आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केंद्रीय आरोग्य सचिवांनी ब्रिटनमधून भारतात येणा-या प्रवाशांचा घेतला आढावा; ब्रिटनमधून भारतात विमानांनी आलेल्या प्रवाशांपैकी 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना बाधित सापडल्याची नोंद

Posted On: 23 DEC 2020 9:24PM by PIB Mumbai

 

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज ब्रिटनमधून भारतात येणा-या प्रवाशांच्या स्थितीचा आढावा घेतला. 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये यूकेतून भारतामध्ये आलेल्या प्रवाशांपैकी कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, गोवा, पंजाब, गुजरात आणि केरळ यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये तातडीने प्रतिक्रियात्मक उपाय योजना करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. दूरदृष्य प्रणालीव्दारे झालेल्या या बैठकीमध्ये आयसीएमआरचे महा संचालक, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य सचिव, एनएचएमचे व्यवस्थापकीय संचालक, आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आरती अहुजा, एनसीडीसीचे संचालक डॉ. सूजीत सिंग आणि इतर वरिष्ठ आरोग्य अधिकारी सहभागी झाले होते.

यूकेमध्ये आढळलेल्या सार्स कोविड-2 या विषाणूसंदर्भात नवीन प्रकाराकडे महामारीविषयक संशोधन करणारे तज्ज्ञ अगदी बारकाईने पाळत ठेवत आहेत. त्याविषयी मंत्रालयाने मानक प्रक्रिया 22.12.2020 रोजी जारी केली आहे. याविषयी तसेच यूकेमध्ये आढळलेल्या आजाराविषयी या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली.

सर्व राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी आपल्याकडे यूकेमधून येणा-या सर्व प्रवाशांचा संपूर्ण तपशील आरोग्य विभागाच्या ऑनलाइन पोर्टल एआयआर-सविधा’ (AIR-SUVIDHA)वर नोंदवावा. त्याचबरोबर ब्युरो ऑफ इमिग्रेशनकडे सर्व माहिती सादर केल्यानंतरच प्रवाशांना देशात प्रवेश करण्याची मुभा देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच ज्या प्रवासे बाधित झाल्याचे आढळले आहे, त्यांच्या तपासणीचे नमूने जीनोम अनुक्रम जाणून घेण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यास सांगण्यात आले आहे.

बाधित प्रवाशांचे नमूने पाठविण्यासाठी सहा प्रयोगशाळा निहित करण्यात आल्या असून त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिका-यांची माहितीही राज्यांना, केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आली आहे. प्रवाशांच्या नमून्याची पुढील चाचणी, परीक्षण करण्यासाठी सीएसआयआर- इन्स्टिट्यूट ऑफ जीनॉमिक्स अँड इंटिग्रटिव्ह बायोलॉजी, नवी दिल्ली; सीएसआयआर- सेंटर फॉर सेल्यूलर अँड मॉलेक्यूलन बायोलॉजी, हैद्राबाद; डीबीटी- इन्स्टिट्यूट ऑफ लाइफ सायन्सेस, भुवनेश्वर ; डीबीटी - इनस्टेम- एनसीबीएस, बंगलुरु; नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल जीनॉमिक्स, कल्याणी- पश्चिम बंगाल; आयसीएमआर - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, पुणे. आवश्यकता वाटल्यास चाचणीसाठी आणखी काही प्रयोगशाळांची संख्या वाढविण्यात येणार असून त्याचा तपशील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सामायिक करण्यात येणार आहे.

या नवीन विषाणूबाबत राज्यांकडून ज्या शंका उपस्थित करण्यात आल्या, त्यांचे निराकरण या बैठकीत करण्यात आले. सर्व राज्यांनी विमानतळ आरोग्य कार्यालये आणि दक्षता अधिका-यांबरोबर समन्वय ठेवून एसओपीचे पालन सुनिश्चित करावे, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.

***

S.Thakur/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1683175) Visitor Counter : 181