पंतप्रधान कार्यालय

गुजरातमधील तीन प्रमुख प्रकल्पांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 24 OCT 2020 7:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर 2020

नमस्कार!

गुजरातचे  मुख्यमंत्री विजय रूपाणी , उपमुख्यमंत्री  नितिन पटेल , गुजरात भाजपा प्रदेश अध्यक्ष आणि खासदार  सी. आर. पाटिल  अन्य सर्व  मंत्रीगण, खासदार, आमदार, माझे शेतकरी मित्र, गुजरातचे सर्व बंधू आणि भगिनी ,

अंबेमातेच्या  आशीर्वादाने  आज गुजरातच्या विकासाशी संबंधित तीन महत्वाच्या प्रकल्पांची सुरुवात होत आहे. आज किसान सूर्योदय योजना, गिरनार रोपवे आणि देशातील सर्वात मोठे आणि आधुनिक हृदयरोग रुग्णालय  गुजरातला मिळत आहे. हे तिन्ही एक प्रकारे गुजरातच्या शक्ति, भक्ति आणि आरोग्याचे प्रतीक आहे. या सर्वांसाठी  गुजरातच्या लोकांचे खूप-खूप अभिनंदन .

बंधू  आणि भगिनींनोगुजरात ही नेहमीच असाधारण सामर्थ्य असलेल्या लोकांची भूमी आहे. पूज्य बापू आणि सरदार पटेल यांच्यासह  गुजरातच्या अनेक सुपुत्रांनी देशाला  सामाजिक आणि आर्थिक नेतृत्व दिले आहे. मला आनंद आहे की किसान सूर्योदय योजनेच्या माध्यमातून गुजरात पुन्हा एकदा नव्या उपक्रमासह समोर आला आहे.  सुजलाम-सुफलाम आणि  साउनी योजनेनंतर आता  सूर्योदय योजना गुजरातच्या शेतकऱ्यांसाठी मैलाचा दगड ठरेल.

किसान सूर्योदय योजनेत सर्वोच्च प्राधान्य गुजरातच्या शेतकऱ्यांच्या गरजांना देण्यात आले आहे. विजेच्या बाबतीत गेल्या अनेक वर्षांपासून गुजरातमध्ये जी कामे होत होती , ती या योजनेचा खूप मोठा  आधार बनली आहेत. एक काळ होता जेव्हा गुजरातमध्ये विजेची खूप टंचाई असायची, 24 तास वीज पुरवणे खूप मोठे आव्हान होते. मुलांचे शिक्षण असेल, शेतकऱ्यांसाठी सिंचन असेल, उद्योगांसाठी कमाई असेल या सगळ्यावर परिणाम होत होता. अशा स्थितीत विजेच्या निर्मितीपासून पारेषणापर्यंत सर्व तऱ्हेची क्षमता तयार करण्यासाठी मिशन मोडवर  काम करण्यात आले.

गुजरात देशातील पहिले राज्य होते ज्याने सौर ऊर्जेसाठी एका दशकापूर्वी  व्यापक धोरण बनवले होते. जेव्हा  2010 मध्ये पाटन इथे सौर ऊर्जेच्या प्रकल्पाचे उद्‌घाटन झाले होते, तेव्हा कुणीही कल्पना देखील केली नव्हती  कि एक दिवस भारत जगाला एक सूर्य, एक जग, एक ग्रीडचा मार्ग दाखवेल.  आज तर भारत सौर ऊर्जेचे  उत्पादन आणि उपयोग, या दोन्ही बाबतीत जगात अव्वल देशांपैकी एक आहे. मागील  6 वर्षात  देश सौर ऊर्जेच्या उत्पादनाच्या बाबतीत जगात  5 व्या क्रमांकावर पोहचला आहे. आणि वेगाने पुढे जात आहे.  

बंधू आणि भगिनींनो,

जे गावांशी जोडलेले नाहीत, शेतीशी जोडलेले नाहीत त्यांच्यापैकी खूप कमी लोकांना माहित असेल की शेतकऱ्यांना सिंचनासाठी बऱ्याचदा रात्रीच वीज मिळते. अशात शेतात सिंचनाच्या वेळी शेतकऱ्यांना रात्रभर जागावे लागते. जुनागढ आणि  गीर सोमनाथ सारख्या भागात जिथे किसान सूर्योदय योजना सुरु होत आहे, तिथे तर जंगली जनावरांचा खूप मोठा धोका असतो. म्हणूनच किसान सर्वोदय योजना, केवळ राज्यातील शेतकऱ्यांना सुरक्षा देणार नाही तर त्यांच्या जीवनात नवी पहाट देखील घेऊन येईल. शेतकऱ्यांना रात्रीऐवजी जेव्हा सकाळी  सूर्योदयापासून रात्री नऊ वाजेपर्यंत तीन टप्प्यात वीज मिळेल तेव्हा ही नवी पहाटच असेल ना?

मी  गुजरात सरकारचे  या गोष्टीसाठी  देखील अभिनंदन करतो कि अन्य व्यवस्थांना प्रभावित न करता पारेषणाची अगदी नवी क्षमता तयार करून हे काम केले जात आहे. या योजनेअंतर्गत पुढील  2-3 वर्षात सुमारे साडे 3 हज़ार सर्किट किलोमीटर नवीन पारेषण लाइन टाकण्याचे काम केले जाईल. मला सांगण्यात आले आहे कि आगामी काही दिवसात हजारांहून अधिक गावांमध्ये ही योजना  लागू देखील होईल. यापैकी देखील अधिक गावे आदिवासी बहुल परिसरात आहेत. जेव्हा या योजनेचा संपूर्ण  गुजरातमध्ये  विस्तार होईल तेव्हा ती  लाखों शेतकऱ्यांच्या आयुष्यात , त्यांच्या रोजच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणेल.

मित्रांनो,

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी, खर्च कमी करण्यासाठी, त्यांच्या समस्या कमी करण्यासाठी बदलत्या काळाबरोबरच आपल्याला आपले प्रयत्न वाढवावे लागतील. शेतकऱ्यांना कुठेही त्यांचा शेतमाल विकण्याचे स्वातंत्र्य द्यावे लागेल, किंवा मग हजारो शेतकरी उत्पादक संघाची निर्मिती , सिंचनाचे रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याचे काम असेल किंवा मग पीक विमा योजनेत सुधारणा , यूरियाचे 100 टक्के नीम कोटिंग असेल, किंवा मग देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका , याचे उद्दिष्ट हेच आहे कि देशाचे कृषी क्षेत्र  मजबूत व्हावे, शेतकऱ्यांना शेती करण्यात अडचण येऊ नये. यासाठी निरंतर नवनवीन पुढाकार घेतले जात आहेत.

देशात आज अन्नदात्याला ऊर्जादाता बनवण्याचे काम केले जात आहे. कुसुम योजनेअंतर्गत शेतकरी, शेतकरी उत्पादक संघ- FPOs,सहकारी संस्थापंचायती अशा प्रत्येक संस्थांना उजाड जमिनीवर  छोटे-छोटे सौर प्रकल्प उभारण्यासाठी सहाय्य दिले जात आहे.  देशभरातील  लाखो शेतकऱ्यांच्या सौर पंपाना ग्रीडशी जोडले जात आहे. यातून जी वीज निर्माण होईल ती शेतकरी गरजेनुसार आपल्या सिंचनासाठी वापरू शकतील आणि अतिरिक्त वीज विकूही शकतील. देशभरात सुमारे साडे 17 लाख शेतकरी कुटुंबांना सौर पंप लावण्यात मदत केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा देखील मिळेल आणि त्यांना अतिरिक्त उत्पन्न देखील मिळेल. मित्रांनो,

गुजरातने तर विजेबरोबरच सिंचन आणि पेयजलाच्या क्षेत्रातही उत्तम काम केले आहे. या कार्यक्रमाशी जोडलेल्या आपणा सर्वांना माहीत आहेच की  गुजरातमध्ये पाण्याची काय स्थिति होती. तरतुदीचा खूप मोठा हिस्सा अनेक वर्षे पाण्यासाठी खर्च करावा लागला. याचा अनेकांना अंदाज नसेल कि  गुजरातवर पाण्यासाठी आर्थिक भार खूप मोठा होता. मागील दोन दशकांच्या प्रयत्नांमुळे आज गुजरातच्या त्या जिल्हे, गावांपर्यंत देखील पाणी पोहचले आहे कि ज्याची कुणी कधी कल्पना देखील केली नसेल.

आज जेव्हा आपण  सरदार सरोवर पाहतोनर्मदेचे पाणी  गुजरातच्या दुष्काळग्रस्त भागात पोहचवणारे बंधारे पाहतो, वॉटर  ग्रिड्स पाहतो, तेव्हा गुजरातच्या लोकांच्या प्रयत्नांचा अभिमान वाटतो.  गुजरातमधील सुमारे  80 टक्के घरांमध्ये  आज नळाद्वारे पाणी पोहचले आहे. लवकरच गुजरात देशातील त्या राज्यांपैकी एक असेल ज्याच्या प्रत्येक घरात पाईपद्वारे पाणी पोहचेल. अशात जेव्हा आज गुजरातमध्ये  किसान सर्वोदय योजना सुरु होत आहे, तेव्हा सर्वांना आपला एक पण , एक मंत्र पुन्हा पाळायचा आहे. हा मंत्र आहे -प्रत्येक थेंबामागे अधिक पीक . जेव्हा शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल, तेव्हा आपल्याला जास्तीत जास्त पाणी वाचवण्यावर देखील तेवढाच भर द्यायचा आहे. नाहीतर असे नको व्हायला कि वीज येत आहे, पाणी वाहत आहे, आपण आरामात बसलो आहोत, मग तर गुजरातची वाट लागेल. पाणी संपेल, जगणे कठीण होईल. दिवसा वीज मिळाल्यामुळे शेतकऱ्यांसाठी देखील सूक्ष्म-सिंचन व्यवस्था करणे सोपे जाईल.  गुजरात ने सूक्ष्म सिंचन क्षेत्रात खूप प्रगती केली आहे. ठिबक सिंचन असेल किंवा स्प्रिंकलर असेल, किसान सर्वोदय योजनेमुळे याच्या आणखी विस्तारात मदत मिळेल.

बंधू आणि भगिनींनो,

गुजरातमध्ये  आज सर्वोदय’ बरोबर  आरोग्योदय देखील होत आहे. हा  आरोग्योदय हीच एक नवीन भेट आहे.  आज भारतातील सर्वात मोठ्या हृदयरोग रुग्णालय म्हणून , यूएन मेहता इन्स्टीट्यूट ऑफ कार्डियोलॉजी अँड रीसर्च सेन्टरचे लोकार्पण करण्यात आले. हे देशातील निवडक रुग्णालयांपैकी एक आहे जिथे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा देखील आहेत आणि तेवढ्याच आधुनिक आरोग्य सुविधा देखील आहेत.बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयाशी ‍संबंधित समस्या आपण पाहत आहोत , दररोज वाढत चालली आहे. लहान मुलांमध्ये आढळून येत आहे. अशात हे रुग्णालय गुजरातच नव्हे तर  देशभरातील लोकांसाठी खूप मोठी सुविधा आहे.

बंधू आणि भगिनींनो,

मागील दोन दशकांपासून  गुजरातने आरोग्य क्षेत्रात देखील अभूतपूर्व काम केले आहे. मग ते आधुनिक रुग्णालयांचे जाळे असेल , वैद्यकीय महाविद्यालय असेल, किंवा आरोग्य केंद्र असेल, गावागावांना उत्तम आरोग्य सुविधांशी जोडण्याचे खूप मोठे काम करण्यात आले आहे. मागील सहा वर्षात देशात आरोग्य सेवेशी संबंधित योजना सुरु झाल्या. त्याचाही लाभ गुजरातला मिळत आहे. आयुष्मान भारत योजने अंतर्गत  गुजरातच्या  21 लाख लोकांना मोफत उपचार मिळाले आहेत. स्वस्त औषधे देणारी सव्वापाचशे हून अधिक जनऔषधि केंद्र गुजरातमध्ये उघडली आहेत. यातून गुजरातच्या सामान्य रुग्णांची अंदाजे 100 कोटी रुपयांची बचत झाली आहे.

बंधू आणि भगिनींनो,

आज गुजरातला जी तिसरी भेट मिळाली आहे, त्यामुळे आस्था आणि पर्यटन दोन्ही एकमेकांशी जोडले आहे. गिरनार पर्वतावर अंबेमातेचे वास्तव्य आहे, गोरखनाथ शिखर देखील आहेगुरु दत्तात्रेय शिखर आहे, आणि जैन मंदिर देखील आहे. इथल्या हजारो पायऱ्या चढून जो शिखरावर पोहचतो तो  अद्भुत शक्ति आणि शांतीची अनुभूती घेतो. आता इथे जागतिक दर्जाचा  रोप-वे बनल्यामुळे सर्वाना सुविधा मिळेल , सर्वाना दर्शनाची संधी मिळेल. आतापर्यन्त मंदिरात जाण्यासाठी  5-7 तास लागायचे , आता ते अंतर रोपवेमुळे  7-8 मिनटात पार होईल. रोपवेचा प्रवास साहस वाढवेल , उत्सुकता देखील वाढवेल. या नवीन सुविधेनंतर इथे मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक येतील.

मित्रांनो, आज ज्या रोप-वे चा प्रारंभ झाला आहे, तो गुजरातचा चौथा रोप-वे आहे. बनासकांठा इथे माता अंबेच्या दर्शनासाठी , पावागढ़ इथे , सातपुडा इथे असे तीन रोपवे याआधीच कार्यरत आहेत. जर गिरनार रोप-वे मध्ये अडचणी आल्या नसत्या तर तो इतकी वर्षे रखडला नसता. लोकांना, पर्यटकांना त्याचा लाभ यापूर्वीच मिळाला असता. एक राष्ट्र म्हणून आपण  देखील विचार करायला हवा कि जेव्हा लोंकाना एवढी मोठी सुविधा पुरवणाऱ्या व्यवस्थेचे काम इतका दीर्घकाळ रखडले तर लोकांचे किती नुकसान होते . देशाचे किती नुकसान होते. आता हा  गिरनार रोप-वे सुरु होत आहे, तेव्हा मला आनंद होत आहे कि इथे लोंकाना तर सुविधा मिळेलच , स्थानिक युवकांना देखील रोजगाराच्या अधिक संधी मिळतील.

मित्रानो,

जगातील मोठमोठी पर्यटन स्थळे, आस्थेशी निगडित केंद्र ही गोष्ट मानतात की, आपल्याकडे जास्तीत जास्त लोक तेव्हाच येतील जेव्हा आपण पर्यटकांना आधुनिक सुविधा देऊ.  आज जेव्हा पर्यटक कुठेही जातो , आपल्या कुटुंबासह जातो तेव्हा त्याला जगण्यातील आणि प्रवासातील सुलभता हवी असते. गुजरातमध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांच्यामध्ये भारतच नाही तर जगातील सर्वात मोठे पर्यटन केंद्र बनण्याची क्षमता आहे. जर अंबामातेच्या मंदिरांबद्दल बोलायचे झाले तर भक्तांसाठी  गुजरातमध्ये पूर्ण  सर्किट आहे. मी सर्व ठिकाणांचा उल्लेख करत नाही ... आणि गुजरातच्या सर्व कानाकोपऱ्यात ही  शक्ति रूपेण माता गुजरातला  निरंतर आशीर्वाद देत असते. अंबा जी आहेपावागढ़ तर आहेच, शिखरावरील चामुंडा माता आहेउमिया माता आहेकच्छ मधील  माता नो मढ, कितीतरी, म्हणजे आपण  अनुभव करु शकतो कि गुजरातमध्ये एक  प्रकारे शक्तीचा वास आहे. अनेक प्रसिद्ध मंदिर आहेत.

अध्यात्मिक स्थळांव्यतिरिक्त देखील गुजरातमध्ये अनेक ठिकाणे आहेत ज्यांची क्षमता अद्भुत आहे. आता तुम्ही देखील पाहिले आहे कि द्वारकेच्या शिवराजपुर समुद्र किनाऱ्याला आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली आहे.  Blue Flag certification मिळाले आहे. अशी स्थळे विकसित केल्यावर इथे जास्तीत जास्त पर्यटक येतील आणि त्याबरोबर रोजगाराच्या नव्या संधी देखील घेऊन येतील. तुम्ही पहासरदार साहेबांना समर्पित स्टैच्यू ऑफ यूनिटी, जगातील सर्वात मोठा पुतळा, आता किती मोठे पर्यटन आकर्षण बनत आहे.

जेव्हा हा  कोरोना सुरु झाला, त्याच्या आधीच अंदाजे  45 लाखांपेक्षा अधिक लोकांनी  स्टैच्यू ऑफ यूनिटीला भेट दिली होती. एवढ्या कमी वेळेत 45 लाख लोक खूप मोठी गोष्ट आहे. आता  स्टैच्यू ऑफ यूनिटी पुन्हा उघडण्यात आले आहे तेव्हा ही संख्या पुन्हा वेगाने वाढत आहे. असेच एक छोटे उदाहरण देतो-  अहमदाबाद चा कांकरिया तलाव. एक काळ होता तिथे कुणी जात नव्हते. दुसऱ्या रस्त्याने जायचे. त्याचे थोडे नूतनीकरण केले, पर्यटकांच्या दृष्टीने थोड्या व्यवस्था उभारण्यात आल्या. आज स्थिती काय आहे. तिथे जाणाऱ्यांची संख्या आता वर्षाला  75 लाखावर पोहचली आहे. एकट्या अहमदाबाद शहराच्या  मध्यभागी 75 लाख, मध्यम वर्ग निम्न वर्गातील कुटुंबांसाठी हि जागा आकर्षण ठरली आहे. आणि अनेक लोकांच्या उपजीविकेचे साधन देखील बनली आहे. हे सर्व बदल पर्यटकांची वाढती संख्या आणि स्थानिक लोकांचे उत्पन्न वाढवण्यात खूप मदत करतात. आणि पर्यटन हे एक असे क्षेत्र आहे, जिथे कमीत कमी भांडवल लागते आणि जास्तीत जास्त लोंकाना रोजगार मिळतो.

आपले जे  गुजराती मित्र आणि जगभरातील  गुजराती बंधु-भगिनींना मी आज आग्रहपूर्वक सांगू इच्छितो कि , गुजरातचे Brand Ambassador सदिच्छा दूत बनून आज संपूर्ण जगात गुजरातचे लोक प्रशंसेला पात्र ठरत आहेत. जेव्हा गुजरातमध्ये नवनवीन  आकर्षण केंद्र बनत आहेत , भविष्यात देखील बनतील, तेव्हा जगभरातील आपल्या गुज्‍जु बांधवांना मी सांगेन, ते सगळे आपले मित्र, त्यांनी संपूर्ण जगात याबाबत माहिती द्यावी , जगाला आकर्षित करावे. गुजरातच्या पर्यटन स्थळांची ओळख करून द्यावी. याच्याच बरोबरीनं आपल्याला पुढे मार्गक्रमण करायचे आहे.

पुन्हा एकदा गुजरातच्या सर्व बंधू आणि भगिनींचे या  आधुनिक सुविधांसाठी मी खूप-खूप अभिनंदन करतो. अंबेमातेच्या आशीर्वादाने  गुजरात विकासाच्या नव्या उंचीवर पोहचावे अशी मी प्रार्थना करतो.  गुजरात तंदुरुस्त राहावेगुजरात सशक्त बनावे. याच शुभेच्छांसह तुमचे आभार. खूप खूप अभिनंदन.

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1667363) Visitor Counter : 155