पंतप्रधान कार्यालय
“सामाजिक सक्षमीकरणासाठी जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद 2020”च्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
Posted On:
05 OCT 2020 9:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर 2020
भारत आणि परदेशातले सन्माननीय अतिथीगण, नमस्ते!
सामाजिक सक्षमीकरणासाठी जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद- रेझ 2020 मध्ये आपले स्वागत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवरील चर्चेला प्रोत्साहन देण्यासाठी हा एक खूप चांगला प्रयत्न आहे. आपण सर्वांनी तंत्रज्ञान आणि मानवाच्या सशक्तीकरणासंबंधी सर्व घटकांवर योग्य पद्धतीने प्रकाश टाकला आहे. तंत्रज्ञानामुळे आपल्या कार्यस्थळांमध्ये बदल झाला आहे. यामुळे संपर्कवृद्धी होण्यासाठी मदत मिळाली आहे. अनेकदा, तंत्रज्ञानामुळे महत्वपूर्ण आव्हाने, समस्या यांच्यावर तोडगा काढण्यासाठी आपली मदत झाली आहे. मला खात्री आहे की, सामाजिक दायित्व आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या संयुक्तीकरणामध्ये असलेल्या मानवी स्पर्शामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेला अधिक समृद्ध करू शकेल.
मित्रांनो,
कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी बौद्धिक शक्तीच्या सन्मानाची गोष्ट आहे. आपल्या विचार करण्याच्या शक्तीमुळे मनुष्याला उपकरण, साधने आणि तंत्रज्ञान बनविण्याइतके सक्षम बनवले आहे. आज या साधनांनी, उपकरणांनी आणि तंत्रज्ञानाने शिकण्याची तसेच विचार करण्याची शक्तीही मिळवली आहे. यामध्ये एक प्रमुख उदयोन्मुख तंत्रज्ञान म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. माणसाबरोबर कृत्रिम बुद्धिमत्तेची टीम तयार झाली तर आपल्या या ग्रहावर चमत्कार करू शकते.
मित्रांनो,
इतिहासाच्या प्रत्येक पावलावर, ज्ञान आणि शिक्षण यांच्याविषयी भारताने संपूर्ण दुनियेचे नेतृत्व केले आहे. आज आयटीच्या या युगामध्ये भारत उत्कृष्ट योगदान देत आहे. काही प्रतिभावंत तंत्रज्ञ विशेषज्ञ भारतीय आहेत. भारत वैश्विक आयटी सेवा उद्योगासाठी अत्याधिक ताकदवान सिद्ध झाला आहे. आपण जगाला डिजिटल रूपाने उत्कृष्ट आणि आनंदी, सुखकर बनवित आहोत.
मित्रांनो,
भारतामध्ये आम्हाला असा अनुभव आला आहे की, तंत्रज्ञानामुळे पारदर्शकता आली आहे आणि सेवा वितरणामध्ये सुधारणा झाली आहे. आमचा देश हा जगातील सर्वात मोठी ‘विशिष्ट ओळख प्रणाली- ‘आधार’चे गृहस्थान आहे. आमच्याकडे जगातील सर्वांत नवीन डिजिटल पैसे चुकते करण्याची -यूपीआय’ प्रणाली आहे. यामुळे वित्तीय सेवांसह, डिजिटल सेवांपर्यंत पोहोचण्याची सुविधा झाली आहे. त्यामुळे गरीब आणि उपेक्षित लोकांना थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने मदत मिळत आहे. आता आम्ही शक्य तितक्या लवकर आणि सर्वाधिक उत्तम कौशल्याने सर्व कार्य होवू शकतील, अशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचलो आहोत. भारत आपले ऑप्टिकल फायबर नेटवर्क अतिशय वेगाने विस्तारित आहे. त्याचा उद्देश प्रत्येक गावांना हाय स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रदान करणे हा आहे.
मित्रांनो,
आता आम्हाला असे वाटते की, भारत कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्राचे एक वैश्विक केंद्र बनावे. या क्षेत्रात अनेक भारतीय आधीपासूनच काम करीत आहेत. मला अपेक्षा आहे की, आगामी काळामध्ये आणखी खूप मोठे काम भारतामध्ये या क्षेत्रात होईल. यासाठी आमचा दृष्टिकोण टीमवर्क, विश्वास, सहयोग, जबाबदारी आणि सर्वसमावेशाची भावना या प्रमुख सिद्धांतावर आधारित आहे.
मित्रांनो,
भारताने अलिकडेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 स्वीकारले आहे. यामध्ये तंत्रज्ञानावर आधारित अभ्यास आणि शिक्षण प्रमुख हिस्सा म्हणून समाविष्ट केले आहे. तसेच हे शिक्षण कौशल्य केंद्रित असणार आहे. ई-पाठ्यक्रम वेगवेगळ्या भाषा आणि बोली यांच्यामध्ये विकसित करण्यात येणार आहे. यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापरासाठी करण्यात येणार आहे. यामध्ये नैसर्गिक भाषा प्रक्रिया (एनएलपी) क्षमतांमुळे लाभ होईल. आम्ही यावर्षी एप्रिलमध्ये युवा कार्यक्रमाच्या माध्यमातून जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यक्रमाला प्रारंभ केला आहे. या अंतर्गत शालेय 11,000 पेक्षा जास्त विद्यार्थी वर्गाने प्रारंभीचा मूलभूत पाठ्यक्रम पूर्ण केला आहे. हे विद्यार्थी आता आपल्या कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक प्रकल्प तयार करीत आहेत.
मित्रांनो,
राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंचाची (एनईटीएफ) निर्मिती केली जात आहे. या मंचाच्या माध्यमातून डिजिटल पायाभूत सुविधा, डिजिटल सामुग्री आणि क्षमता वृद्धीला प्रोत्साहन देण्यासाठी ई-शिक्षण विभाग स्थापण्यात येणार आहे. शिक्षण घेणा-या सर्वांना वेगळा अनुभव घेता यावा यासाठी आभासी प्रयोगशाळांची स्थापना करण्यात येत आहे. आम्ही नवसंकल्पना आणि उद्योजकता या संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी अटल इनोव्हेशन मिशनही सुरू केले आहे. असे अनेक पावले उचलून त्या माध्यमातून आम्ही लोकांना लाभ कसा मिळेल, याचा विचार केला आहे. उदयोन्मुख तंत्रज्ञानाबरोबर योग्य प्रकारे समतोल कायम ठेवण्याची आमची इच्छा आहे.
मित्रांनो,
यावेळी मी, कृत्रिम बुद्धिमत्ता याविषयावरील राष्ट्रीय कार्यक्रमाविषयी येथे माहिती देवू इच्छितो. हा कार्यक्रम समाजातल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी समर्पित आहे. सर्व हितधारकांच्या सहयोगाने तो लागू करण्यात येणार आहे. याविषयी ‘रेझ’ हा एक मंच होवू शकतो. आपण सर्वांनी आमच्या या प्रयत्नांमध्ये सक्रिय सहभागी व्हावे, यासाठी मी सर्वांना आमंत्रित करीत आहे.
मित्रांनो,
काही आव्हाने आहेत, त्यांचाही उहापोह मी इथल्या सर्व सन्मानित श्रोतृवर्गासमोर करू इच्छितो. आपण आपली संपत्ती आणि साधन सामुग्री, मालमत्ता यांच्या सर्वोत्कृष्ट व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करू शकतो का? काही ठिकाणी, साधने निष्क्रिय पडलेली आहेत. तर इतर काही स्थानी साधनांची कमतरता आहे. अशावेळी या दोन्हीमध्ये संतुलन राखण्याची गरज असते. ज्याठिकाणी साधन सामुग्रीचा अभाव आहे, तिथे सामुग्री पोहोचली पाहिजे तसेच जिथे अतिरिक्त सामुग्री आहे, तिचा वापरही झाला पाहिजे. त्यामुळे आपल्याकडे असलेल्या साधन-सामुग्रीची वाटणी योग्य प्रकारे करणे शक्य आहे का? आपण आपल्या नागरिकांना त्यांच्या दारामध्ये सेवा पोहोचवून सक्रिय आणि वेगाने झालेल्या वितरणामुळे आनंद देवू शकतो का?
मित्रांनो,
युवावर्गासमोर भविष्य आहे. आणि प्रत्येक नवयुवक महत्वाचा आहे. प्रत्येक मुलामध्ये अव्दितीय प्रतिभा, क्षमता आणि योग्यता असतात. अनेकवेळा तर योग्य व्यक्ती अयोग्य स्थानी पोहोचतो.
यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी एक पद्धत आहे. वय वाढत असताना, मोठे होत असताना प्रत्येक मूल स्वतःला कसे पाहते? माता-पिता, शिक्षक आणि मित्रमंडळी मुलांचे लक्षपूर्वक निरीक्षण करू शकतात का? त्यांना अगदी लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत पहावे, त्यासंबंधीच्या नोंदी ठेवाव्यात. ही गोष्ट मुलांमध्ये नेमकी कोणती प्रतिभा आहे, हे शोधण्यासाठी मदत करणारी ठरेल आणि मुलांचा एक प्रदीर्घ लांबीचा मार्ग निश्चित करेल. अशा पद्धतीने मुलांचे संगोपन करणे युवा पिढीसाठी प्रभावी मार्गदर्शक ठरू शकते. प्रत्येक मुलामध्ये असलेल्या वैशिष्ट्याचा, मुलाच्या योग्यतेचा विश्लेषणात्मक अहवाल देवू शकणारी आपल्याकडे काही प्रणाली आहे का? यामुळे युवा पिढीला अनेक संधीची व्दारे उघडू शकणार आहेत. अशा प्रकारे मानवी साधन सामुग्री, मनुष्य बळ विकासाचा नकाशा सरकारच्या दृष्टीने आणि व्यवसायांसाठी दीर्घ काळापर्यंत लाभदायक ठरू शकेल.
मित्रांनो,
कृषी, आरोग्य या सेवा सशक्त बनविण्यासाठी, पुढच्या पिढीसाठी शहरी पायाभूत विकासाचा आधार निर्माण करणे आणि शहरी समस्यांवर तोडगे शोधणे - ज्याप्रमाणे वाहतुकीची कोंडी कमी व्हावी, सांडपाण्याच्या व्यवस्थापनात सुधारणा करणे, विद्युत पुरवठ्यासाठी तारांची-वाहकांची व्यवस्था करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची मोठी महत्वपूर्ण भूमिका असू शकते. याचा उपयोग आमची आपत्ती व्यवस्थापन प्रणाली अधिक बळकट करण्यासाठी करता येवू शकतो. याचा उपयोग हवामान परिवर्तनाची समस्या सोडविण्यासाठीही करता येवू शकतो.
मित्रांनो,
आपल्या ग्रहावर अनेक भाषा आहेत. भारतामध्ये तर आमच्या अनेक भाषा, बोलीभाषा आहेत. अशी विविधता असल्यामुळे आपला समाज अधिक संपन्न आहे. प्राध्यापक राज रेड्डी यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग मूळ भाषेमुळे निर्माण होणा-या समस्या दूर करण्यासाठीही वापरू शकतोच की! चला तर मग, अतिशय सोप्या आणि प्रभावी पद्धती यांच्याविषयी विचार करून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून दिव्यांग भगिनी आणि बंधूंना कसे सशक्त बनवू शकतो, यावर तोडगा काढूया.
ज्ञान, शिक्षण देणे यासाठीही आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करू शकतोच ना? ज्ञान, सूचना आणि कौशल्य अधिकाधिक सोपे आणि सुलभ बनविण्यासारखेच अधिकार प्रदान करण्याच्या रूपाने काही गोष्टी आहेत.
मित्रांनो,
कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग नेमका कसा केला जावू शकतो, हे सुनिश्चित करण्याची आपली सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी पूर्ण विश्वास निर्माण करण्यासाठी एक अल्गोरिदम म्हणजेच गणिताचे प्रश्न सोडविण्यासाठी असते त्या नियमांच्या प्रणालीप्रमाणे पारदर्शकता महत्वाची आहे. त्याचबरोबर दायित्वही महत्वपूर्ण आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर एखाद्या अस्त्राप्रमाणे केला जावू नये, अशा गोष्टीपासून दुनियेचे रक्षण झाले पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कोणत्याही प्रकारे हानी पोहोचविण्यासाठी करण्यास आमचा विरोध आहे.
मित्रांनो,
ज्यावेळी आपण कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी चर्चा करतो, त्यावेळी आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका, कोणत्याही प्रकारचा संदेह असता कामा नये. मनुष्यामध्ये असलेले रचनात्मकतेचे कौशल्य आणि मानवाकडे असलेल्या भावभावना ही आपली सर्वात मोठी ताकद आहे, तर यंत्र सामुग्री म्हणजे आमच्यासाठी असलेली अद्भूत सुविधांची साधने आहेत, याविषयी कोणालाही शंका असता कामा नये. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आमच्या बुद्धी आणि संवेदना हे एकत्रित आले, यांच्यामध्ये समन्वय साधला गेला तर, मानव जातीच्या समस्यांवर तोडगा निघू शकणार आहे. आपल्यामध्ये असलेली कुशाग्र बुद्धी या यंत्रामध्ये कशी येईल, याचा तर आपण कधी विचारही करू नये. याउलट आपण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पुढेच काही पावले राहण्याचा विचार करायचा आहे, हे कायम स्मरणात ठेवले पाहिजे आणि तसेच काम सुनिश्चितही केले पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही माणसांच्या क्षमता वाढविण्यासाठी मदत करू शकते. ही मदत जास्तीत जास्त कशी होईल, इतकाच आपण विचार केला पाहिजे. मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे प्रत्येक व्यक्तीमधील अव्दितीय क्षमता, सामोरी येण्यास, जाणून घेण्यास मदत ठरू शकते. कृत्रिम बुद्धिमत्ता त्या व्यक्तीला समाजामध्ये आणखी जास्त प्रभावी रूपाने योगदान देण्यासाठी सशक्त बनवू शकते.
मित्रांनो,
रेझ -2020 मध्ये आम्ही संपूर्ण जगातल्या हितधारकांना एकत्र येण्यासाठी एक वैश्विक मंच तयार केला आहे. चला तर मग, आपण विचारांचे आदान-प्रदान करूया, कृत्रिम बुद्धिमत्तेला स्वीकारण्यासाठी एक सामान्य कार्यप्रणालीची रूपरेषा तयार करू या. हे करणे यासाठी महत्वाचे आहे, कारण आपण सर्वजण या क्षेत्रामध्ये भागीदार म्हणून मिळून काम करणार आहोत. वास्तवामध्ये या वैश्विक कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. ही वैश्विक शिखर परिषद यशस्वी व्हावी, अशी कामना मी व्यक्त करतो. आगामी चार दिवसांमध्ये या परिषदेमध्ये होणा-या चर्चेमुळे जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी कृती आराखडा बनविण्यासाठी मदत मिळेल, अशी मला खात्री आहे. असा कृती आराखडा वास्तवामध्ये संपूर्ण दुनियेमध्ये मानवी जीवन आणि जीवन जगण्यासाठी करावी लागणारी धडपड यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी मदत करू शकतो. आपल्या सर्वांना माझ्या शुभेच्छा !!
धन्यवाद!
आपल्याला खूप-खूप धन्यवाद !
U.Ujgare/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1662083)
Visitor Counter : 468
Read this release in:
Kannada
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam