रेल्वे मंत्रालय

टाळेबंदीपूर्वीच्या पद्धतीप्रमाणेच आता गाडी सुटण्याच्या 30 मिनिटे अगोदर मिळणार दुसरी आरक्षण यादी


ऑनलाईन आणि प्रवासी आरक्षण प्रणाली अशा दोन्ही ठिकाणी दुसरी आरक्षण यादी तयार होण्यापूर्वी तिकीट खरेदी करता येणार

Posted On: 06 OCT 2020 9:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर 2020

रेल्वे प्रवाशांची दुसरी आरक्षण यादी तयार करण्यासाठी 10 ऑक्टोबर2020 पासून टाळेबंदीपूर्वीची पद्धत पुन्हा लागू करण्याचा निर्णय भारतीय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

कोविड काळाआधीच्या प्रचलित पद्धतीनुसार प्रवाशांची पहिली आरक्षण यादी गाडीच्या निर्गमन वेळेपूर्वी किमान चार तास आधी तयार केली जायची. त्यानंतर दुसरी आरक्षण यादी तयार होईपर्यंत, उपलब्ध असलेल्या रिकाम्या जागांची तिकीटविक्री इंटरनेटद्वारे किंवा तिकीट खिडकीवरून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर केली जात असे.

गाडीच्या निश्चित निर्गमन वेळेपूर्वी 30 मिनिटे ते 5 मिनिटे या काळात दुसरी आरक्षण यादी तयार केली जात असे. या काळात तिकीट मूल्याच्या परताव्याच्या नियमांना अनुसरून आरक्षण रद्द करण्याची सुविधा उपलब्ध असे.

मात्र, कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे दुसरी आरक्षण यादी गाडी सुटण्याच्या 2 तास आधी तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

आता, प्रवाशांची सोय करण्याच्या उद्देशाने प्रदेश रेल्वे प्रशासनाने केलेल्या विनंतीनंतर सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन, दुसरी आरक्षण यादी गाडी सुटण्याच्या 30 मिनिटे आधी तयार करायला परवानगी देण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे, दुसरी आरक्षण यादी तयार व्हायच्या आधी, उपलब्ध असलेल्या रिकाम्या जागांची तिकीटविक्री इंटरनेटद्वारे किंवा तिकीट खिडकीवरून केली जाईल.

हा बदल 10 ऑक्टोबर 2020 पासून अंमलात आणण्यासाठी रेल्वे माहिती प्रणाली केंद्राने त्यांच्या सॉफ्टवेयरमध्ये आवश्यक  बदल केले आहेत.

 

B.Gokhale/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1662170) Visitor Counter : 186