निती आयोग

नीती आयोग, नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालय आणि इन्व्हेस्ट इंडिया यांच्याकडून सोलर पीव्ही उत्पादनाविषयीच्या परिसंवादाचे आयोजन


इंडिया पीव्ही एज-2020 मध्ये भारतात अत्याधुनिक सौर उत्पादने निर्मितीला प्रोत्साहन

Posted On: 07 OCT 2020 4:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2020


नीती आयोग, नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालय (एमएनआरई), आणि इन्व्हेस्ट इंडिया यांनी 6 ऑक्टोबर रोजी “इंडिया पीव्ही एज-2020”, या परिसंवादाचे आयोजन केले होते. जागतिक फोटोव्होल्टेइक (पीव्ही) उद्योगाला भारतातील संधींविषयी माहिती मिळावी, हा या परिसंवादाचा उद्देश होता.  

समारोपाच्या सत्राला संबोधित करताना केंद्रीय ऊर्जा, नवीन आणि अक्षय ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आर के सिंग म्हणाले की, भारताकडे जगातील सर्वाधिक वेगाने वाढणार्‍या अक्षय ऊर्जेचा क्षमता विस्तार आहे आणि विजेची मागणी सातत्याने वाढत आहे. नवीकरणीय ऊर्जा वीज पुरवठ्याचा मोठ्या प्रमाणात पूरक स्त्रोत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, भारत स्वच्छ ऊर्जेसाठी कटीबद्ध आहे. तसेच 2030 पर्यंत 450 गिगावॅट स्थापित  ऊर्जाक्षमतेच्या ध्येयाव्यतिरिक्त, भारताकडे ग्रीड-कनेक्टेड सौर आणि नवीकरणीय ऊर्जेच्या दळणवळण आणि स्वयंपाकासाठीच्या वापराचे महत्वाकांक्षी धोरण आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ ध्येय साध्य करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा भाग म्हणून, 20 गिगावॅट मॉड्यूल आणि सेल मॅन्युफॅक्चरिंगसाठी ईओआय जारी केले आहेत. नवीकरणीय ऊर्जेत गुंतवणूक करणारी जगातील सर्वात वेगवान आणि विस्तारणारी बाजारपेठ भारताची आहे.         

सुमारे 60 नामांकित भारतीय आणि जागतिक सीईओज, जागतिक पीव्ही उत्पादक, विकासक, गुंतवणूकदार, थिंक टँक आणि आघाडीचे धोरणकर्ते यांची परिसंवादाला उपस्थिती होती. सौर उत्पादनात किफायतशीर भांडवल आणण्याच्या उपायांवर विचार करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या गोलमेज बैठकीचेही आयोजन केले होते.    

 

* * *

M.Chopade/S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1662348) Visitor Counter : 124