पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 ऑक्टोबर रोजी केवडिया येथील एकता दिवस कार्यक्रमात सहभागी होणार
एकता शपथ देणार आणि एकता दिवस संचलनात सहभागी होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘‘आरंभ’’- इंटिग्रेटेड फौंडेशन कोर्सच्या दुस-या सत्रात भारतीय नागरी सेवेतल्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी संवाद साधणार
केवडिया एकात्मिक विकास अंतर्गत 30 आणि 31 ऑक्टोबरला विविध प्रकल्पांचे उद्घाटन करणार
Posted On:
28 OCT 2020 9:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधल्या केवडिया येथे सरदार पटेल यांची 145 वी जयंती 31 ऑक्टोबर 2020 रोजी एकता दिवसाच्या रुपाने साजरी करण्यासाठीच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
पंतप्रधान मोदी यावेळी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला म्हणजेच सरदार वल्लभभाई यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करणार आहेत. सर्वजण एकता प्रतिज्ञा करणार असून पंतप्रधान यावेळी एकता दिन संचलनाची पाहणी करणार आहेत.
या संचलनात गुजरात राज्य व केंद्रीय राखीव सशस्त्र दल, सीमा सुरक्षा दल, भारत-तिबेट सीमा पोलिस, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांचे पोलिस दल सहभागी होतील. सीआरपीएफ महिला अधिकाऱ्यांची रायफल ड्रील यावेळी होणार आहे. तसेच एकता दिवस सांस्कृतिक कार्यक्रमात आदिवासी परंपरेचे दर्शन घडणार आहे. या सोहळ्यानिमित्त भारतीय हवाई दल हवाई कसरती सादर करणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी केवडिया येथून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये रूजू होणा-या 428 प्रशिक्षणार्थी अधिका-यांच्या तुकडीशी संवाद साधणार आहे. ‘‘आरंभ’’ अंतर्गत इंटिग्रेटेड फाऊंडेशन अभ्यासक्रमाचे दुसरे सत्र असणार आहे. ‘आरंभ’ उपक्रमाला 2019 मध्ये प्रारंभ झाला आहे. मसुरी येथे ‘एलबीएसएनएए’मध्ये या अधिका-यांना प्रशिक्षण देण्यात येत असून, त्यांच्याशी पंतप्रधान संवाद साधणार आहेत. आरंभ 2020 ची संकल्पना भारतातील शासन ही आहे. यात 14 ऑक्टोबर 2020 पासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ संवाद साधणार आहेत. जागतिक जागतिक बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व्हॅन ट्रोटसेनबर्ग प्रशिक्षणार्थींना संबोधित करतील.
केवडियाचा एकात्मिक विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 आणि 31 ऑक्टोबर 2020 रोजी विविध प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत.
यामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत एकता क्रूझ सेवेला प्रारंभ करण्यात येणार आहे. तसेच वल्लभभाई स्मारक परिसरामध्ये तयार करण्यात आलेल्या एकता मॉल आणि चिल्ड्रन न्यूट्रिशन पार्कचे उद्घाटन करणार आहेत. याचवेळी संयुक्त राष्ट्राने मान्य केलेल्या सर्व अधिकृत भाषांमध्ये माहिती असणा-या स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या संकेतस्थळाचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तसेच युनिटी ग्लो गार्डनमध्ये केवडिया अॅप सुरु करण्यात येणार आहे.
केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटीला आता अहमदाबाद येथून साबरमती नदीतून जाता येणार आहे. त्यासाठी अहमदाबादच्या साबरमती रिव्हरफ्रंट येथून सी प्लेन सेवा म्हणजे ‘सागरी विमान सेवा’ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात येणार आहे.
एकता क्रूझ सेवा
स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसरामध्ये एकता क्रूझ सेवा सुरू करण्यात येणार असून या फेरी बोटीतून सहा किलोमीटरचे अंतर 40 मिनिटांत पार करण्यात येणार आहे. 200 प्रवासी क्षमता असलेल्या या बोटीतून पर्यटकांना स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहता येणार आहे. श्रेष्ठ भारत भवन येथून या फेरी बोटीची जलयात्रा प्रारंभ होणार आहे. या फेरीबोटीच्या सेवेसाठी या परिसरामध्ये नव्याने गोरा सेतू बांधण्यात आला आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देणा-या पर्यटकांसाठी आता बोटिंगची सेवाही उपलब्ध असणार आहे.
एकता मॉल
या मॉलमध्ये संपूर्ण देशातल्या विविध प्रकारच्या हस्तकलेच्या पारंपरिक वस्तूंचे प्रदर्शन पहायला मिळणार आहे. 35000 चैरस फूट क्षेत्रामध्ये उभारण्यात आलेल्या या मॉलमध्ये विविध राज्यांचे 20 एम्पोरियम आहेत. आपआपल्या राज्यांचे वैशिष्ट दर्शविणा-या वस्तूंची विक्री या मॉलमध्ये करण्यात येत आहे. या मॉलची उभारणी केवळ 110 दिवसांत करण्यात आली आहे.
चिल्ड्रन न्यूट्रिशन पार्क
मुलांसाठी अशा प्रकारचे पोषण आहार विषयक उद्यानाची जगामध्ये पहिल्यांदाच निर्मिती करण्यात आली आहे. हे जगातले सर्वात मोठे आणि तंत्रज्ञानावर आधारित पोषण उद्यान आहे. 35000 चैरस फूट क्षेत्रामध्ये उभारण्यात आलेल्या या उद्यानामधून एक पोषण आहार रेल्वे धावते. ही रेल्वे ‘फलशाखा गृहम’, ‘पयोनगरी’, ‘अन्नपूर्णा’, ‘पोषण पूरण’, ‘स्वस्थ भारतम्’, अशा विविध रोमांचक आणि मनोरंजक नावांच्या संकल्पनांवर तयार केलेल्या स्थानकांवर थांबते. मुलांमध्ये पोषण आहाराविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आणि रंजकतेने शैक्षणिक उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने हे पोषण उद्यान तयार करण्यात आले आहे. मिरर मेझ, पाचमितीय आभासी प्रत्यक्ष दृश्ये आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने तयार केलेले विविध खेळ आकर्षणाचे केंद्र ठरणार आहेत.
आरंभ 2020
केंद्र सरकारच्या आणि परराष्ट्र सेवेतल्या भारतीय नागरी सेवेतल्या गट-अ मधल्या प्रशिक्षणार्थी अधिका-यांना कारकिर्दीच्या सुरवातीला पंतप्रधानांबरोबर संवाद साधण्याची संधी दिली जाते. यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘आरंभ’ या उपक्रमाचे यंदा दुसरे वर्ष आहे. या अधिका-यांना परिवर्तनाचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम बनविणे आणि आपआपल्या विभागामध्ये, क्षेत्रामध्ये अखंडपणे कार्य करण्यासाठी, विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेणे हा उद्देश प्रशिक्षणाचा आहे. यासाठी ‘आरंभ’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
गुजरातमधल्या केवडिया येथे स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसरामध्ये 94 व्या फांऊडेशन कोर्सचा भाग म्हणून 20 प्रशिक्षणार्थी अधिका-यांसाठी 2019 मध्ये आठवड्याचा प्रशिक्षण कार्यक्रम ‘आरंभ’चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पंतप्रधानांनी या अधिका-यांशी संवाद साधला तसेच प्रशिक्षणार्थी अधिका-यांना मार्गदर्शनही केले होते.
यावर्षी आरंभ 2020 ची दुसरी आवृत्ती एलबीएसएनएए येथे दि. 14 ते 31ऑक्टोबर, 2020 या काळात होत आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या 18 सेवा आणि तीन रॉयल भूतान सेवा यांचे मिळून 428 अधिकारी प्रशिक्षण घेत आहेत. सध्या सर्वत्र कोविड-19 महामारीचा उद्रेक झालेला असल्यामुळे आरंभ 2020 उपक्रम आभासी स्वरूपात होत आहे. यंदा वेगवेगळ्या संकल्पना ‘आरंभ’साठी निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये ‘‘ भारतामध्ये शासन अॅट 100’, ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’, ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘नवीन भारत’ यांचा समावेश आहे. यामध्ये देशाचे सांस्कृतिक वैविध्य, आर्थिक विविधता आणि भारताचे सामर्थ्य असलेली एकता, ऊर्जा, आरोग्य यंत्रणा तयार करणे, मोठे कार्यक्रम करण्यासाठी कार्यप्रणाली तयार करणे, ‘ब्लॅक स्वान’ कार्यक्रम, शिक्षण, उद्योग आणि प्रशासन यांच्यामध्ये संशोधन तसेच नाविन्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात आणणे, यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
* * *
S.Thakur/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1668265)
Visitor Counter : 192
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam