आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

नऊ राज्यांचे आरोग्यमंत्री आणि वरिष्ठ आरोग्य अधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी घेतला कोविड आणि सार्वजनिक आरोग्य सुविधांचा आढावा


पंतप्रधानांच्या कोविड जन चळवळीला महत्व देण्यावर भर

‘कोविडचा सामना करण्यासाठी आजही नियमांचे काटेकोर पालन हाच सर्वोत्तम उपाय असून नियम पाळणे अत्यंत सोपे’-डॉ हर्षवर्धन

Posted On: 09 NOV 2020 6:01PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 नोव्‍हेंबर 2020


केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आज नऊ राज्यांचे आरोग्यमंत्री आणि आरोग्य सचिव/अतिरिक्त सचिव यांच्याशी चर्चा केली. यात आंध्र प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, राजस्थान हिमाचल प्रदेश, तेलंगणा, पंजाब, हरियाणा आणि केरळ या राज्यांचा समावेश होता.

या राज्यांमध्ये/ काही जिल्ह्यांमध्ये कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आढळले आहे. गेल्या सात दिवसांत सरासरी रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. चाचण्या मात्र कमी होत असून, रुग्णालयात दाखल केल्यानंतर एक-दोन दिवसांतच रुग्णाचा मृत्यू होत असून त्यामुळे सरासरी मृत्युदरही वाढला आहे. विशेषत: कोविडचा धोका असलेल्या लोकांमधील मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

देशात 8 जानेवारीला सरकारने कोविडविषयक पहिली बैठक घेतली होती, त्याला आज 11 महिने पूर्ण झाल्याचे स्मरण डॉ हर्षवर्धन यांनी बैठकीच्या सुरुवातीला केले. येणारा  हिवाळा आणि सणवारांचा कालखंड लक्षात घेता कोविडचा संसर्ग वाढण्याची भीती असून आतापर्यंत आपण या लढाईत जे यश मिळवले आहे, त्याला गालबोट लागण्याची शक्यता आहे, असे हर्षवर्धन म्हणाले. त्यामुळे या संपूर्ण उत्सव काळात आपल्याला अत्यंत सजग आणि सावध राहण्याची गरज आहे. दसऱ्यापासून सुरु झालेला हा सणवारांचा काळ मकर संक्रांतीपर्यंत राहणार आहे. तसेच, श्वसनजन्य आजारांचा संसर्ग हिवाळ्यात अधिक होतो, याची आठवण  ही त्यांनी करुन दिली.

कोविड काळात देशाचा प्रवास कसा झाला याविषयी माहिती देतांना त्यांनी सांगितले, की जानेवारी महिन्यात देशात फक्त पुण्यातल्या एनआयव्ही राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या  प्रयोगशाळेत कोविडची चाचणी होत असे, मात्र आता, देशात या चाचणीसाठी 2074 प्रयोगशाळा अस्तित्वात आहेत, ज्यामुळे चाचण्यांची क्षमता दररोज 15 लाखांपर्यंत वाढली आहे. त्याशिवाय कोविड रुग्णालये आणि अतिदक्षता व्यवस्था कक्ष सुविधाही वाढवण्यात आल्या आहेत  सध्या एकूण कोविड रूग्णांपैकी सध्या केवळ 0.4४ टक्के  रुग्ण जीवरक्षक प्रणालीवर, 2.47 टक्के रुग्ण अतिदक्षता विभागात आणि 4.13 टक्के रुग्ण ऑक्सिजन आधारावर आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. जगात, रुग्ण बरे होण्याचा सर्वाधिक दर भारताचा असून सर्वात कमी मृत्यूदर आहे, असेही त्यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपूर्वी सात राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांशी झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी यावेळी दिली. या आजाराच्या आलेखाची दखल स्वतः पंतप्रधान घेत असतात, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी कोविडविषयक जनजागृतीसाठी वारंवार देशाला उद्देशून भाषण केले. सर्व  राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रमुखांसोबत वारंवार सखोल-सविस्तर चर्चा केली.अलीकडेच त्यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात, त्यांनी कोविडपासून खबदारी घेण्यासाठी नियामचे काटेकोर पालन करण्यावर भर दिला, असे डॉ. हर्षवर्धन यांनी  सांगितले.

कोविड विरुद्धची लढाई आता जन चळवळ झाली आहे, असे सांगत, या जन चळवळीला अधिक व्यापक स्वरूप द्यावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. सरकारने ही चळवळ लोकांपर्यंत पोचवावी  अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सरकारने  या जन चळवळीसाठी कोणकोणते उपक्रम हती घेतले याचीही माहिती त्यांनी दिली. आजही कोरोनाचा विषाणू अस्तित्वात असून त्यापासून संरक्षणासाठी नियमांचे पालन हाच सर्वोत्तम उपाय असून या नियमांचे पालन करणे अजिबात कठीण नाही, असे डॉ हर्षवर्धन यावेळी म्हणाले.

  

यावेळी,राष्ट्रीय रोग प्रतिबंधक केंद्राचे संचालक डॉ सुजित सिंग यांनी, विविध राज्यांतील कोविड आणि सध्याची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था याविषयी माहिती दिली.ज्या  प्रदेश/जिल्ह्यांमधील  कोविड  स्थिती अजूनही गंभीर आहे  त्यांची माहिती सिंग यांनी अधोरेखित केली.
राज्याच्या मंत्र्यांनी त्यांच्या त्यांच्या राज्यात सुरु असलेल्या कोविड प्रतिबंधक उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. ज्या ज्या ठिकाणी नियंत्रणासाठी उत्तम उपाययोजना राबवल्या गेल्या, त्यांचीही माहिती यावेळी देण्यात आली.

कोविडवर नियंत्रण मिळवण्यासाठी, दहा महत्वाच्या भागांकडे नीट लक्ष दिले जावे, अशी सूचना आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी यावेळी केली. चाचण्या वाढवणे, बाजारपेठा , वर्कशॉप, धर्मिक स्थळे अशा ठिकाणी निश्चित चाचण्या घेणे, RT-PCR चाचण्यांची संख्या वाढवणे, लक्षणविरहित रुग्णांची RAT चाचणी अनिवार्य करणे, संपर्कात आलेल्यांच्या चाचण्या 72  तासांच्या आत करणे, दररोज संपर्कात आलेल्या  सुमारे 10-15 लोकांचा मागोवा घेणे, मोठ्या प्रमाणत, आरोग्यविषयक जनजागृती करत मृत्यूदर आटोक्यात आणणे, दररोज प्रत्येक रुग्णालयात झालेल्या मृत्यूंचे विश्लेषण करत ते टाळण्यासाठीच्या उपाययोजना शोधणे, कोरोनाचा धोका असलेल्या लोकांना  संरक्षण देणे आणि कोविड नियमांच्या पालनाविषयी सविस्तर  माहिती देण्यासाठी प्रचारमोहीम यांचा यांचा या दहा महत्वाच्या बाबीत समावेश आहे.


* * *

JPS/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1671458) Visitor Counter : 232