आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
आरोग्य मंत्रालयाच्या ई-संजीवनी या टेलीमेडिसिन सेवेने केला 7 लाखांचा टप्पा पूर्ण
दररोज 10000 रुग्ण-डॉक्टर सल्ला सेवेमुळे 11 दिवसांत एक लाखाचा टप्पा पूर्ण
Posted On:
07 NOV 2020 3:42PM by PIB Mumbai
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने सुरु केलेल्या ई-संजीवनी या राष्ट्रीय टेलीमेडिसिन सेवेने आज सात लाख रुग्णांना ऑनलाईन स्वरूपात वैद्यकीय सल्ला देण्याचा टप्पा पूर्ण केला आहे. एक लाख रूग्णांना गेल्या 11 दिवसांत सल्ला देण्यात आला. आभासी स्वरुपात बाह्य रुग्ण चिकित्सा सेवा देणारी ही वैद्यकीय सेवा अल्पावधीतचा देशभरात लोकप्रिय झाली आहे. दररोज या सेवेअंतर्गत 10,000 रूग्णांना सल्ले दिले जात असून, लवकरच ही देशातली सर्वात मोठी ओपीडी सेवा ठरण्याच्या मार्गावर आहे.
आरोग्य सेवा लोकांपर्यंत पोचवण्यासाठी सुरु करण्यात आलेला हा अभिनव उपक्रम लहान गावे आणि ग्रामीण भागात प्रभावी ठरतो आहे. रूग्णांसाठी तर टेलीमेडिसिन सेवा लाभदायक आहेच, पण कोविडच्या काळात आभासी सेवा दिल्यामुळे, डॉक्टर आणि रुग्णांचा प्रत्यक्ष संबंध टाळला जातो, त्यामुळे डॉक्टर देखील ही सेवा पसंत करतात. ई-संजीवनी मुळे डॉक्टरांना विशिष्ट ठिकाणी उपस्थित राहण्याची गरज नाही. जी राज्ये भौगोलिकदृष्ट्या मोठी आहेत, तिथे, उपलब्ध मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन करण्यास सोयीचे जात आहे. ज्या रूग्णांना ऑनलाईन सल्ला हवा आहे, त्यांना आभासी स्वरूपातल्या रांगेत ठेवले जाते आणी त्यांचा नंबर आल्यावर ते संबधित डॉक्टरशी आभासी स्वरूपात संवाद साधतात. या सल्लामसलतीनंतर डॉक्टर, ई-प्रिस्क्रिप्शन तयार करतात, जे दाखवून रूग्णांना औषधे विकत घेता येतात. ही ई-प्रिस्क्रिप्शन्स वैध समजून त्यानुसार औषध देण्याचे आदेश केरळ आणि तामिळनाडू या राज्यांनी आधीच जारी केले आहेत.
आतापर्यंत तामिळनाडू, उत्तरप्रदेश, केरळ, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, उत्तराखंड, कर्नाटक आणि महाराष्ट्र या दहा राज्यांनी ई संजीवनी योजनेचा सर्वाधिक लाभ घेतला आहे.
ई-संजीवनी च्या माध्यमातून दोन प्रकारच्या ऑनलाईन सेवा दिल्या जातात. एक म्हणजे जनरल फिजिशियन आणि विशेषज्ञ, म्हणजे- डॉक्टर ते डॉक्टर सेवा (ई-संजीवनी AB-HWC) आणि रुग्ण ते डॉक्टर सेवा (ई-संजीवनी OPD) टेली-कन्सलटेशन्स. पहिली सेवा नोव्हेंबर 2019 मध्ये सुरु करण्यात आली असून आयुष्मान भारत योजनेत तिचे महत्वाचे योगदान आहे. तर दुसरी सेवा, देशातील 1.5 लाख आरोग्य आणि निरामय केंद्रांमध्ये डिसेंबर 2022 पर्यंत ‘हब एंड स्पोक’ पद्धती म्हणजे एककेंद्र ते विविध शाखा अशा स्वरूपात राबवली जाणार आहे. राज्यांना वैद्यकीय महाविद्यालये आणि जिल्हा रूग्णालयात हब म्हणजेच केंद्र तयार करावे लागतील, ज्यांच्यामार्फत विविध आरोग्य केंद्रांमध्ये म्हणजेच स्पोक्स (शाखा) ही सेवा देता येऊ शकेल. आरोग्य मंत्रालयने कोविड च्या काळात लोकांपर्यंत वैद्यकीय सेवा पोचवण्यासाठी एप्रिल महिन्यात ई-संजीवनीओपीडी सेवा सुरु केली.
****
S.Thakur/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1671007)
Visitor Counter : 243