उपराष्ट्रपती कार्यालय

उपराष्ट्रपतींनी युवावर्गाला डॉ. कलाम यांच्या कडून प्रेरणा घेऊन बलवान, आत्मनिर्भर आणि सर्वसमावेशी भारत घडविण्याच्या दिशेने कार्य करण्याचे केले आवाहन


माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या आयुष्यावरील '40 इअर्स विद अब्दुल कलाम-अनटोल्ड स्टोरीज,' या पुस्तकाचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशन

Posted On: 03 DEC 2020 6:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 डिसेंबर 2020


उपराष्ट्रपती वेंकैय्या नायडू यांनी युवावर्गाला माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्यापासून प्रेरणा  घेऊन बलवान, आत्मनिर्भर आणि सर्वसमावेशक भारत घडविण्याच्या दिशेने कार्य करा, असे आवाहन केले. ते म्हणाले, की डॉ. कलाम यांच्या प्रमाणे तरुणांनी अनोख्या पद्धतीने विचार केला पाहिजे आणि भारताच्या लोकसंख्येच्या मोठ्या भागावर परिणाम करणाऱ्या विविध आर्थिक आणि सामाजिक आव्हानांचे निराकरण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा. डॉ. शिवथानू पिल्ले यांनी लिहिलेल्या '40 इअर्स विद अब्दुल कलाम - अनटोल्ड स्टोरीज,'या पुस्तकाचे दूरदृश्य प्रणाली द्वारे प्रकाशन करताना डॉ. कलाम यांच्या जीवनातील हकीकतींची माहिती यातून मिळाल्याबद्दल नायडू यांनी आनंद व्यक्त केला. डॉ. कलाम यांच्या जीवनातून अडचणी आणि पीछेहाट यांच्याकडे योग्य नजरेने पाहिल्यास त्या आपले चरीत्र आणि  मानसिकता सुदृढ बनण्यासाठी सशक्त भूमिका बजावतात, असा सामर्थ्यशाली संदेश यातून मिळतो, असेही नायडू पुढे म्हणाले.

'खरा कर्मयोगी' असे डॉ. कलाम यांचे वर्णन करताना उपराष्ट्रपती म्हणाले, की ते  प्रत्येक भारतीयाचे  प्रेरणास्रोत होते. नायडू  म्हणाले, की डॉ. कलाम खऱ्या अर्थाने जनतेचे राष्ट्रपती होते, ज्यांचा प्रत्येक भारतीयाला विशेषतः तरुणांना लळा होता. ते साधेपणा, प्रामाणिकता आणि बुध्दिमत्ता यांचा आदर्श होते. त्यांचे भारताच्या संरक्षण आणि अवकाश क्षेत्रातील योगदान अमूल्य आहे, असेही ते पुढे म्हणाले.

उपराष्ट्रपती म्हणाले, की डॉ. कलाम यांनी प्रतिष्ठा आणि आशावाद याचे देशाला आणि परदेशाला मूर्तिमंत दर्शन घडविले, तसेच त्यांना मैत्री आणि ज्ञानाचे प्रभावशाली प्रवर्तक म्हणून ओळखले जात असे. माजी राष्ट्रपतींनी दिलेल्या योगदानाला मान देऊन नासाने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात नव्याने सापडलेल्या एका जीवाणूला डॉ. कलाम यांचे नाव दिले आहे याची नायडू यांनी यावेळी आठवण करून दिली.

कोविड-19 च्या महामारीचा स्थलांतरीत कामगारांवर झालेल्या आघाताबाबत बोलताना, गावांत आणि छोट्या शहरांत रोजगार आणि आर्थिक संधी निर्माण करण्याची गरज आहे, यावर उपराष्ट्रपतींनी भर दिला.

"आपल्याला नियोजनबद्ध विकेंद्रीकरण, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सबलीकरण आणि ग्रामोद्योगाला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देणे यावर लक्ष केंद्रित करायला हवे, म्हणजे आपली गावे आणि शहरे विकसित केंद्रे म्हणून उदयास येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

उपराष्ट्रपतींनी डॉ. पिल्ले यांनी असे सर्वसमावेशक पुस्तक लिहिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आणि डॉ. कलाम यांच्या सोबत काम केलेल्या इतरही अनेक जणांनी आपल्या वैयक्तिक अनुभव चित्रण करणारी पुस्तके लिहावीत आणि ते देशाबद्दल कसा सतत विचार करत असत, याबद्दल सध्याच्या पिढिला मार्गदर्शन करावे,अशी आशा यावेळी व्यक्त केली.

पुस्तकाचे लेखक डॉ ए. शिवथानू पिल्ले, इस्रोतील प्राध्यापक डॉ. वाय.एस.राजन, पेंटागॉन प्रकाशनाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजन आर्य या दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते.

 

* * *

S.Thakur/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1678070) Visitor Counter : 158