कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
कोविड-19 मुळे आपत्कालीन परिस्थिती असूनही, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी गव्हाच्या खरेदीत 15 टक्क्यांची वाढ : केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंग
महामारीच्या काळात गहू, डाळी आणि तेलबिया खरेदी केंद्रांची संख्या तिपटीने वाढली : डॉ.जितेंद्र सिंग
प्रविष्टि तिथि:
07 OCT 2020 5:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2020
कोविड -19 मुळे जागतिक महामारी पसरलेली असताना देखील मोदी सरकारने सरकारतर्फे जास्त प्रमाणात धान्य खरेदी होईल याकडे लक्ष पुरविले ही गोष्ट प्रधानमंत्री नरेंद मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या पथकाची शेतकऱ्यांप्रती असलेली संवेदनशीलता दर्शविते आणि संकटकाळात शेतकरी समुदायाच्या गरजा पुरविण्यासाठी त्यांची कटिबद्धता दाखवून देते असे केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंग यांनी सांगितले.
बसोहली आणि रियासी यांच्या सीमावर्ती क्षेत्रातील पंचायतींचे प्रतिनिधी आणि स्थानिक कार्यकर्त्यांशी ते बोलत होते. यावेळी आकडेवारी स्पष्ट करताना, कोविड-19 मुळे आपत्कालीन परिस्थिती असूनही, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी गव्हाच्या खरेदीत 15 टक्क्याची वाढ झाली अशी माहिती सिंग यांनी दिली. देशभरातून 390 लाख टन गव्हाची खरेदी झाली असे ते म्हणाले. टाळेबंदीचे सर्व नियम पाळून, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या घरापर्यंत जाऊन खरेदी प्रक्रिया पूर्ण केली असे त्यांनी सांगितले.

महामारीच्या काळात कृषी क्षेत्रासाठी हाती घेतलेल्या उपक्रमांची माहिती देत, केंद्र सरकारने या काळात धान्य खरेदी आणि इतर कल्याणकारी योजनांसाठी 75,000 कोटी रुपये वितरीत केले अशी माहिती त्यांनी दिली.
कोरोना महामारीच्या काळात सरकारने गहू खरेदी केंद्रांच्या संख्येत तिपटीने वाढ केली तर डाळी आणि तेलबिया यांच्या खरेदी केंद्रांची संख्या देखील जवळजवळ तिप्पट केली अशी माहिती डॉ.जितेंद्र सिंग यांनी दिली.
गेल्या सहा वर्षांच्या काळात, मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, मृदा आरोग्य पत्रिका,पीएम किसान सन्मान निधी योजना, किसान कार्ड, सूक्ष्म सिंचन,ई मंडीची निर्मिती यासारखे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. या काळात सरकारने पिकांचे किमान आधारभूत मूल्य देखील टप्प्याटप्प्याने वाढविले असे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की कृषी क्षेत्राच्या कल्याणासाठी सुरु केलेले नवीन उपक्रम आणि नवे कृषी कायदे यामुळे शेतकऱ्यांना विशिष्ट संरक्षण आणि सुरक्षाविषयक तरतुदी करण्यात आल्या आहेत, या नव्या घडामोडीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि कृषी क्षेत्राची भरभराट होईल.
* * *
B.Gokhale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1662357)
आगंतुक पटल : 299