रेल्वे मंत्रालय

कोलकाता शहर आणि परिसरासाठी 16.6 किलोमीटर लांबीच्या पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडॉर प्रकल्पाला भारत सरकारची मान्यता


प्रकल्पासाठी 8575 कोटी रुपये अंदाजे खर्च येणार

Posted On: 07 OCT 2020 7:41PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 ऑक्‍टोबर 2020

 

रेल्वे मंत्रालयाच्या कोलकाता शहर आणि परिसरासाठी पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडॉर प्रकल्पाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. एकूण 16.6 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाला अंदाजे 8574.98 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ही मेट्रो सॉल्ट लेक सेक्टर -5 ते हावडा मैदान या दरम्यान धावणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या सीपीएसई अंतर्गत कोलकाता मेट्रो रेल महामंडळ मर्यादित (केएमआरसीएल)च्यवतीने या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.  कोविड-19 महामारीपूर्वी हा प्रकल्प डिसेंबर,2021 मध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. त्यामुळे महामारीमुळे झालेल्या टाळेबंदीचा कमीतकमी परिणाम व्हावा, असा प्रयत्न आता करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे गंगा म्हणजेच हुगळी नदीपात्राच्या खालच्या बाजूने एक बोगदा तयार करून त्यामध्ये या मेट्रोसाठी मार्ग  तयार करण्यात येणार आहे. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने एक मोठे आव्हानात्मक काम असणार आहे. हुगळी ही भारतातील मोठ्या नद्यांपैकी एक आहे. तिच्या खालून मेट्रो मार्ग आणि सर्वात खोलीवर हावडा स्थानकाची उभारणी करण्यात येणार आहे. भारतामध्ये अशा प्रकारचे काम पहिल्यांदाच होणार आहे. 

या महाप्रकल्पामुळे कोलकाता आणि हावडा तसेच सॉल्ट लेक सिटीच्या प्रवाशांची मोठीच सोय होणार आहे. हावडा आणि सॉल्ट लेक सिटी ही व्यवसाय आणि उद्योगांच्या दृष्टीने महत्वाचे जिल्हे आहेत. त्यामुळे या दोन्ही शहरांमध्ये कोलकात्यातून येणा-या प्रवाशांची संख्या खूप मोठी आहे. कोलकाता आणि त्याला जोडूनच असलेल्या हावडा आणि बिधानगर या भागाला जोडणारी वेगवान वाहतूक सेवा असणे आवश्यक आहे. मेट्रोमुळे ही गरज पूर्ण होणार आहे. तसेच हावडा, सियालदाह, इसप्लानेड आणि आय.टी केंद्र असलेल्या साॅल्ट लेक सेक्टर -5 यांना जोडणारी ही मेट्रो अतिशय सोईची ठरणार आहे. 

या शहरांमध्ये दररोज प्रवास करणा-यांची संख्या लाखोंची  आहे. हे प्रवासी  उपनगरीय रेल्वे, फेरी बोट आणि रस्ते वाहतूक सेवेचा वापर करतात. मेट्रोच्या सुविधेमुळे वाहतूक व्यवस्था एकीकृत होवू शकणार आहे. त्यामुळे लाखो दैनिक प्रवाशांना चांगली सुविधा मिळू शकणार आहे. 

प्रकल्पाचे फायदे:- 

  1. सुरक्षित, परिणामकारी आणि  पर्यावरणस्नेही वाहतूक सेवा उपलब्ध होईल. 
  2. प्रवासाच्या वेळेत बचत 
  3. इंधनाचा कमी वापर 
  4. रस्ते निर्माणासाठी पायाभूत सुविधा खर्चामध्ये बचत
  5. प्रदूषण आणि अपघातांचे प्रमाण कमी होईल 
  6. ट्रांजिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट (टीओडी)ला प्रोत्साहन 
  7. कॉरिडॉरमध्ये भूमी बँकेच्या मूल्यामध्ये वृद्धी आणि अतिरिक्त महसूल मिळू शकणार 
  8. रोजगारांच्या संधीमध्ये वाढ 
  9. कोलकात्यामधील वाहतुकीच्या कोंडीची समस्या कमी होवून प्रदूषण नियंत्रण होईल

 

* * *

B.Gokhale/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1662454) Visitor Counter : 175