पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

पर्यावरण आणि जैवविविधता संवर्धन क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि फिनलँड यांच्यात सामंजस्य करार


हवामान बदल क्षेत्रातील सहकार्यासाठी केलेल्या सामंजस्य करारामुळे जगाला सकारात्मक संकेत मिळेल : प्रकाश जावडेकर

Posted On: 26 NOV 2020 6:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली ,  26 नोव्हेंबर 2020

भारत आणि फिनलँड यांनी आज पर्यावरण संरक्षण आणि जैवविविधता संवर्धन क्षेत्रात उभय देशांमधील सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

भारत आणि फिनलंड यांच्यात भागीदारी विकसित करण्यासाठी आणि सहाय्य करण्यासाठी हवा आणि जल प्रदूषण प्रतिबंध; कचरा व्यवस्थापन; परिपत्रक अर्थव्यवस्थेची जाहिरात, कमी कार्बनचे समाधान आणि जंगलांसह नैसर्गिक संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन; हवामान बदल; सागरी आणि किनारी संसाधनांचे संरक्षण; इ. क्षेत्रांमध्ये सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण आणि सहाय्य प्रदान करण्यासाठी  सामंजस्य करार हे  एक व्यासपीठ आहे.

या सामंजस्य करारावर भारताकडून केंद्रीय  पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री  प्रकाश जावडेकर आणि  फिनलंड  सरकारकडून  पर्यावरण व हवामान बदल मंत्री क्रिस्टा मिककोनेन यांनी आभासी पद्धतीने झालेल्या कार्यक्रमात स्वाक्षऱ्या केल्या.

सामंजस्य करारात परस्पर हितसंबंध लक्षात घेत  संयुक्त प्रकल्प उभारण्याची शक्यता असून  हा सामंजस्य करार आम्हाला पॅरिस करारा अंतर्गत वचनबद्धतेच्या पूर्ततेसाठी अधिक लक्षपूर्वक एकत्र काम करण्यासाठी वचनबद्ध करेल, असे जावडेकर  म्हणाले.

भारताने 2005  साली निर्धारित केलेल्या , भारताच्या जीडीपीच्या  21 % इतकी उत्सर्जनाची तीव्रता राखण्याचे  स्वैच्छिक उद्दिष्ठ 2020 साली पूर्ण केले आहे आणि  उत्सर्जनाची तीव्रता  2030 पर्यंत 35 %  इतकी कमी करण्याचे निर्धारित  उद्दिष्ठ वेळेपूर्वी साध्य करण्याचे ठरवले असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.

पॅरिस कराराअंतर्गत सादर केलेल्या राष्ट्रीय निर्धारीत योगदानाचा एक भाग म्हणून, भारताने हवामान बदलांची तीन परिमाणलक्ष्ये निर्धारित केली आहेत.  2030 पर्यंत उत्सर्जनाची तीव्रता जीडीपीच्या 35% इतकी कमी करण्याचे   उद्दिष्ठ वेळेपूर्वी साध्य करणे , 2030 पर्यंत देशातील 40 टक्के वीज निर्मितीसाठी जीवाष्म इंधनाऐवजी अन्य पर्यायी ऊर्जा स्रोतांचा वापर करणे आणि वनस्पती आच्छादन आणि जंगलांच्या माध्यमातून 2 ते 3 अब्ज टन इतका अतिरिक्त कार्बन सिंक  2030 पर्यंत निर्माण करणे.

या सामंजस्य करारामुळे, उभय देशातील  तंत्रज्ञानविषयक, वैज्ञानिक आणि व्यवस्थापन क्षमता बळकट  होऊन पर्यावरण संरक्षण आणि जैवविविधता संवर्धनाच्या क्षेत्रात  समानता , परस्पर आणि उभयपक्षी लाभ होईल अशा  प्रकारचे  द्विपक्षीय सहकार्य  वृद्धिंगत होईल आणि त्यामुळे शाश्वत विकासाला चालना मिळेल.

 

 

Jaydevi P.S/S.Mhatre/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1676126) Visitor Counter : 149