गृह मंत्रालय

केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न, आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांच्या दु:खद निधनाबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाने शोक व्यक्त केला


त्यांच्या पार्थिवावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार

Posted On: 09 OCT 2020 2:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 ऑक्‍टोबर 2020

 

केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न, आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांच्या दु:खद निधनाबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाने शोक व्यक्त केला आहे.

रामविलास पासवान यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मंत्रिमंडळाने दोन मिनिटाचे मौन पाळले.

तसेच त्यांच्या निधनाबद्दल खालील ठराव मंजूर केला.

“केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न, आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांच्या दु:खद निधनाबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळ तीव्र दुःख व्यक्त करीत आहे.

त्यांच्या निधनामुळे देशाने प्रसिध्द नेता, ख्यातनाम राजकारणी आणि समर्थ प्रशासक गमावला आहे.

पासवान यांचा जन्म 5जुलै 1946 रोजी बिहारमधील खगरिया जिल्ह्यात शहरबन्नी इथे झाला.त्यांनी एम.ए. तसेच एल.एल.बी. चे शिक्षण घेतले. झाशीच्या बुंदेलखंड विद्यापीठाने त्यांना डी.लिट. पदवी देऊन त्यांचा सन्मान केला.

रामविलास पासवान हे बिहारमधील अत्यंत लोकप्रिय नेते होते आणि त्यांना तेथील सामान्य जनतेचा मोठा पाठींबा लाभला होता. ते संयुक्त समाजवादी पक्षातर्फे 1969 मध्ये बिहार विधानसभेवर निवडून आले.त्यानंतर,1977 मध्ये 6व्या लोकसभेच्या निवडणुकीत हाजीपुर मतदारसंघातून त्यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. त्यानंतर 1989 साली झालेल्या 9व्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा निवडून आल्यानंतर त्यांना श्रम आणि कल्याण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली.  1996 ला ते रेल्वेमंत्री झाले आणि 1998 पर्यंत त्यांनी समर्थपणे ही जबाबदारी सांभाळली. त्यानंतर ऑक्टोबर 1999 ते  सप्टेंबर 2001 या काळात ते दूरसंचार मंत्री म्हणून आणि त्यानंतर एप्रिल 2002 पर्यंत कोळसा आणि खाणमंत्री म्हणून ते काम करीत होते. 2004 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये त्यांना रसायने, खत आणि पोलादमंत्रीपद मिळाले.

16व्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर त्यांना ग्राहक व्यवहार,अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आणि 2019 मध्ये राज्यसभेवर निवडून आल्यावर त्यांच्याकडे हीच खाती कायम ठेवण्यात आली.

पासवान हे दडपलेल्या जनतेचा आवाज होते आणि त्यांनी नेहमीच समाजातील वंचित वर्गाच्या भल्यासाठी प्रयत्न केले.

हे मंत्रिमंडळ सरकार आणि देशवासियांतर्फे पासवान यांच्या कुटुंबाप्रती सद्भावना व्यक्त करीत आहे.”

 

* * *

U.Ujgare/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1663043) Visitor Counter : 140