संरक्षण मंत्रालय

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते एनसीसीच्या महिन्याभराच्या संविधान दिन युवा क्लब मोहिमेचे उद्घाटन; घटनात्मक हक्क आणि कर्तव्याबद्दल जागरूकता पसरविण्यासाठी तरुणांना केले प्रोत्साहित

Posted On: 18 NOV 2020 6:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 नोव्‍हेंबर 2020

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेना तर्फे आयोजित एक महिन्याच्या देशव्यापी संविधान  दिन युवा क्लब उपक्रम कार्यक्रमाचे नवी दिल्ली येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून, उद्घाटन केले. देशातील नागरिकांमध्ये भारतीय राज्यघटने विषयी जनजागृती निर्माण व्हावी यासाठी युवकांना एकत्रित करणे हे या कार्यक्रमाचे उद्दीष्ट आहे.

आपल्या उद्घाटन भाषणात संरक्षणमंत्र्यांनी देशातील तरुणांना राज्यघटनेची भावना समजून घेण्यासाठी आणि प्रामाणिकपणे कार्य करण्याची प्रेरणा दिली. ते म्हणाले की अनेक वर्षांच्या सखोल चर्चा आणि विचारविनिमयानंतर आपल्या घटनेला एक स्वरूप प्राप्त झाले आहे. आपल्या राज्यघटनेची प्रस्तावना “आम्ही” या शब्दाने सुरू होते आणि म्हणूनच आपण आपला देश आणि आपली व्यवस्था कशी पुढे नेतो हे आपल्या सर्वांवर अवलंबून आहे. घटनेत नमूद केल्याप्रमाणे आम्हाला लोकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्याची गरज आहे परंतु त्यासोबतच त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली पाहिजे कारण हक्क आणि कर्तव्ये एकमेकांशी जोडलेले आहेत आणि कर्तव्ये पूर्ण केल्याशिवाय कोणीही आपल्या हक्कांचा आनंद घेऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.

राजनाथ सिंह म्हणाले की राज्यघटना शिस्त, विविधतेत एकता, स्वातंत्र्य, समानता, सार्वभौमत्व आणि सामाजिक ऐक्य या मूलभूत मूल्यांच्या माध्यमातून लोकांचे मार्गदर्शन करते याची जाणीव लोकांना या मोहिमेच्या माध्यमातून करून दिली पाहिजे. ‘नव भारताची’ निर्मिती आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.  राजनाथ सिंह पुढे म्हणाले, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, डॉ. बी. आर. आंबेडकर आणि पंडित दीनदयाल उपाध्याय या महान नेत्यांकडून प्रेरणा घेत आपण घटनेच्या आदर्शांचे दृढनिश्चयपूर्वक पालन केले पाहिजे.

केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)  किरेन रिजिजू यांनीही यावेळी आपले मत व्यक्त केले.

18 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर 2020 पर्यंत, महिनाभर चालणारी ही मोहीम देशातील युवा संघटना अर्थात राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), नेहरू युवा केंद्र संघटना (एनवायकेएस), भारत स्काउट्स आणि गाईड, हिंदुस्तान स्काउट्स आणि गाईड संघटना आणि रेड क्रॉस यांच्यातर्फे राबविण्यात येणार आहे.

भारतीय राज्यघटनेची मूलभूत तत्त्वे आणि गाभ्याविषयी जनतेत जनजागृती निर्माण करणे, भारतीय राज्यघटनेत निहित मूलभूत कर्तव्याची जाणीव करण्यासोबतच, जबाबदार व उत्पादक नागरिकांचे गुण तसेच भारतीय राज्य घटनेचे महत्त्व लोकांना समजावून सांगणे ही या मोहिमेची प्रमुख उद्दीष्टे आहेत त्यासोबतच डॉ. बी.आर. आंबेडकरांचा समानता आणि सकारात्मक कृतीच्या संदेश सर्वदूर पसरवणे हे देखील उद्दिष्ट आहे.

22 ते 24 नोव्हेंबर 20 या कालावधीत  युवकांनी राष्ट्रव्यापी रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. मोहिमेदरम्यान, तरुण सोशल मीडियावर # Its My Duty (न्याय विभाग) आणि # MeraKartavya (एनसीसी ट्विटर हँडल) याचा प्रचार देखील करतील. ईमेल, संदेश आणि बॅनरद्वारेही जागरूकता संदेश पोहोचविला जाईल. या मोहिमेत नागरिकांची निसर्गाप्रती असलेली जबाबदारी आणि घर व परिसरामध्ये आठवडाभर स्वच्छता मोहिम राबविण्याच्या  उद्देशाने जागरुकता कार्यक्रमांचा समावेश असेल.

संरक्षण सचिव, डॉ. अजय कुमार,  युवा व्यवहार सचिव  उषा शर्मा आणि एनसीसीचे महासंचालक  लेफ्टनंट जनरल राजीव चोप्रा यांनीही या व्हिडिओ परिषदेला संबोधित केले.

  


* * *

Jaydevi PS/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1673801) Visitor Counter : 222