दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

पंडित दीनदयाल उपाध्याय दूरसंचार उत्कृष्टता कौशल्य पुरस्कार वितरण

Posted On: 19 DEC 2020 6:48PM by PIB Mumbai

 

दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद आणि  दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी, पंडित दीनदयाल उपाध्याय दूरसंचार उत्कृष्टता कौशल्य पुरस्कारांचे वितरण केले ,ज्यात 50,000 रुपयांच्या आणि 30,000 रुपयांच्या अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या रोख रक्कमेच्या बक्षीसांचा समावेश होता.

यात बेंगळुरुच्या श्रीनिवास करणम यांना केरळच्या किनारपट्टीवरील सखोल समुद्रातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या सीमोबाईल ब्रँड अंतर्गत वाजवी किंमतीचे अनुकूल असे तंत्र विकसित करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल प्रथम पुरस्कार देण्यात आला. या सेवेद्वारे मच्छिमारांना जीएसएम कव्हरेजच्या बाहेर असताना देखील, एकमेकांशी फोनवर संपर्क, एकत्रित कॉल, एसएमएस, स्थानिक सेवा, हवामान इशारा आणि तातडीच्या सेवा उपलब्ध होऊ शकतात. ही सेवा केरळच्या किनारपट्टीवरील तिरुअनंतपूरम ते कालिकत अशा सुमारे 500 किलोमीटर अंतरासाठी 900 बोटींवर एक विशिष्ट साधन लावून उपलब्ध केली आहे.

नवी दिल्लीतील प्राध्यापक सुब्रत कर यांची द्वितीय क्रमांकाच्या पुरस्कारासाठी निवड झाली. त्यांनी अशा प्रकारचे एक नाविन्यपूर्ण, मोठ्या प्रमाणावर तैनात करण्याचे नेटवर्क आणि साधन विकसित केले, ज्यायोगे रेल्वे आणि वन्यप्राण्यांची  धडक होणार नाही, तसेच यामुळे वन्यप्राण्यांच्या विहारात/वर्तणुकीत कोणताही अडथळा येऊ शकत नाही म्हणून ही यंत्रणा वन्यप्राणी संवर्धनासाठी सहाय्यक ठरते. ही यंत्रणा उत्तराखंडमधील राजाजी राष्ट्रीय उद्यानात प्रायोगिक तत्वावर हत्ती आणि गाडी यांची टक्कर होऊन हत्ती मृत्यूमुखी पडू नयेत म्हणून बसविण्यात आली आहे.

दोन्ही मंत्र्यांनी मच्छिमारांच्या हितासाठी आणि वन्यजीव संवर्धनासाठी केलेल्या नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रत्यक्षात साकारत, दूरसंचार तंत्रज्ञानाचे सबलीकरण करत पुरस्कारार्थींनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.

करणम यांच्याशी संवाद साधताना ही यंत्रणा किनारपट्टीवरील कर्नाटक, तामिळनाडू, ओदिशा या राज्यांत कार्यान्वित करता येईल असे मत प्रदर्शित करत दूरसंचार मंत्री म्हणाले, की ही यंत्रणा केरळ किनारपट्टीवर यशस्वीपणे कार्यरत झाली आहे तसाच तिचा अनेक मच्छिमारांसाठी लाभ होऊ शकेल .प्राध्यापक कर यांच्याशी संवाद साधताना ते म्हणाले की, अशा प्रकारचे सेन्सर्स इतर विभागात ही आवश्यक आहेत जेथे वन्य हत्ती वा इतर प्राणी नेहमी रेल्वे मार्ग ओलांडतात आणि वेगात येणाऱ्या गाडीशी टक्कर झाल्याने आपला जीव गमावतात.

दूरसंचार कौशल्य, दूरसंचार सेवा, दूरसंचार उत्पादने, दूरसंचार प्रणाली यांचा वापर दूरसंचारावर आधारीत कृषी, वाणिज्य, आरोग्य आणि शैक्षणिक अशा क्षेत्रांत उपाययोजना करण्यासाठी व्हावा यासाठी दूरसंचार क्षेत्रातील कुशल माणसांना त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण योगदानाबद्दल देण्यात येणाऱ्या पंडित दीनदयाल उपाध्याय दूरसंचार उत्कृष्ट कुशलता पुरस्कार योजनेचा आरंभ 2017 मध्ये झाला. 2018 मध्ये प्रथम अर्ज मागविण्यात आले होते. दूरसंचार विभागाने 8.9.2020 रोजी त्यातील विजेत्यांची घोषणा झाली होती. या विभागाने 2019 या वर्षासाठी आता नामांकने मागविली आहेत आणि त्यासाठी 23.2.2021 ही अंतिम तारीख आहे. याचा तपशील http://www.dot.gov.in/  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

***

S.Thakur/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1682008) Visitor Counter : 240