पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी बंगळुरू टेक समिट अर्थात  तंत्रज्ञान शिखर परिषदेचे केले उद्घाटन


माहितीच्या युगात सर्वप्रथम नव्हे तर सर्वोत्तम तंत्रज्ञान आणण्याला महत्व : पंतप्रधान

भारतात संरचना केलेल्या मात्र जगभरात वापरता येईल अशा तांत्रिक संशोधनाची आज गरज  : पंतप्रधान

Posted On: 19 NOV 2020 3:28PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बंगळुरू येथे  आयोजित टेक समिटचे उद्घाटन केले.  माहिती तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान आणि स्टार्टअप वरील कर्नाटक इनोव्हेशन ॲण्ड टेक्नॉलॉजी सोसायटी (केआयटीएस) हा कर्नाटक सरकारचा उपक्रम तसेच सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ  इंडिया (एसटीपीआय) आणि एमएम ऍक्टिव्ह साय-टेक कम्युनिकेशन्स यांच्या सहकार्याने ही  तंत्रज्ञान शिखर परिषद आयोजित केली आहे.या वर्षाच्या परिषदेची संकल्पना "नेक्स्ट इज नाऊ " आहे.  केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि   माहिती तंत्रज्ञान , दळणवळण आणि  कायदा व न्यायमंत्री रविशंकर प्रसादकर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येदियुरप्पा यावेळी उपस्थित होते.

आज डिजिटल इंडियाकडे  कोणताही नियमित शासकीय उपक्रम म्हणून पाहिले जात नाही, तर आज ती  विशेषत: गरीब, उपेक्षित आणि सरकारमधील लोकांसाठी जीवनशैली बनली आहे याविषयी  पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला .

तंत्रज्ञानविषयक या  शिखर परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की डिजिटल इंडियामुळे आपल्या देशाने विकासाकडे अधिक मानव केंद्रित दृष्टिकोनातून पाहिले.  ते म्हणाले की, तंत्रज्ञानाचा इतक्या मोठ्या प्रमाणात वापर केल्यामुळे नागरिकांसाठी व्यापक बदल झाले आहेत आणि त्याचे फायदे स्पष्टपणे दिसून येत आहेत.  सरकारने  डिजिटल आणि तंत्रज्ञान वापरासाठी केवळ बाजारपेठ निर्माण  केली नाही, तर त्यांना सर्व योजनांचा एक महत्त्वाचा भाग बनवला आहे असे ते म्हणाले .  त्यांचे शासन मॉडेल हे तंत्रज्ञान प्रथम आहे आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मानवी प्रतिष्ठा वाढवण्यात आली आहे ज्यात एका क्लिकवर कोट्यावधी शेतकर्‍यांना आर्थिक मदत मिळत आहे  आणि जगातील सर्वात मोठी  आयुषमान भारत ही आरोग्यसेवेशी निगडित योजना यशस्वीरीत्या सुरु आहे. लॉकडाऊनच्या कठीण काळातही तंत्रज्ञानाने गरीबांना योग्य आणि त्वरित मदत सुनिश्चित केली असे सांगत  ते म्हणाले की अशा प्रकारे तंत्रज्ञानाच्या

सहाय्यानें  मदत दिल्याची उदाहरणे अभावाने आढळतील. 

पंतप्रधान म्हणाले की, उत्तम आणि प्रभावी सेवा सुनिश्चित करण्यासाठी सरकारने माहिती विश्लेषणाच्या सामर्थ्याचा वापर केला. ते म्हणाले की तंत्रज्ञान हे मुख्य कारण आहे की ज्याने आपल्या योजना फायली ओलांडून बाहेर आणल्या आणि इतक्या वेगाने आणि व्यापक  प्रमाणात लोकांचे जीवन बदलले. ते म्हणाले, तंत्रज्ञानामुळे आम्ही सर्वांना वीज पुरवण्यास सक्षम आहोत, पथकर नाक्यांवरील वाहतूक गतिमान झाली आहे, अत्यंत कमी कालावधीत मोठ्या लोकसंख्येचे  लसीकरणं करण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे.

या महामारीच्या काळात आपली लवचिकता दाखविल्याबद्दल पंतप्रधानांनी तंत्रज्ञान क्षेत्राचे कौतुक केले. दशकभरात वापरले नसेल एवढे  तंत्रज्ञान  काही महिन्यांतच वापरण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कुठूनही  काम करणे आता सर्वसामान्य बनले आहे आणि ते कायम राहणार आहे. ते म्हणाले, शिक्षण, आरोग्य, खरेदी इत्यादी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा अवलंब केला जाईल.

पंतप्रधान म्हणाले की औद्योगिक युगाची कामगिरी आता भूतकाळात जमा झाली आहे  आणि आता आपण माहितीच्या युगाच्या मध्यभागी आहोत. ते म्हणाले की औद्योगिक युगात बदल एकरेषीय होता परंतु माहितीच्या युगात बदल  विध्वंसक  आहे. ते म्हणाले की, माहिती-युगात औद्योगिक युगाप्रमाणे प्रथम कृती करणाऱ्याला नाही तर  उत्कृष्ट कृतीला महत्त्व आहे. ते म्हणाले की, बाजारपेठेतील सर्व विद्यमान समीकरणे विस्कळीत करणारी कोणतीही वस्तू कधीही कोणालाही तयार करता येते.

पंतप्रधान म्हणाले की माहिती युगात पुढे झेप घेण्यासाठी भारत विशिष्ट स्थानी आहे. ते म्हणाले की, भारताकडे सर्वात उत्तम बुद्धिमत्ता  तसेच मोठी बाजारपेठ आहे. आपल्या स्थानिक तंत्रज्ञान संशोधनात जागतिक पातळीवर जाण्याची क्षमता असल्याचे त्यांनी नमूद केले. भारतात संरचना केलेल्या मात्र जगभरात वापरता येईल अशा तांत्रिक संशोधनाची आज गरज आहे यावर त्यांनी भर दिला. ते म्हणाले की, सरकारच्या धोरणात्मक निर्णयाचे उद्दीष्ट तंत्रज्ञान व नाविन्यपूर्ण उद्योगांचे उदारीकरण करणे हे आहे. याचे उदाहरण म्हणजे अलिकडेच माहिती तंत्रज्ञान उद्योगातील अनुपालन ओझे कमी करण्यात आले. . ते म्हणाले की, सरकार तंत्रज्ञान उद्योगातील हितधारकांना सहभागी करून घेण्याचा  आणि भारतासाठी सुरक्षित भविष्यातील धोरण आराखडा तयार करण्याचा नेहमीच प्रयत्न करते

चौकटबद्ध मानसिकतेत बहुविध यशस्वी उत्पादनांची परिसंस्था  तयार करण्याची क्षमता असते, असे सांगत  पंतप्रधानांनी ,यूपीआय, नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन, स्वामीत्व योजना इत्यादी अशा प्रकारे राबविलेल्या  उपक्रमांची त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले की  तंत्रज्ञानाच्या विकासामुळे सरंक्षण क्षेत्रात मोठे बदल होत आहेत.  तंत्रज्ञानाच्या वापराच्या वेगवान वाढीसह माहितीचे संरक्षण तसेच सायबर सुरक्षेची गरज यावर त्यांनी भर दिला. सायबर हल्ले आणि विषाणूंविरूद्ध डिजिटल उत्पादनांचा प्रभावीपणे वापर करता  येईल असे मजबूत सायबर सुरक्षा संशोधन करण्यात तरुण वर्ग मोठी भूमिका बजावू शकतात असे त्यांनी सुचवले.

जैवविज्ञान, अभियांत्रिकी इत्यादी विज्ञानातील क्षेत्रात नवनिर्मितीची व्याप्ती व गरज कालसुसंगत  असल्याचे पंतप्रधान म्हणाले. अभिनवता ही प्रगतीची गुरुकिल्ली आहे आणि जेव्हा नाविन्यतेचा मुद्दा येतो  तेव्हा भारताला त्याचा स्पष्ट लाभ झालेला दिसतो  कारण आपल्या तरुणांकडे नवसंशोधन  करण्याची प्रतिभा आणि उत्साह. आहे. आपल्या युवकांची क्षमता आणि तंत्रज्ञानाच्या शक्यता अमर्याद  आहेत, असे सांगत , आपण आपले सर्वोत्तम देण्याची आणि त्याचा लाभ उठवण्याची हीच  वेळ आहे, असेही त्यांनी नमूद केले. आपले माहिती तंत्रज्ञान क्षेत्र आपल्याला कायम  अभिमान वाटेल अशी कामगिरी करत  राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

Jaydevi PS/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1674006) Visitor Counter : 278