्ट तर अगदी बरोबर आहे. Zero effect, zero defect या कल्पनेसह काम करण्याची ही योग्य वेळ आहे. मी देशाच्या उत्पादक आणि उद्योजकांना विनंती करतो : देशातील लोकांनी ठोस पावले उचलली आहेत. Vocal for local हा मंत्र घराघरात गजबजत आहे.अशावेळी आपली उत्पादने जागतिक दर्जाची असली पाहिजेत याची खात्री करण्याची वेळ आली आहे. जे काही जगात सर्वोत्तम आहे ते आम्ही भारतात उत्पादित करून दाखवू. यासाठी आमच्या उद्योजकांना पुढे यावे लागेल. स्टार्ट अपना देखीळ पुढे यावे लागेल. मी पुन्हा एकदा वेंकटजींचे त्यांच्या उत्तम प्रयत्नांसाठी अभिनंदन करतो.

मित्रांनो,

आपल्याला ही भावना कायम राखायची आहे, त्याचे जतन करायचे आहे आणि ही भावना वृद्धिंगत देखील करायची आहे. मी हे आधी देखील सांगितले आहे आणि मी देशवासियांना विनंती करतो. तुम्ही देखील एक यादी तयार करा. तुमच्या दैनंदिन आयुष्यात लागणाऱ्या गोष्टींची व्यवस्थित पडताळणी करा आणि लक्षपूर्वक बघा की, कळत-नकळत अशा कोणत्या परदेशी वस्तू आहेत ज्यांनी  आपल्या आयुष्यात प्रवेश केला आहे. एक प्रकारे, त्यांनी आपल्याला जखडून ठेवले आहे. त्या गोष्टींसाठी भारतात बनविलेले पर्याय शोधा आणि हेही ठरवा की आता आपण भारतात उत्पादित, भारतातील कष्टकरी लोकांनी त्यांच्या कष्टाने बनविलेल्या उत्पादनांचा वापर करू. आपण दरवर्षी नवीन वर्षाचा संकल्प करतो, यावेळी आपण आपल्या देशासाठी देखील एक संकल्प करणे आवश्यक आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो,

अत्याचारी लोकांपासून आपल्या देशातील हजारो वर्ष जुनी संस्कृती, सभ्यता, आपल्या परंपरा वाचविण्यासाठी अनेक लोकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे, आजचा दिवस त्याचे स्मरण करण्याचा आहे. याच दिवशी, गुरु गोबिंद यांचे पुत्र, साहिबजादे जोरावर सिंह आणि फतेह सिंग यांना जिवंत भिंतीत पुरले होते. साहिबजादे यांनी आपली शिकवण सोडून द्यावी, थोर गुरुपरंपरा सोडावी अशी या अत्याचारी लोकांची इच्छा होती. परंतु, आमच्या साहिबजादे यांनी इतक्या लहान वयात कमालीचे धैर्य व इच्छाशक्ती दाखविली. त्यांना भिंतीत पुरले जात होते, एकएक दगड लावला जात होता, भिंत वरवर बांधली जात होती, समोर मृत्यू दिसत होता, परंतु ते जरा देखील विचलित झाले नाहीत. या दिवशी गुरु गोविंदसिंग जी – यांची आई गुजरी या देखील शहीद झाल्या होत्या. साधारण आठवडाभरापूर्वी श्रीगुरू तेग बहादुर जी यांची पुण्यतिथी होती. मला दिल्ली येथील गुरुद्वारा रकबगंज येथे जाऊन गुरु तेग बहादुरजींचे दर्शन घेऊन त्यांची पुढे नतमस्तक होण्याची संधी मिळाली. याच महिन्यात श्री गुरु गोविंदसिंग जी यांच्या पासून प्रेरित होऊन अनेक लोक जमिनीवर झोपतात. श्री गुरु गोविंदसिंग जी यांच्या कुटुंबाने जे बलिदान दिले आहे त्याचे लोक आस्थेने स्मरण करतात. या बलिदानाने संपूर्ण मानवतेला, देशाला एक नवीन शिकवण दिली आहे. या बलिदानाने आपली संस्कृती सुरक्षित ठेवण्याचे मोठे कार्य केले आहे. आम्ही सर्व जण या बलीदानाचे ऋणी आहोत. मी पुन्हा एकदा श्री गुरु तेग बहादुर जी, माता गुजरी जी, गुरु गोविंदसिंग जी आणि चार साहिबजादे यांच्या बलिदानाला नमन करतो. त्याचप्रमाणे अनेक हुतात्म्यांनी आपल्या आजच्या या भारताच्या स्वरूपाचे रक्षण केले आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो,

आता मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही आनंदी देखील व्हाल आणि तुम्हाला  अभिमान देखील वाटेल. 2014-18 दरम्यान भारतातील बिबट्यांची संख्या 60 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. 2014 मध्ये देशात बिबट्यांची संख्या सुमारे 7,900 होती, तर 2019 मध्ये ही संख्या वाढून 12,852 झाली. जिम कॉर्बेटने बिबट्याबद्दल म्हटले आहे : “ज्यांनी बिबट्याला मुक्तपणे फिरताना पाहिले नाहीत, ते त्याच्या सौंदर्याची कल्पनाही करू शकत नाहीत. त्याच्या रंगांचे सौंदर्य आणि त्याच्या चालण्याच्या मोहकपणाची कल्पना करू शकत नाही. "देशातील बर्याच राज्यांत, विशेषत: मध्य भारतात, बिबट्यांची संख्या वाढली आहे. बिबट्यांची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यात मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र अव्वल स्थानी आहेत. ही एक मोठी कामगिरी आहे. अनेक वर्षांपासून जगभरात बिबट्याला अनेक धोक्यांना सामोरे जावे लागत आहे, जगभरातील त्यांचे वास्तव्य धोक्यात आले होते. अशा वेळी बिबट्यांची संख्या सातत्याने वाढवून भारताने संपूर्ण जगाला एक मार्ग दाखविला आहे. तुम्हाला हेही ठाऊक असेल की गेल्या काही वर्षांत भारतातील सिंहांची संख्या देखील वाढली आहे, वाघांची संख्याही वाढली आहे, तसेच भारतीय वनक्षेत्रही वाढले आहे. केवळ सरकारच नाही तर बरेच लोक, नागरी संस्था आणि बर्याच संस्था देखील आपले वृक्ष आणि वन्यजीव यांच्या संरक्षणामध्ये सहभागी झाले आहेत यामुळे हे शक्य झाले आहे. हे सर्व अभिनंदनास पात्र आहेत.

मित्रांनो,

तामिळनाडूच्या कोयंबटूरमधील एका हृदयस्पर्शी प्रयत्नाबद्दल मी वाचले. सोशल मीडियावरही तुम्ही त्याचे व्हिज्युअल पाहिले असतीलच. आपण सर्वांनी माणसांसाठी वापरली जाणारी व्हीलचेयर पाहिली आहे, पण कोयंबटूर येथील गायत्री या मुलीने वडिलांसह एका पीडित कुत्र्यासाठी व्हीलचेयर बनविली आहे. ही संवेदनशीलता प्रेरणादायक आहे आणि व्यक्तीच्या मनात जेव्हा प्रत्येकासाठी दया आणि करुणा असेल तेव्हाच हे शक्य आहे. दिल्ली एनसीआर आणि देशातील इतर शहरांमध्ये कडाक्याच्या थंडीत बरेच लोक बेघर जनावरांची काळजी घेण्यासाठी खूप प्रयत्न करीत आहेत. ते त्या प्राण्यांच्या खाण्यापिण्याची आणि त्यांच्यासाठी स्वेटर आणि झोपण्याची व्यवस्था करत आहेत. काही लोक तर दररोज शेकडो प्राण्यांसाठी जेवण तयार करतात. अशा प्रयत्नांचे कौतुक केले पाहिजे. असेच काही उदात्त प्रयत्न उत्तर प्रदेशातील कौशांबी येथेही केले जात आहेत. तिथल्या कारागृहातील कैदी थंडीपासून गायींचे संरक्षण करण्यासाठी जुन्या व फाटलेल्या ब्लँकेपासून नवीन कवर तयार करत आहेत. हे ब्लँकेट कौशांबीसह इतर जिल्ह्यांच्या तुरूंगातून गोळा करून नंतर ते शिवून गोशाळेत पाठवले जातात. कौशांबी कारागृहातील कैदी दर आठवड्याला अनेक कवर तयार करत आहेत. इतरांची काळजी घेण्यासाठी सेवाभावनेतून केलेल्या प्रयत्नांना प्रोत्साहित करूया. खरंच हे एक असे पुण्य कर्म आहे जे  समाजाच्या भावना बळकट करते.

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

आता जे पत्र माझ्यासमोर आहे, त्यात दोन मोठे फोटो आहेत. हे फोटो एका मंदिराचे आहेत आणि आधीचे आणि नंतरचे असे आहेत. या फोटोंबरोबर जे पत्र आहे, त्यामध्ये युवकांच्या अशा एका टीमबाबत सांगितले आहे, जे स्वतःला युवा ब्रिगेड असे म्हणतात. तर या युवा ब्रिगेडने  कर्नाटकात,  श्रीरंगपट्णच्या जवळ स्थित वीरभद्र स्वामी नावाच्या एका प्राचीन शिवमंदिराचा कायापालट केला आहे. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर वाळलेले गवत आणि झुडपांनी भरलेला होता, एवढा की वाटसरू देखील सांगू शकले नसते कि इथे मंदिर आहे. एके दिवशी काही पर्यटकांनी या विस्मृतीत गेलेल्या मंदिराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला.  युवा ब्रिगेडने जेव्हा हा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिला तेव्हा त्यांना राहवलं नाही. आणि मग या टीमनं एकत्रितपणे त्याचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला.  त्यांनी मंदिर परिसरात उगवलेली काटेरी झुडपे, गवत आणि रोपं बाजूला हटवली.  जिथे दुरुस्ती आणि बांधकामाची गरज होती , ते केलं. त्यांचे चांगलं काम पाहून स्थानिक लोकांनीही मदतीचे हात पुढे केले. कुणी सिमेंट दिलं तर कुणी रंग दिला, अशा अनेक गोष्टींसह लोकांनी आपापलं योगदान दिल. हे सर्व युवक विविध व्यवसायाशी जोडलेले आहेत. त्यातून त्यांनी आठवड्याच्या शेवटी वेळ काढला आणि मंदिरासाठी काम केलं. युवकांनी मंदिरात  दरवाजा बसवण्याबरोबरच विजेची जोडणी देखील केली. अशा प्रकारे त्यांनी मंदिराचं गतवैभव पुनर्स्थापित करण्याचं काम केलं.  आवड आणि दृढ़निश्चय या अशा दोन गोष्टी आहेत ज्यामुळे लोक प्रत्येक लक्ष्य साध्य करू शकतात. जेव्हा मी भारताच्या युवकांना पाहतो, तेव्हा स्वतःला आनंदी आणि आश्वस्त जाणवतं.  आनंदी आणि आश्वस्त अशासाठी कारण, माझ्या देशातील युवकांमध्ये ' करू शकतो ' हा दृष्टिकोन आहे, आणि 'करेन' ही भावना आहे. त्यांच्यासाठी कोणतंही आव्हान मोठं नाही. त्यांच्या आवाक्यापासून काहीही दूर नाही. मी तामिळनाडूच्या एका शिक्षिकेबाबत वाचलं होत. त्यांचं नाव हेमलता एन. के आहे, ज्या विडुपुरमच्या एका शाळेत जगातील सर्वात प्राचीन भाषा तामिळ शिकवतात. कोविड-19 महामारी देखील त्यांच्या अध्यापनाच्या कामाच्या आड येऊ शकली नाही. हो, त्यांच्यासमोर आव्हानं नक्कीच होती, मात्र त्यांनी एक अभिनव मार्ग काढला. त्यांनी, अभ्यासक्रमातील सर्व 53 (त्रेपन्न) धडे रेकॉर्ड केले  , ऍनिमेटेड  व्हिडिओ तयार केले, आणि ते एका पेन  ड्राइव्ह मध्ये घेऊन आपल्या विदयार्थ्यांना वाटले. यामुळे त्यांच्या विद्यार्थ्यांना खूप मदत झाली.  त्यांना ते बघूनही धडे समजायला लागले. त्याचबरोबर, त्या आपल्या विद्यार्थ्यांशी दूरध्वनीवरून देखील बोलत असायच्या. यामुळे विद्यार्थ्यांसाठी अभ्यास खूप रोचक झाला. देशभरात कोरोनाच्या या काळात शिक्षकांनी ज्या अभिनव पद्धती अवलंबल्या, अभ्यासक्रमाची सामुग्री सृजनात्मकरित्या तयार केली. ती ऑनलाईन शिक्षणाच्या या काळात अमूल्य आहे. माझी सर्व शिक्षकांना विनंति आहे की त्यांनी ही अभ्यास सामुग्री शिक्षण मंत्रालयाच्या  दीक्षा पोर्टलवर नक्की अपलोड करावी. यामुळे देशाच्या दुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थी-विद्यर्थिनीना बराच फायदा होईल.

मित्रांनो,

चला, आता बोलूया झारखंडच्या कोरवा जमातीच्या हीरामन यांच्याशी...   हीरामन जी, गढ़वा जिल्ह्यातील सिंजो गावात राहतात. तुम्ही हे ऐकून हैराण व्हाल की कोऱवाची लोकसंख्या केवळ 6 हजार आहे, जी शहरांपासून दूर डोंगर आणि जंगलांमध्ये वास्तव्य करते. आपल्या समाजाची संस्कृती आणि ओळख यांचं रक्षण करण्यासाठी  हीरामनजी यांनी एक विडा उचलला आहे. त्यांनी 12 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर विलुप्त होत असलेल्या कोरवा भाषेचा शब्दकोष तयार केला आहे. त्यांनी या शब्दकोशात, घर-संसारात वापरल्या जाणाऱ्या शब्दांचा वापर करून दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या कोऱवा भाषेतील अनेक शब्द अर्थासह लिहून काढले. कोरवा समुदायासाठी हीरामन यांनी जे करून दाखवलं आहे, ते देशासाठी एक उदाहरण आहे.

 माझ्या प्रिय देशबांधवांनो,

असे म्हणतात की अकबराच्या दरबारात एक प्रमुख सदस्य – अबुल फजल होते. त्यांनी एकदा काश्मीरच्या प्रवासानंतर म्हटलं होतं की काश्मीरमध्ये एक असे दृश्य आहे, ते पाहून चिडचिडे आणि रागावणारे लोक देखील आनंदाने नाचू लागतील. खरंतर, ते काश्मीरमध्ये केशराच्या शेतीचा उल्लेख करत होते. केशर कितीतरी शतकांपासून काश्मीरशी जोडलेले आहे. कश्मीरी केशर प्रामुख्याने पुलवामा, बडगाम आणि किश्तवाड़ सारख्या ठिकाणी उगवलं जातं. याच वर्षी मे महिन्यात काश्मिरी केशरला भौगोलिक संकेत टॅग म्हणजेच GI Tag देण्यात आले. याच्या माध्यमातून आम्ही काश्मिरी केशराला एक जागतिक लोकप्रिय ब्रँड बनवू इच्छितो.

 काश्मिरी केशर जागतिक स्तरावर एक असा मसाला म्हणून प्रसिद्ध आहे, ज्याचे अनेक प्रकारचे औषधी गुण आहेत. ते अतिशय सुगंधी असतं, त्याचा रंग गडद असतो, आणि याचे धागे लांब आणि जाडे असतात,  जे याचे औषधी मूल्य वाढवतात. ते  जम्मू  आणि काश्मीरच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतिनिधित्व करतं. दर्जाबाबत बोलायचं तर काश्मीरचे केशर खूप वेगळं आहे,आणि इतर देशांच्या केशरापेक्षा अगदी वेगळं आहे, काश्मीरच्या केशरला GI Tag मान्यतेमुळे एक वेगळी ओळख मिळाली आहे. तुम्हाला हे ऐकून आनंद होईल की काश्मीरी केशरला  GI Tag चं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर दुबईच्या एका सुपर मार्केटमध्ये ते सर्वप्रथम विकायला ठेवण्यात आलं.  आता याची निर्यात वाढायला लागेल. ते आत्मनिर्भर भारत बनवण्याच्या आपल्या प्रयत्नांना अधिक बळ देईल. केशराची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा विशेष लाभ होईल. पुलवामामध्ये त्रालच्या शार भागात राहणारे अब्दुल मजीद वानी यांचंच उदाहरण घ्या. ते आपलं  GI Tagged  केशर राष्ट्रीय केशर अभियानाच्या मदतीनं पम्पोरच्या व्यापार केंद्रात ई-व्यापाराच्या माध्यमातून विकत आहेत. त्यांच्यासारखे अनेक लोक काश्मीरमध्ये हे काम करत आहेत. पुढल्या वेळी जेव्हा तुम्हाला केशर खरेदी करायचं असेल तेव्हा काश्मीरचेच केशर खरेदी करण्याबाबत विचार करा. काश्मिरी लोकांचा  उत्साह असा आहे की तिथल्या केशराचा स्वादच वेगळा असतो. 

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

आता दोन दिवसांपूर्वीच गीता जयंती होती. गीता, आपल्याला आपल्या आयुष्याच्या प्रत्येक संदर्भात प्रेरणा देत असते. मात्र तुम्ही कधी असा विचार केला आहे का गीता एवढा अद्भुत ग्रंथ का आहे? ते यासाठी कारण ती  स्वयं भगवान  श्रीकृष्ण यांचीच वाणी आहे.

कारण गीतेचं वैशिष्ट्य हे देखील आहे कि ती जाणून घेण्याची जिज्ञासेपासून सुरु होते. प्रश्नापासून सुरुवात होते. अर्जुनाने भगवानांना प्रश्न केला, जिज्ञासा होती, त्यामुळेच तर गीतेचं ज्ञान जगाला मिळाले. गीतेप्रमाणेच आपल्या संस्कृतीत जेवढे काही ज्ञान आहे, सगळं जिज्ञासेतूनच सुरु होतं.  वेदांतचा तर पहिला मंत्रच आहे  – ‘अथातो ब्रह्म जिज्ञासा’ म्हणजे, या आपण ब्रह्माबाबत जाणून घेऊया. म्हणूनच तर आपल्याकडे ब्रह्माच्या शोधाबाबत बोलले जातं  जिज्ञासेची ताकदच अशी आहे.  जिज्ञासा तुम्हाला नियमितपणे नव्यासाठी प्रेरित करते. लहानपणी आपण म्हणूनच तर शिकतो कारण आपल्या अंतर्मनात जिज्ञासा असते. म्हणजेच जोपर्यंत जिज्ञासा आहे, तोपर्यंत जीवन आहे. जोवर जिज्ञासा आहे, तोवर नवीन शिकण्याचा क्रम जारी आहे. यात कुठलंही वय, कुठलीही परिस्थिती याला महत्व नसत.  जिज्ञासेच्या अशाच ऊर्जेचे एक उदाहरण मला समजलंय, तामिळनाडूचे ज्येष्ठ नागरिक टी श्रीनिवासाचार्य स्वामी जी यांच्याविषयी. टी श्रीनिवासाचार्य स्वामी जी 92 वर्षाचे आहेत. Ninety Two Years ते या वयातही संगणकावर आपले पुस्तक लिहीत आहेत, ते देखील स्वतःच टाईप करून. तुम्ही विचार करत असाल की पुस्तक लिहिणं ठीक आहे मात्र श्रीनिवासाचार्य यांच्या काळात तर संगणक नव्हता. मग त्यांनी संगणकाचे ज्ञान केव्हा मिळवलं? ही गोष्ट खरी आहे की त्यांच्या महाविद्यालयीन काळात संगणक नव्हता. मात्र, त्यांच्या मनात जिज्ञासा आणि आत्मविश्वास अजूनही तेवढाच आहे, जेवढा आपल्या युवावस्थेत होता. खरंतर श्री निवासाचार्य स्वामी जी संस्कृत आणि तामिळचे विद्वान आहेत. आतापर्यंत त्यांनी सुमारे 16 आध्यात्मिक ग्रंथ देखील लिहिले आहेत. मात्र संगणक आल्यानंतर त्यांना जेव्हा वाटलं की आता तर पुस्तक लिहिणं आणि छापण्याची पद्धतच बदलली आहे , तेव्हा वयाच्या  86 व्या वर्षी ते संगणक शिकले, आपल्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअर शिकले. आता ते आपलं पुस्तक पूर्ण करत आहेत.

मित्रांनो,

श्री टी श्रीनिवासाचार्य स्वामी जी यांचं जीवन या गोष्टीचं प्रत्यक्ष उदाहरण आहे की जीवन, तोपर्यंत ऊर्जेने भरलेलं असतं, जोवर जीवनात जिज्ञासा कायम असते, शिकण्याची इच्छा कायम असते. म्हणूनच आपण कधीही असा विचार करू नये की आपण मागे राहिलो, आपलं चुकलं. मी सुद्धा हे शिकून घेतलं असतं तर. आपण हे देखील मनात आणू नये की आपण शिकू शकत नाही किंवा पुढे जाऊ शकत नाही.

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

आता आपण जिज्ञासेने, काही नवीन शिकणं आणि करण्याबाबत बोलत होतो. नव्या वर्षानिमित्त नव्या संकल्पांबाबत देखील बोलत होतो. मात्र काही लोक असेही असतात जे सातत्याने काही ना काही नवीन करत असतात, संकल्प सिद्धीला नेत असतात. तुम्हाला देखील तुमच्या जीवनात जाणवलं असेल, जेव्हा आपण समाजासाठी काही करतो, तेव्हा बरेच काही करण्याची ऊर्जा समाज स्वतः आपल्याला देतो. सामान्य वाटणाऱ्या प्रेरणांमधून खूप मोठी कामं देखील होऊन जातात. असेच एक युवक आहेत श्रीमान प्रदीप सांगवान.

गुरुग्रामचे प्रदीप सांगवान 2016 पासून हिलिंग हिमालयाज नावाने अभियान राबवत आहेत. ते आपली  टीम आणि स्वयंसेवकांसह हिमालयाच्या वेगवेगळ्या भागात जातात आणि जो प्लास्टिक कचरा पर्यटक टाकून गेलेले असतात, तो साफ करतात. प्रदीप यांनी आतापर्यंत हिमालयाच्या निरनिराळ्या पर्यटन ठिकाणांहून कित्येक टन प्लास्टिक गोळा केलं आहे. याचप्रमाणे , कर्नाटकचं एक युवा दाम्पत्य आहे , अनुदीप आणि  मिनूषा. अनुदीप आणि मिनूषा यांनी आताच गेल्या नोव्हेंबर मध्ये लग्न केलं आहे. लग्नानंतर अनेक युवा फिरायला जातात, मात्र या दोघांनी काहीतरी वेगळं केलं. ही दोघे नेहमी पाहायची की लोक आपल्या घरातून बाहेर फिरायला तर जातात मात्र जिथे जातात तिथे मोठ्या प्रमाणात कचरा सोडून येतात.  कर्नाटक मधल्या सोमेश्वर चौपाटीवर देखील हीच स्थिती होती. अनुदीप आणि  मिनूषा यांनी ठरवलं की ते सोमेश्वर चौपाटीवर लोक जो कचरा टाकून गेले आहेत तो साफ करायचा. पतीपत्नी दोघांनी लग्नानंतर आपला पहिला संकल्प हाच केला. दोघांनी मिळून समुद्राच्या किनाऱ्यावरील बराचसा कचरा साफ केला.

अनुदीप यांनी आपला हा  संकल्प सोशल मीडियावर देखील सामायिक केला. मग काय , त्यांच्या या शानदार विचाराने  प्रभावित होऊन अनेक युवक त्यांच्याबरोबर सहभागी झाले. तुम्ही ऐकून हैराण व्हाल, या लोकांनी मिळून सोमेश्वर चौपाटीवरून  800 किलोपेक्षा अधिक कचरा उचलला.

मित्रांनो,

या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर, आपल्याला हे देखील लक्षात घ्यायला हवं की हा कचरा या चौपाट्यांवर, या डोंगरांवर कसा पोहचतो ? शेवटी, आपल्यातलेच  काही लोक हा कचरा तिथे टाकून येतात. आपल्याला  प्रदीप आणि अनुदीप-मिनूषा यांच्याप्रमाणे स्वच्छता अभियान सुरु करायला हवं. मात्र त्याही आधी आपल्याला हा संकल्प देखील करावा लागेल की आपण कचरा करणारच नाही.

शेवटी, स्वच्छ भारत अभियानाचा देखील पहिला संकल्प हाच आहे. आणि हो, आणखी एका गोष्टीची मला तुम्हाला  आठवण करून द्यायची आहे.  कोरोनामुळे यावर्षी याची चर्चा तेवढी होऊ शकली नाही. आपल्याला देशाला एकदा वापरायच्या प्लॅस्टिकपासून मुक्त करायचेच आहे. हा देखील 2021 च्या संकल्पांपैकी एक आहे. शेवटी, मी तुम्हाला नवीन वर्षासाठी खूप-खूप शुभेच्छा देतो. तुम्ही स्वतः तंदुरुस्त रहा, आपल्या कुटुंबाला तंदुरुस्त ठेवा. पुढल्या वर्षी जानेवारी महिन्यात नव्या विषयांवर  ‘मन की बात’ होईल.

खूप-खूप  धन्यवाद!!

 

* * *

(AIR-Mumbai)

R.Tidke/M.Chopade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1683966) Visitor Counter : 399