रेल्वे मंत्रालय
रेल्वे विद्युतीकरणाला मोठी चालना
रेल्वे मंत्रालय,वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार ,अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे मंत्री पियुष गोयल यांनी उत्तर पश्चिम रेल्वेच्या नव्याने विद्युतीकरण केलेल्या धिग्वारा -बांदिकुई मार्गाचे उद्घाटन केले आणि या मार्गावरून सुटणाऱ्या पहिल्या गाडीला केले रवाना
भारतीय रेल्वेने डिसेंबर 2023 पर्यंत ब्रॉडगेज नेटवर्कचे विद्युतीकरण करण्याचे लक्ष्य साध्य करण्याचा केला निर्धार केला
प्रविष्टि तिथि:
29 NOV 2020 9:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 29 नोव्हेंबर 2020
रेल्वे मंत्रालय,वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार ,अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे मंत्री पियुष गोयल यांनी उत्तर पश्चिम रेल्वेच्या नव्याने विद्युतीकरण केलेल्या धिग्वारा -बांदिकुई मार्गाचे, धिग्वारा येथील स्थानकावर आयोजित केलेल्या समारंभात उद्घाटन केले आणि या नव्याने विद्युतीकरण केलेल्या मार्गावरून सुटणाऱ्या पहिल्या गाडीला रवाना केले. या समारंभाला लोकप्रतिनिधी आणि रेल्वेतील वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी संबोधित करताना पियुष गोयल म्हणाले, “आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा दिवस असून गुरुनानक यांच्या जयंतीची पूर्वसंध्या आहे.ते पुढे म्हणाले की, आदरणीय पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वे वेगात आणि दर्जेदार प्रगती करत टप्याटप्याने पुढे जात आहे आणि प्रत्येकाचे सहकार्य, सुसंघटित कार्य आणि प्रेरणा घेऊन उत्कृष्ट कामगिरी बजावीत आहे.”
रेल्वेने केलेल्या कामगिरीवर भर देत गोयल म्हणाले, “35 वर्षांपूर्वी राजस्थान येथील कोटा-मुंबई मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम झाले , त्यानंतर कुणीही या भागाकडे लक्ष दिले नाही.रेल्वेने संपूर्ण भारतातील रेल्वे मार्गाच्या शंभर टक्के विद्युतीकरणाचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.”
ते पुढे म्हणाले, “आता विचार पध्दतीत बदल झाला आहे आणि आमच्या कार्यपद्धतीतही बदल झाला आहे. आज या मार्गाचे विद्युतीकरण झाल्यावर रेवाडी ते अजमेर मार्गाचे विद्युतीकरण झाले आहे आणि आणि आता लवकरच दिल्ली अजमेर मार्गावर विद्युतीकरण केलेल्या गाड्या धावणार आहेत. या गाड्या सुरू झाल्यानंतर डिझेल गाड्या बंद होतील,त्यामुळे प्रदुषणाला आळा बसेल शिवाय आयात केलेल्या इंधनावर अवलंबून राहणे कमी होईल. या व्यतिरिक्त रेल्वेगाड्यांची सरासरी गती वाढेल त्यामुळे उद्योगधंद्यांची वाढ होईल, कृषी आधारीत उद्योग वाढून ग्रामस्थांचा आणि शेतकऱ्यांचा विकास साध्य होईल. शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनांची वाहतूक करण्यासाठी रेल्वेने 'किसान रेल' सुरू केली.सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटीबद्ध आहे.
गोयल यांनी यावेळी सर्वांना मास्क वापरणे, शारीरिक अंतर बाळगणे आणि स्वच्छतेची काळजी घेणे या कोविड मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचे आवाहनही केले.
Jaydevi P.S./S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1677077)
आगंतुक पटल : 238