विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
सहावा भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान चित्रपट महोत्सव (ISFFI) होणार 22 ते 25 डिसेंबर 2020 दरम्यान
प्रविष्टि तिथि:
20 DEC 2020 6:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 डिसेंबर 2020
भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचा (IISF) एक भाग म्हणून भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान चित्रपट महोत्सव (ISFFI) नागरिकांमध्ये विज्ञानाच्या लोकप्रियतेसाठी ISFFI प्रयत्न करीत आहे, आणि प्रतिभावान तरुण विज्ञान चित्रपट निर्माते आणि विज्ञानाबाबत उत्सुक व्यक्तींना आकर्षित करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. विज्ञान विषयक संप्रेषण वाढविण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये विज्ञान विषयक उत्सुकता वाढविण्यासाठी आणि उत्तेजन देण्यासाठी विज्ञान चित्रपट हे एक प्रभावी साधन आहे, प्रेक्षकांच्या मनावर वैज्ञानिक मनोवृत्ती ठसविल्यामुळे राष्ट्राच्या सर्वसमावेशक विकासासाठी आवश्यक असलेली विश्लेषक विचारसरणी तयार होते.
ISFFI हे विद्यार्थी आणि अन्य सहभागींना विज्ञान चित्रपट तयार कण्यासंबंधीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानातील वैविध्यपूर्ण उत्कर्षांबाबतचे त्यांचे ज्ञान वाढविण्याची संधी देत आहे. हा उपक्रम विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विशेष क्षेत्रात चित्रपट निर्मात्यांच्या प्रयत्नांना आणि त्यांच्या योगदानास मान्यता देतो आणि विज्ञान निर्मितीचा हा अनोखा व्यवसाय विकसित करण्यास प्रोत्साहन देतो, ज्यायोगे आपल्या देशाशी सबंधित अभिनव दर्जेदार सामग्री तयार व्हावी.
कोविड–19 महामारीमुळे आणि भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, यावर्षी ISFFI 2020 हा आभासी वातावरणात (व्हर्च्युअल पद्धतीने) 22 ते 25 डिसेंबर 2020 या काळात आयोजित करण्यात आला आहे.
या वर्षी 60 देशांमधून 632 विज्ञान माहितीपट, लघुपट, अनिमेशन व्हिडिओ प्राप्त झाल्याची नोंद आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसित झालेले आणि पारितोषिक विजेते परदेशी आणि भारतीय विज्ञान, आरोग्य आणि पर्यावरण विषयक चित्रपटांचे ऑनलाइन व्यासपीठाच्या माध्यमातून प्रदर्शन केले जाईल. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक आणि विद्यार्थी चित्रपट निर्मात्यांसाठी एक स्पर्धा आयोजित केली जात आहे. स्पर्धात्मक श्रेणीत नसलेल्या गटामध्ये भारतासह 23 देशांकडून 75 सबमिशन प्राप्त झाली आहेत.
हे नामांकित चित्रपट 22 ते 25 डिसेंबर 2020 या काळात विज्ञान प्रसारच्या यूट्यूब चॅनेलवर आणि भारत विज्ञान महोत्सव चॅनेलवर प्रदर्शित केले जाणार आहेत.
स्पर्धात्मक श्रेणींचे विषय आणि पुरस्कार
यामधील प्रवेशिका प्रामुख्याने खालील विषय आणि उपविषयांमध्ये विभागल्या गेल्या आहेत:
(i) आंतरराष्ट्रीय श्रेणीसाठी पुरस्कार
- "स्वावलंबी भारतासाठी विज्ञान आणि / किंवा जागतिक कल्याणासाठी विज्ञान" या विषयावर सर्वोत्कृष्ट महोत्सव पुरस्कार - चषक आणि प्रशस्तिपत्रक
- "कोविड–19 बाबत आणि अन्य आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थितीवर विज्ञान आणि जागरुकता" या विषयावर सर्वोत्कृष्ट महोत्सव पुरस्कार - चषक आणि प्रशस्तिपत्रक.
- परीक्षकांकडून पुरस्कार (2) – चषक आणि प्रशस्तिपत्रक.
(ii) भारतीय नागरिकांच्या श्रेणीसाठी पुरस्कार
A. स्वतंत्र चित्रपटनिर्माते (भारतीय नागरिक)
- "स्वावलंबी भारतासाठी विज्ञान आणि / किंवा जागतिक कल्याणासाठी विज्ञान" या विषयावर सर्वोत्कृष्ट महोत्सव पुरस्कार – रुपये 1,00,000/- रोख रक्कम, चषक आणि प्रशस्तिपत्रक.
- "कोविड – 19 बाबत आणि अन्य आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थितीवर विज्ञान आणि जागरुकता" या विषयावर सर्वोत्कृष्ट महोत्सव पुरस्कार – रुपये 1,00,000/- रोख रक्कम, चषक आणि प्रशस्तिपत्रक.
- परीक्षकांकडून पुरस्कार (2) – रुपये 50,000/- रोख रक्कम, चषक आणि प्रशस्तिपत्रक (प्रत्येकी).
B. महाविद्यालयीन / शालेय विद्यार्थी (भारतीय नागरिक)
- "स्वावलंबी भारतासाठी विज्ञान आणि / किंवा जागतिक कल्याणासाठी विज्ञान" या विषयावर सर्वोत्कृष्ट महोत्सव पुरस्कार – रुपये 75,000/- रोख रक्कम, चषक आणि प्रशस्तिपत्रक.
- "कोविड –19 बाबत आणि अन्य आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थितीवर विज्ञान आणि जागरुकता" या विषयावर सर्वोत्कृष्ट महोत्सव पुरस्कार – रुपये 75,000/- रोख रक्कम, चषक आणि प्रशस्तिपत्रक.
- परीक्षकांकडून पुरस्कार (2) – रुपये 35,000/- रोख रक्कम, चषक आणि प्रशस्तिपत्रक (प्रत्येकी).
स्पर्धात्मक श्रेणी नसलेला गट
- चित्रपट (केवळ प्रदर्शनासाठी) – स्पर्धात्मक श्रेणी नसलेल्या या गटामध्ये वेळेची कोणतीही मर्यादा नाही.
- स्पर्धात्मक श्रेणी नसलेल्या गटासाठी विषय : विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण आणि आरोग्य.
सादर करण्याची प्रक्रिया 10 डिसेंबर 2020 रोजी संपली आहे.
* * *
M.Chopade/S.Shaikh/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1682238)
आगंतुक पटल : 698