अर्थ मंत्रालय

पीएफआरडीएच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आणि अटल पेन्शन योजना या योजनांमध्ये नागरिकांनी केलेल्या गुंतवणुकीने गाठला 5 लाखकोटी रुपयांचा एयुएम टप्पा


10 ऑक्टोबर 2020 पर्यंत साडेदहा लाख ग्राहकांसह 8,186 व्यावसायिकांनी या योजनांमध्ये केली गुंतवणूक

अटल पेंशन योजनेत अडीच कोटी नागरिकांनी घेतला सहभाग

Posted On: 16 OCT 2020 5:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 ऑक्‍टोबर 2020


विविध निवृत्तीवेतन योजनांमध्ये नागरिकांनी केलेल्या गुंतवणुकीनंतर एयुएम अर्थात व्यवस्थापनासाठीच्या निधीने 5 लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केल्याची माहिती पीएफआरडीए अर्थात निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाने दिली आहे. एनपीएस अर्थात राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आणि अटल पेन्शन योजना या दोन्ही योजनांमध्ये गेल्या 12 वर्षांच्या कालावधीत नागरिकांनी केलेल्या एकूण गुंतवणुकीमुळे हा महत्त्वाचा टप्पा गाठता आला आहे. 

या काळात राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत सहभागी झालेल्यांची आकडेवारी देखील उल्लेखनीय असून या योजनेत 70 लाख 40 हजार सरकारी कर्मचारी तर 24 लाख 24 हजार बिगर सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

इच्छुक निवृत्तीवेतन धारकांची नोंदणी, योजनेतून बाहेर पडण्यासाठी सोपे नियम आणि या योजनेतील इतर सुविधा ग्राहक अनुकूल असाव्या यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पीएफआरडीएने ग्राहकांचे प्रमाणीकरण करण्यासाठी ओटीपी तसेच ई-स्वाक्षरी वापरून कामकाज, आधार क्रमांकाच्या वापराने ऑफलाईन व्यवहार, केवायसी सत्यापनानंतर त्रयस्थ पक्षाच्या माध्यमातून व्यवहार, ई-नामांकन, राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतील ग्राहकांसाठी ई-एक्झिट सुविधा अशा अनेक नव्या पद्धतींचा नियमितपणे वापर करीत आहे.

5 लाख कोटी रुपयांचा एयुएम पार करणे हे या योजनांचे मोठे यश असून त्यावरून ग्राहकांचा पीएफआरडीए आणि एनपीएस यांच्यावर किती दृढ विश्वास आहे ते दिसून येते असे पीएफआरडीएचे अध्यक्ष सुप्रतिम बंदोपाध्याय यांनी म्हटले आहे. आमच्या ग्राहकांच्या निवृत्तीनंतरच्या निधीचे उत्तम व्यवस्थापन करून त्यांना निधी बाजारातील परताव्यानुसार अधिकाधिक फायदे मिळावेत यासाठी आम्ही उत्कृष्ट प्रणाली आणि हुशार गुंतवणूक अभ्यासक यांच्यासह कल्पक आणि मजबूत व्यवस्था निर्माण केली आहे असे त्यांनी सांगितले. कोरोना महामारी दरम्यान, निवृत्तीनंतरच्या निधीचे व्यवस्थापन फक्त बचत किंवा कर सवलत मिळवण्यासाठीच नसते ह्याचे वाढते भान व्यायसायिक तसेच व्यक्तिगत पातळीवर आल्याने अशा आव्हानात्मक परिस्थितीत देखील एनपीएस योजनेत सहभागी होणाऱ्यांच्या संख्येत सुमारे 14% वाढ दिसून आली अशी माहिती बंदोपाध्याय यांनी दिली.

 

* * *

U.Ujgare/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1665172) Visitor Counter : 125