आयुष मंत्रालय

वर्षाखेर आढावा 2020 - आयुष मंत्रालय


कोविड-19 महामारीच्या संकटकाळामध्ये स्वतःची रोग प्रतिकारशक्ती वाढवून काळजी घेण्यासाठी उपाय योजनांचा पुनरूच्चार केला

योगसनाला स्पर्धात्मक क्रीडा प्रकार म्हणून औपचारिक मान्यता

Posted On: 24 DEC 2020 10:46PM by PIB Mumbai

 

वर्ष 2020 मध्ये कोविड-19 या महामारीच्या उद्रेकाने संपूर्ण जगभरामध्ये आरोग्य संकट निर्माण केले. केवळ भारतामध्येच नाही तर, संपूर्ण जगावर या प्राणघातक रोगाच्या साथीचे दुष्परिणाम झाले आहेत. भारतही या कोरोना विषाणूमुळे पसरलेल्या महामारीच्या विरोधात निकराने लढा देत आहे. या साथीच्याविरोधात आयुष मंत्रालयाने केलेल्या उपाय योजनांमुळे कोरोना रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण चांगलेच सुधारले आहे. कोरोना विषाणूच्या विरोधात सुरू झालेल्या लढ्यात आयुष मंत्रालय अतिशय महत्वपूर्ण भूमिका निभावत आहे. याचबरोबर मंत्रालयाने अनेक उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेतला असून आधुनिक आणि परंपरागत औषधोपचार पद्धती यांचा सुयोग्य मेळ साधून संयुक्तपणे प्रभावी उपचार केले आहेत.

कोविड-19 विरोधात आयुष मंत्रालयाने राबविलेले उपक्रम:- आयुष मंत्रालयाने महामारीच्या काळामध्ये कशाप्रकारे स्वतःची काळजी घ्यावी आणि प्रतिकारशक्ती वाढवावी याविषयी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. मंत्रालयाने ‘‘प्रतिकारशक्तीसाठी आयुष’’ अशी मोहीम तीन महिने राबविली. त्याचबरोबर लोकांना दूरवैद्यकीय सेवा देण्यासाठी आयुष मंत्रालयाने मार्गदर्शन पद्धत विकसित केली.

आयुषमध्ये कोविड-19 विषयी संशोधन कार्य:- कोविड-19रोगप्रतिबंधक औषधांविषयी एकूण 104 संशोधनात्मक अभ्यास करण्यात आले यामध्ये इतर गोष्टींचा समावेश तसेच स्वतंत्रपणे अभ्यास करण्यात आले. निरीक्षणात्मक आणि पूर्व-वैद्यकीय, प्रायोगिक अभ्यास देशभरातल्या सुमारे 135 केंद्रांवर सध्या सुरू आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या निष्कर्षानुसार कोविड-19 वर आयुष पद्धतीने केलेल्या उपचारांना अतिशय उत्साहवर्धक, आश्वासक प्रतिसाद मिळत आहे. मंत्रालयाच्यावतीने तयार केलेल्या कोविड-19 महामारीच्या काळामध्ये आयुष संजीवनी मोबाइल अॅप्लिकेशनचा 1.47कोटी जणांनी वापर केला. त्याच्या माध्यमातून उपचारांच्या प्रभाव, परिणामकारकतेचे मूल्यांकन, आयुषच्या उपयोगितेचा स्वीकार, तसेच आयुषने जारी केलेले कोविड-19 प्रतिबंधाचे उपाय यांच्याविषयी लोकांकडून मते जाणून घेण्यात आली. यामध्ये 85.1 टक्के लोकांनी प्रतिसाद नोंदवला असून त्यांनी कोविड-19 च्या काळात आयुषने सांगितलेले उपाय प्रतिबंधात्मक औषधोपचार म्हणून केले असल्याचे स्पष्ट झाले.

नवीन अधिनियम - राष्ट्रीय चिकित्सा आयोग (एनसीआयएम)कायदा, 2020 आणि राष्ट्रीय होमिओपॅथी आयोग (एनसीएच) कायदा, 2020: एनसीआयएम कायदा, 2020 आणि एनसीएच कायदा, 2020 यांची अंमलबजावणी 21 सप्टेंबर, 2020 पासून सुरू झाली. इंडियन मेडिसीन सेंट्रल कौन्सिल अॅक्ट, 1979 आणि होमिओपॅथी सेंट्रल कौन्सिल अॅक्ट  1973 अनुसार अस्तित्वात आलेल्या सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनची जागा या नवीन कायद्यांनी घेतली. आयुष शिक्षण क्षेत्रामध्ये सुधारणा घडवून आणून सर्व वैद्यकीय शाखांना एकमेकांना पूरक म्हणून कार्य करता यावे या उद्देशाने कायद्यांमध्ये बदल करण्यात आले.

राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थेची स्थापना (आयएनआय): आयुर्वेद अध्यापन आणि संशोधन संस्था कायदा, 2020 दि. 22 सप्टेंबर, 2020 पासून लागू करण्यात आला. यानुसार जामनगरच्या आयुर्वेद अध्यापन आणि संशोधन संस्थेला आयएनआयचा दर्जा देण्यात आला. ही संस्था जामनगरमधल्या गुजरात आयुर्वेद विद्यापीठाच्या परिसरात आहे.

एनआयए जयपूर संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला: जयपूरच्या राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेला आयुष मंत्रालयाने डी-नोव्हा श्रेणीतल्या  अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. 13 नोव्हेंबर, 2020 रोजी एका दूरदृश्य प्रणाली कार्यक्रमाव्दारे जयपूर एनआयएला अभिमत दर्जा देवून ही संस्था राष्ट्राला समर्पित केली.

पारंपरिक औषधांसाठी जागतिक आरोग्य संघटनेने वैश्विक व्यापार केंद्र स्थापण्यासाठी भारताची निवड केली: जागतिक आरोग्य संघटनेचे महा संचालक डॉ. टेड्रॉस अडॅनॉम घेब्रेसेसूस यांनी पारंपरिक औषधांसाठी वैश्विक व्यापार केंद्र स्थापण्यासाठी भारताची निवड केल्याची घोषणा केली. पंतप्रधानांनी याबद्दल जागतिक आरोग्य  संघटनेच्या महा संचालकांचे आभार व्यक्त केले.

आयुष व्यावसायिकांचा जागतिक आरोग्य संघटनेच्या डॉक्टरांचा लोकसंख्येच्या गुणोत्तरामध्ये समावेश: आयुष नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांची माहिती एकत्रित करण्यात आली असून त्या माहितीचा समावेश लोकसंख्या आणि डॉक्टरांचे प्रमाण यांचे गुणोत्तर काढताना विचारात घेतले जात आहे. यानुसार डॉक्टर-लोकसंख्या यांच्या गुणोत्तराचे प्रमाण सुधारत आहे.

आयसीडी (आंतरराष्ट्रीय आजारांचे वर्गीकरण) 11: आयुष मंत्रालयाच्यावतीने जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमानुसार  आयुर्वेद, सिद्ध आणि यूनानी उपचार पद्धतींच्या मानक संज्ञा विकसित करण्याचे कार्य करीत आहे. त्याचबरोबर एनएएमएएसटीई - नमस्ते - म्हणजेच राष्ट्रीय आयुष विकृती- रोगग्रस्तता आणि प्रमाणित संज्ञा इलेक्ट्रॉनिक पोर्टल तयार करण्यात आले असून राष्ट्रीय आयुर्वेद, सिद्ध आणि युनानी रोगग्रस्ततेसाठी दिलेल्या कोडप्रमाणे आकडेवारी संग्रहित करण्याचे काम यशस्वी केले जात आहे.

आयुष आरोग्य आणि निरामय केंद्रे (एएचडब्ल्यूसीएस): यावर्षी एप्रिलपासून आयुष्यमान भारत योजना सुरू झाली. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने एएचडब्ल्यूसी केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. यामध्ये 12,500 एएचडब्ल्यूसी केंद्रांचे काम 2024 पर्यंत सुरू होईल. तर यावर्षी 4400 एएचडब्ल्यूसी केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत.

चॅम्पियन सेवा केंद्र योजना: आयुष मंत्रालयाने आयुष आरोग्य दक्षता सुपर स्पेशालिटी डे केअर, रूग्णालय, आयुष क्षेत्रामध्ये कौशल्य विकास आणि आयुष ग्रिड यांची स्थापना चॅम्पियन सेवा केंद्र योजनेअंतर्गत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी वाणिज्य मंत्रालयाच्या सहकार्याने ही योजना राबविण्यात येत असून त्यासाठी 769 कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे.

आयुष प्रणालीमध्ये सोवा-रिग्पाचा समावेश: सरकारने आयुष मंत्रालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये सोवा-रिग्पाचा समावेश केला असून त्यांच्या विकास आणि प्रसारासाठी धोरण करून व्यावसायिक स्वरूप देण्यासाठी नियमांची निश्चिती करण्यासाठी सुधारणा करण्यात येत आहे.

राष्ट्रीय सोवा- रिग्पा संशोधन संस्थेची स्थापना: दि. 20नोव्हेंबर, 2019 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देवून राष्ट्रीय सोवा -रिग्पा संशोधन संस्थेची स्थापना करण्यात आली. यासाठी केंद्रशासित प्रदेश लडाखमधल्या लेह येथे असलेल्या राष्ट्रीय सोवा रिग्पा संस्थेचा दर्जा अद्यतन करण्यात आला.

आयुष  केंद्रीय औषधे नियंत्रण आराखडा तयार करण्यात आला: आयुर्वेद, सिद्ध, युनानी आणि होमिओपॅथी (एएसयू अँड एच) औषधांची गुणवत्ता नियंत्रित करण्यासाठी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेमध्ये स्वतंत्र रचना तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वांना आता दर्जेदार औषधांची उपलब्धता होणे सुनिश्चित झाले आहे.

योगासन एक स्पर्धात्मक क्रीडाप्रकार: युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने एनवायएसएफला योगासनाला  स्पर्धात्मक क्रीडाप्रकार म्हणून औपचारिक मान्यता दिली आहे. आता वेगवेगळ्या आयवायएसएफच्या छताखाली असलेल्या परदेशी संघटनांनी आणि  एनवायएसएफच्या छताखाली असलेल्या राज्य महासंघांनी योगासनाला स्पर्धात्मक क्रीडा प्रकार म्हणून मान्यता द्यावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

 

प्रधानमंत्री वृक्षआयुष योजना

प्रधानमंत्री वृक्षआयुष योजनेची वित्तमंत्र्यांनी दि. 15 मे, 2020रोजी घोषणा केली. यामध्ये वैद्यकीय औषधोपचारासाठी वापरण्यात येणा-या वृक्षांचे  म्हणजेच वनौषधींचे संगोपन केल्यानंतर त्यापासून आलेल्या पिकांचे व्यवस्थापन करण्यासाठी 4000 कोटींची अंदाजपत्रकीय तरतूद करण्यात आली. यामध्ये 10 लाख हेक्टर क्षेत्रातल्या वनौषधींच्या पिकांचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये गंगा नदीच्या खो-यात  800  हेक्टर क्षेत्रात वनौषधींच्या संगोपनाचाही समावेश आहे.

आयुष ग्रिड: राष्ट्रीय आरोग्य धोरण - 2017 आणि सरकारच्या ई- गव्हर्नन्स उपक्रमाच्या अनुषंगाने आयुष मंत्रालयाने संपूर्ण आयुष क्षेत्रासाठी आयुष ग्रिडच्या माध्यमातून माहिती आणि तंत्रज्ञानाने समर्थ करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे.

आयुष आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली ( ए- एचएमआयएस): या योजनेला 5 नोव्हेंबर, 2018 मध्ये प्रारंभ झाला आणि आतापर्यंत आयुष मंत्रालयाच्या अखत्यारीमध्ये असलेल्या स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून जवळपास 90आरोग्य सुविधा देण्यात येत आहेत. तसेच ए-एचएमआयएस दैनंदिन कामकाजासाठी ओपीडीचा वापर करीत आहेत.

आयुष मंत्रालय भारतीय मानक ब्युरोच्या सहकार्याने भारतीय मानक तसेच आंतरराष्ट्रीय मानक आयुष क्षेत्रात विकसित करीत आहे.:- आयुर्वेदासाठी चार भारतीय मानके विकसित करण्यात आली आहेत  आणि दोन मानकांचे काम स्वीकारण्यात आले आहे. त्याचबरोबर योग उपकरणे आणि पंचकर्म करण्यासाठी लागणारी उपकरणे अशा एकूण जवळपास 25 साधनांच्या मानकांवर काम सध्या सुरू आहे.

विमा कवच:- आयुष मंत्रालयाने केलेल्या प्रयत्नांमुळे आता वैद्यकीय विम्यामध्ये आयुष उपचारांचा समावेश करण्यात आला आहे. विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीए) या संदर्भात आवश्यक अधिसूचना जारी केली आहे.

एनएबीएच अधिस्वीकृती: - राष्ट्रीय अधिस्वीकृती मंडळाने राष्ट्रीय रूग्णालये आणि आरोग्य सेवा प्रदात्यांना मान्यता द्यावी यासाठी आयुष मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे आता अखिल भारतीय आयुर्वेद संस्था, नवी दिल्ली, राष्ट्रीय आयुर्वेद संस्था, जयपूर आणि आयटीआरए, जामनगर यांना अधिस्वीकृती देण्यात आली आहे.

आयुर्वेदग्रंथसमुच्चय:- आयुर्वेदातल्या सर्व प्रमुख शास्त्रीय घटकांना एकाच सॉफ्टवेअरमध्ये एकाच मंचावर आणण्यासाठी वेब पोर्टल विकसित करण्यात आले आहे.

----

U.Ujgare/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1683500) Visitor Counter : 300