उपराष्ट्रपती कार्यालय
प्रभू श्रीरामांचे आयुष्य आणि मूल्यातून शिकवण घेत त्यांनी दाखवलेल्या सन्मार्गाने वाटचाल करा- उपराष्ट्रपती
‘थवास्मी:रामायणाच्या दृष्टीतून आयुष्य आणि कौशल्ये” या शीर्षकाच्या पुस्तकाचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशन
Posted On:
06 NOV 2020 4:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर 2020
प्रभू श्रीरामांचे जीवन आणि त्यांनी सांगितलेल्या मूल्यांच्या शिकवणीतून धडा घेत यशस्वी आयुष्यासाठी सन्मार्गाने वाटचाल करा, असा सल्ला उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू यांनी नव्या पिढीला दिला आहे.
उपराष्ट्रपतींच्या हस्ते आज ‘थवास्मी: रामायणाच्या दृष्टीतून आयुष्य आणि कौशल्ये” या शीर्षकाच्या पुस्तकाचे दूरदृश्य प्रणालीद्वारे आभासी स्वरुपात प्रकाशन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. प्रभू श्रीरामांचे आयुष्य, त्यांचे शब्द आणि कृती यातून, सत्य आणि धर्म प्रत्येकाच्याच आयुष्याचे अविभाज्य घटक कसे होऊ शकतात, याची शिकवण आपल्याला मिळते, असे उपराष्ट्रपती म्हणाले. प्रभू श्रीरामांचे आपले माता-पिता, भावंडे, पत्नी, मित्र, गुरुवर्य आणि शत्रूशी सुद्धा कसे संबंध होते, त्यांची वर्तणूक कशी होती, याचा अभ्यास केल्यास आपल्याला आदर्श व्यक्ती कशी असावी याचे मार्गदर्शन मिळते. आयुष्यातील आव्हानांचा सामना आदर्श व्यक्ती कशा करतात, आणि त्यातून तावून-सुलाखून अधिकच तेजस्वी कशा होतात, याचा पाठच आपल्याला रामचरित्रातून शिकता येतो, असे त्यांनी सांगितले.
प्रभू श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम होते, असे सांगत उपराष्ट्रपती म्हणाले की, ते एक उत्तम शासकही होते. रामराज्य म्हणजेच सुशासनाचे ते चालते बोलते प्रतीक होते आणि त्यामुळेच त्यांना कायम जनतेच्या हृदयात स्थान मिळाले, असे नायडू यावेळी म्हणाले.
वाल्मिकी रामायण हे केवळ आदिकाव्य नाही, तर अनादी काव्य आहे, कारण ते कालातीत आहे, शाश्वत आणि त्यामुळेच कोणत्याही कालखंडात ते सुसंगत व अनुकरणीय ठरते, असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. रामायण विद्वानांना आकर्षित करणारे आहे त्याचवेळी सर्वसामान्य, अशिक्षितांवर देखील त्याची आजही मोहिनी आहे, असे ते पुढे म्हणाले.
रामायण लहानथोर साऱ्यांना प्रेरणा देणारे आहे, आयुष्य आणखी अर्थवाही, समृद्ध करण्यासाठी आवश्यक असे सकारात्मक विचार आपल्याला रामायणातून मिळतात. आपण दुष्ट, विघातक शक्तींवर सद्गद्गुण, न्याय आणि सौहार्दाने मिळवलेल्या विजयाचा उत्सव साजरा करतो, अशी माहिती त्यांनी दिली.
‘थवास्मी: रामायणाच्या दृष्टीतून आयुष्य आणि कौशल्ये’ हे पुस्तक चार खंडात लिहिले असून युवा संशोधकांच्या चमूने सखोल संशोधन आणि अध्ययनातून हे पुस्तक तयार केले आहे. या पुस्तकात, एक पिता आणि त्यांची कन्या यांच्यातील संवादाच्या माध्यमातून रामायणाची कथा आणि त्या कथेमागचे अन्वयार्थ उलगडत जातात, ज्यामुळे हे पुस्तक अधिकच रोचक बनले आहे.
या कार्यक्रमात माजी दक्षता आयुक्त के व्ही चौधरी, पुस्तकाचे लेखक आर श्रीराम चक्रधर, सहलेखिका सारडा दीप्ती आणि चमूचा सहभाग होता.
* * *
S.Thakur/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1670637)
Visitor Counter : 212