वस्त्रोद्योग मंत्रालय
विशिष्ट तांत्रिक उपयोगासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्त्रांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित मंडळाची स्थापना करण्याकरिता वस्त्रोद्योग मंत्रालयाने मागविले प्रस्ताव
Posted On:
03 DEC 2020 7:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2020
विशिष्ट तांत्रिक उपयोगासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्त्रांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने समर्पित ईपीसी मंडळाची स्थापना करण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालयाने 1 डिसेंबर 2020 ला प्रसिद्ध केलेल्या सरकारी नोटीसीद्वारे प्रस्ताव मागविले आहेत. कंपनी कायदा किंवा सहकारी संस्था नोंदणी कायद्याखाली निर्यातदार संघटना आणि व्यापारी संस्था यांनी टेक्नीकल टेक्सटाईल्स अर्थात परिधान करायच्या आणि दैनंदिन वापराच्या कपड्यांखेरीज इतर विशिष्ट कार्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्त्रांच्या निर्यातीसाठी समर्पित ईपीसी अर्थात निर्यात प्रोत्साहन मंडळाची स्थापना करण्यासाठीचे प्रस्ताव 15 डिसेंबरपर्यंत वस्त्रोद्योग मंत्रालयाकडे सादर करायचे आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापार विकास आणि प्रोत्साहन यांच्या संदर्भात केंद्र सरकारने घालून दिलेल्या सर्व दिशादर्शक सूचनांना हे मंडळ बांधील असेल आणि परदेशी व्यापार महासंचालनालयाने संमत करून सूचित केलेल्या आयात-निर्यात विषयक मार्गदर्शक तत्वांना प्रोत्साहन देण्यासाठी जबाबदार असेल.
तांत्रिक वस्त्रोद्योग निर्मिती क्षेत्रात भारताला जागतिक स्तरावरील प्रमुख देश बनविण्याच्या उद्देशाने 1480 कोटी रुपये खर्चून राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियान उभारायच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीने 26 फेब्रुवारी 2020 रोजी झालेल्या बैठकीत मंजुरी दिली होती. हे अभियान वर्ष 2020-21 ते 2023-24 अशा चार वर्षांच्या कालावधीत लागू होईल असा निर्णय घेण्यात आला. समर्पित ईपीसीची निर्मिती हा या अभियानाचाच एक भाग आहे.
तंत्रविषयक वस्त्रोद्योग हा वस्त्रोद्योग क्षेत्राचा नवनिर्मितीला प्रोत्साहन देणारा, उत्तम आणि वेगळा विभाग आहे. या विभागात कृषी, रस्ते, रेल्वेमार्ग, क्रीडा तसेच आरोग्य या क्षेत्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या साधनांपासून ते बुलेटप्रुफ जाकीट, आगविरोधी जाकीट, अतिउच्च ठिकाणी युद्धात वापरली जाणारी साधने आणि अवकाश मोहिमांमध्ये उपयुक्त ठरणारी साधने अशा विविध ठिकाणी वापरात येणाऱ्या वस्त्रांचा समावेश होतो.
तांत्रिक वस्त्रोद्योगाची पार्श्वभूमी
- तांत्रिक वस्त्रोद्योग म्हणजे परिधान करावयाचे कपडे किंवा दैनंदिन आयुष्यात वापरावयाच्या कापडापासून निर्मित वस्तूंखेरीज इतर तांत्रिक वापरासाठी आणि विशिष्ट कार्यकारी उपयोगासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्त्रांची निर्मिती. तांत्रिक वस्त्रोद्योग उत्पादने त्यांच्या वापराच्या क्षेत्रांनुसार मुख्यतः पुढील 12 विस्तारित प्रकारात विभागली आहेत – अॅग्रोटेक, बिल्डटेक, क्लॉथटेक, जिओटेक, होमटेक, इंडूटेक, मोबिलटेक, मेडीटेक, प्रोटेक, स्पोर्ट्सटेक, ओईकोटेक आणि पॅकटेक.
- या वस्त्रोद्योगाच्या 250 बिलियन अमेरिकी डॉलर्सच्या जागतिक बाजारात भारताचा सुमारे 6% वाटा आहे. मात्र जागतिक पातळीवर या उद्योगाच्या 4% सरासरी विकासदराच्या तुलनेत भारताच्या या क्षेत्राचा वार्षिक विकासदर 12% आहे.
- विकसित देशांमध्ये तंत्रविषयक वस्त्रोद्योगाची उलाढाल 30 – 70% आहे, भारतात मात्र या उद्योगाची 5 – 10% इतकी कमी उलाढाल आहे. या क्षेत्राची देशांतर्गत उलाढाल वाढविण्याच्या उद्देशाने सरकारने राष्ट्रीय तंत्रविषयक वस्त्रोद्योग अभियानाची सुरुवात केली आहे.
* * *
M.Chopade/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1678112)
Visitor Counter : 193