संरक्षण मंत्रालय

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून डीआरडीओ प्रणाली सशस्त्र सेना दलांच्या प्रमुखांकडे सुपूर्द

Posted On: 18 DEC 2020 7:29PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 डिसेंबर 2020

 

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज डीआरडीओ भवनात झालेल्या कार्यक्रमात संपूर्णपणे देशी बनावटीच्या डीआरडीओच्या तीन प्रणाली लष्कर, नौदल आणि हवाईदलाकडे सोपवल्या. सागरी सुरक्षेसाठी महत्त्वाची असलेली इंडियन मेरिटाईम सिच्युएशनल अवेअरनेस सिस्टम (आयएमएसएएस) ही प्रणाली नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंग यांच्याकडे, हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंग भदोरिया यांच्याकडे अस्र एमके- वन क्षेपणास्त्र ही प्रणाली आणि लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्याकडे बॉर्डर सर्वेलन्स सिस्टम (बीओएसएस) ही प्रणाली सोपवण्यात आली. या कार्यक्रमाला सन्माननीय अतिथि म्हणून संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत उपस्थित होते. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी विविध श्रेणींमध्ये अतुलनीय योगदान देणाऱ्या डीआरडीओच्या शास्त्रज्ञांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं. या पुरस्कारांमध्ये डीआरडीओ जीवनगौरव पुरस्कार-2018 चा समावेश होता. क्षेपणास्त्रांच्या नियंत्रण आणि मार्गदर्शन प्रणाली विकसित केल्याबद्दल एन व्ही कदम या पुरस्काराचे मानकरी ठरले. तंत्रज्ञानाच्या अंगिकाराबद्दल शैक्षणिक आणि उद्योग संस्थेला सर्वोत्तम गुणवत्ता पुरस्कार देण्यात आला. त्याशिवाय वैयक्तिक पुरस्कार, सांघिक पुरस्कार, टेक्नॉलॉजी स्पिन-ऑफ पुरस्कार, टेक्नो मॅनेजरियल पुरस्कार आणि इतर श्रेणीतील पुरस्कारांचे देखील यावेळी वितरण करण्यात आले.

संरक्षण प्रणाली विकसित करण्यामध्ये असामान्य योगदान दिल्याबद्दल संरक्षणमंत्र्यांनी डीआरडीओच्या शास्त्रज्ञांची प्रशंसा केली. संरक्षण दलांची क्षमता आणि कार्यकुशलता वाढवण्यासाठी डीआरडीओ उच्च पातळीच्या प्रणाली विकसित करत असते असे त्यांनी सांगितले. कोविड-19 महामारीशी लढा देण्यामध्ये डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी बजावलेल्या भूमिकेचे त्यांनी कौतुक केले. पुरस्कार विजेत्या सर्व शास्त्रज्ञांचे त्यांनी अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.

संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्ण बनण्यामध्ये डीआरडीओ महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असे संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी यावेळी बोलताना सांगितले. कोविड-19 महामारीचा सामना करण्यासाठी विविध प्रकारचे तंत्रज्ञान आणि उत्पादने विकसित केल्याबद्दल त्यांनी डीआरडीओच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांनी देखील यावेळी आपले विचार व्यक्त केले. त्यांनी वैज्ञानिक समुदायाचे त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदन केले आणि देशाला जास्तीत जास्त स्वदेशी बनावटीच्या संरक्षण प्रणालींनी सज्ज ठेवण्यासाठी जलदगतीने काम करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला.

उच्च तंत्रज्ञानाच्या या प्रणालींच्या विकासामुळे संरक्षण तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणावर स्वयंपूर्णता निर्माण झाली आहे. या तिन्ही प्रणालींचा रचना आणि विकासाचा टप्पा पूर्ण झाला असून त्यांना तैनात करण्यासाठी तिन्ही दलांकडे सुपूर्द करण्यात आले.

या प्रणालींमध्ये बॉस (BOSS) या प्रणालीचा समावेश होता. सर्व प्रकारच्या हवामानात देखरेख ठेवणारी ही इलेक्ट्रॉनिक प्रणाली असून डेहराडूनच्या इन्स्ट्रुमेंट्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट आस्थापना (आयआरडीई) या संस्थेने तिची रचना आणि विकास केला आहे. ही प्रणाली दिवसा आणि रात्री टेहळणी करण्यासाठी लडाख सीमेवर तैनात करण्यात आली आहे. दूरसंचालन क्षमता असलेल्या या प्रणालीमुळे अतिउंचावर शून्य अंशापेक्षा कमी तापमानात देखील कोणत्याही प्रकारची घुसखोरी किंवा हालचालीवर लक्ष ठेवता येते आणि टेहळणी करता येते. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) मछलीपट्टनमने या प्रणालीची निर्मिती केली आहे.

इम्सास ही अत्याधुनिक पूर्णपणे देशी बनावटीची, उच्च क्षमता असलेली इंटेलिजेंट सॉफ्टवेअर प्रणाली असून ती ग्लोबल मेरीटाईम सिच्युएशनल पिक्चर, मरीन प्लॅनिंग टूल्स आणि भारतीय नौदलासाठी विश्लेषणात्मक क्षमता उपलब्ध करते. नौदलाच्या मुख्यालयापासून समुद्रात असलेल्या प्रत्येक जहाजाला नौदल कमांड आणि कंट्रोल (सी2) देणारे सागरी परिचालन चित्र या प्रणालीमुळे उपलब्ध होते. बंगळूरुच्या सेंटर फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड रोबोटिक्स (सीएआयआर) आणि भारतीय नौदलाने संयुक्तपणे या प्रणालीची संकल्पना आणि विकास केला असून बंगळूरूच्या बीईएलने त्यावर अंमलबजावणी केली आहे.

अस्त्र एमके-1 हे देशी बनावटीचे पहिले बियॉन्ड व्हिजुअल रेंज (बीव्हीआर) क्षेपणास्त्र असून ते सुखोई-30, लाईट कॉम्बॅट एयरक्राफ्ट (एलसीए), मिग-29 आणि मिग-29 के मधून प्रक्षेपित करता येते. जगात मोजक्या देशांकडे अशा प्रकारच्या शस्त्र प्रणालीचे तंत्रज्ञान आणि त्याची रचना आणि उत्पादन करण्याची क्षमता आहे. डीआरडीओच्या हैदराबाद येथील प्रयोगशाळेने (डीआरडीएल) आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेड (बीडीएल) ने अस्त्र ही प्रणाली विकसित करून आत्मनिर्भर भारतामध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे.

संरक्षण क्षेत्रासाठी अत्याधुनिक प्रणाली आणि तंत्रज्ञानाचा विकास करण्यासाठी डीआरडीओ वचनबद्ध आहे असे डीआरडीओचे प्रमुख आणि डीडीआर अँड डी चे सचिव डॉ. जी सतीश रेड्डी यांनी सांगितले.

संरक्षण क्षेत्रासाठी संबंधित शैक्षणिक संस्था, उद्योग आणि संरक्षण दलांसोबत उपकरणांची रचना, विकास आणि उत्पादन करणारी भक्कम व्यवस्था निर्माण करण्याचा डीआरडीओचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी संरक्षण मंत्रालय आणि भारत सरकारचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

* * *

S.Thakur/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1681803) Visitor Counter : 306