पर्यटन मंत्रालय
महात्मा गांधी जयंतीनिमित्त पर्यटन मंत्रालयाच्यावतीने ‘देखो अपना देश’ वेबिनार मालिकेत‘‘चरखे पे चर्चा’’ विषयावर वेबिनार
Posted On:
03 OCT 2020 4:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर 2020
महात्मा गांधी जयंतीनिमित्त पर्यटन मंत्रालयाच्यावतीने दि. 2 ऑक्टोबर, 2020 रोजी देखो अपना देश’ वेबिनार मालिके अंतर्गत ‘‘चरखे पे चर्चा’’ विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.
चरख्याचे चाक फिरवणे आणि खादी या विषयावर या कार्यक्रमामध्ये लक्ष केंद्रीत करण्यात आले. देशाच्या दृष्टीने खादीच्या कपड्यासाठी विणले जाणारे ताना-बाना हे स्वराज्य आणि स्वावलंबन यांचे एक प्रतीक-रूपक आहे. जगाचा इतिहास पाहिला तर खादी निर्मिती करताना वसाहतवादाच्या विरोधात लढा निर्माण केला गेला, असे उदाहरण कोठेही सापडणार नाही. वसाहतवाद संपुष्टात आणण्यासाठी विदेशी कपड्यांवर बहिष्कार घालून हाताने विणलेल्या कापडाचा-कपड्यांचा प्रसार करण्यात आला. त्यासाठी महत्वाचे साधन असलेला चरखा हा भारतासाठी एक राजकीय आणि भावनिक प्रतीक बनला. चरखा ही महात्मा गांधीजींची एक देणगीच आहे. त्याच्या मदतीने गावे स्वावलंबी बनायला लागली त्याचबरोबर जणू अध्यात्मिक शुद्धीकरणही या हाताने बनविलेल्या खादीच्या धाग्यांनी केले. या वेबिनारमध्ये भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात खादीच्या वस्त्रांचा मोठा प्रभाव दिसून आला, त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या वेबिनारचे सादरीकरण एनआयएफटीच्या बंगलुरूच्या संचालिका सुसॅन थॉमस आणि सह प्राध्यापक प्रशांत कोचुवीतिल चेरियन यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी गांधीजी दक्षिण आफ्रिकेत वकिली करताना जो पोषाख वापरत होते, त्या सुटातील त्यांच्या प्रतिमा दाखवून त्यांच्या जीवनप्रवासाचा आढावा घेण्यात आला. ते भारतामध्ये 1915 मध्ये परतले आणि त्यांनी पारंपरिक गुजराती पोषाख वापरण्यास प्रारंभ केला. रवींद्रनाथ ठाकूर यांनी त्यांना ‘महात्मा’ ही पदवी दिली. या घटनांचा वेबिमालिकेत समावेश करण्यात आला आहे. तसेच मदुराई येथील कार्यक्रम, त्यांनी पाश्चात्य पोषाक वापरणे बंद करून खादीचा सुरू केलेला वापर यांचाही यामध्ये समावेश आहे.
या कार्यक्रमाच्या अखेरच्या भागात अतिरिक्त महा संचालक रूपिंदर ब्रार यांनी आपली संस्कृती, परंपरा यांचा वारसा किती अभिमानास्पद आहे हे नमूद केले. तसेच खादी वापरामुळे समाजातल्या आर्थिक दुर्बल घटकांच्या पुनरूत्थानाला कशा पद्धतीने प्रोत्साहन मिळते, कारागिरांच्या हाताला काम कसे मिळते, याची माहिती दिली. यातूनच गांधींजीच्या संदेशाचा प्रसार होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
देखो अपना देश या वेबनार मालिकेतून एक भारत श्रेष्ठ भारत याचे प्रदर्शन होत असून लोकांपर्यंत देशातील विविधता पोहोचवली जात आहे.
देखो अपना देश या वेबमालिकेची माहिती https://www.youtube.com/channel/UCbzIbBmMvtvH7d6Zo_ZEHDA/featured येथे उपलब्ध आहे. पर्यटन मंत्रालयाशी संबंधित सर्व संकेत स्थळावर आणि सरकारच्या वेबपेजवर वेबमालिकांचा सर्व सत्रांचा तपशील उपलब्ध आहे.
B.Gokhale/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1661334)
Visitor Counter : 180