पंतप्रधान कार्यालय
'वैभव 2020'' शिखर परिषदेच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान मोदी यांचे भाषण
भारतीय वंशाचे 3000 पेक्षा अधिक अभ्यासक आणि शास्त्रज्ञ आणि 10,000 वैज्ञानिक शिखर परिषदेत सहभागी
अधिकाधिक युवकांचा विज्ञानात रस वाढायला हवा- पंतप्रधान
अवकाश क्षेत्रात केलेल्या महत्वपूर्ण सुधारणांमुळे उद्योगक्षेत्र आणि अभ्यासकांना वाव
वर्ष 2025 पर्यंत, देशातून क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट: पंतप्रधान
Posted On:
02 OCT 2020 10:55PM by PIB Mumbai
“आज अधिकाधिक युवकांचा विज्ञानाकडे कल वाढावा, त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित व्हावा, यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी, आपल्याला इतिहासातील विज्ञानाची आणि विज्ञानाच्या इतिहासाची अशी दोन्ही बाजूने संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ‘वैश्विक भारतीय वैज्ञानिक-म्हणजेच वैभव या आंतरराष्ट्रीय आभासी शिखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जगभरातील भारतीय संशोधक आणि अभ्यासक या परिषदेत सहभागी झाले होते.
‘वैभव या शिखर परिषदेत, भारत आणि जगातील विज्ञान तसेच नवोन्मेषाच्या यशाविषयी चर्चा केली जाते. ही परिषद म्हणजे, उत्तम, बुद्धिमान व्यक्तींचा संगम आहे”, असे सांगत, पंतप्रधान म्हणाले की अशा संमेलनातून आपण भारत आणि आपल्या पृथ्वीला अधिक सक्षम करण्यासाठी आपले दीर्घकालीन सहकार्य अधिक दृढ करत असतो.
भारत सरकारने वैज्ञानिक संशोधन आणि नवोन्मेषाला चालना देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत, कारण देशात सामाजिक-आर्थिक परिवर्तन घडवण्याच्या सर्व प्रयत्नांच्या केंद्रस्थानी विज्ञानच आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
कोविडची लस विकसित करण्यासाठी आणि लसीकरण मोहीम राबवण्यासाठी भारत करत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली.
लस विकसित करण्याच्या कार्यात दीर्घकाळ आलेला विराम आता संपला आहे. 2014 साली आमच्या लसीकरण कार्यक्रमासाठी चार नव्या लस विकसित करण्यात आल्या आहेत. यात भारतीय लस रोटा व्हायरसचाही समावेश आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
देशातून 2025 पर्यंत क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्याच्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचा त्यांनी उल्लेख केला. जागतिक उद्दिष्टाच्या पाच वर्ष आधीच भारताने हे उद्दिष्ट ठेवले आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 चा उल्लेख करत मोदी म्हणाले की, तीस वर्षांनंतर आणि संपूर्ण देशव्यापी विस्तृत सल्लामसलत केल्यानंतर हे धोरण आणले गेले आहे. या धोरणाचा उद्देश विज्ञानाविषयी विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल जागे करणे हा असून, त्यात वैज्ञानिक संशोधनाला चालना देण्यावर भर देण्यात आला आहे. युवा गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी या धोरणात मुक्त आणि व्यापक पर्यावरण देण्याची व्यवस्था आहे.
अवकाश क्षेत्रात, भारताने केलेल्या सुधारणांचा उल्लेख करत या सुधारणांमुळे उद्योगक्षेत्र आणि अभ्यासकांसाठी यातून अनेक संधी निर्माण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारताची लेझर इंटरफेरोमीटर ग्राव्हीटेशनल-व्हेव ऑबझरव्हेटरी, CERN आणि इंटरनैशनल थर्मोन्युक्लीयर एक्सपिरीमेंटल रीयेकटर (ITER),यांच्यातल्या भागीदारीबद्दल बोलतांना त्यांनी वैज्ञानिक संशोधन आणि जागतिक पातळीवर विकासाचे प्रयत्न यावर त्यांनी भर दिला.
सुपरकाम्पुटिंग आणि सायबर फिजिकल व्यवस्थेत भारताच्या महत्वपूर्ण अभियानांचा त्यांनी उल्लेख केला.कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक, सेन्सर, आणि बिग डेटा अनालिसिस, या सगळ्या क्षेत्रात, पायाभूत संशोधन आणि वापर याविषयी बोलतांना त्यांनी सांगितले की, यामुळे देशातील स्टार्टअप क्षेत्र आणि उत्पादन क्षेत्राला चालना मिळेल.
भारतात, आतापर्यंत 25 नवोन्मेष तंत्रज्ञानयुक्त प्रयोगशाळा सुरु करण्यात आल्या आहेत आणि यामुळे देशातील स्टार्टअप व्यवस्थेला पाठबळ मिळेल असेही मोदी म्हणाले.
भारताला आज आपल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी उत्तम दर्जाच्या संशोधनाची गरज आहे. देशात डाळी आणि अन्नधान्याचे उत्पादन वाढवण्यासाठी वैज्ञानिकांनी दिलेल्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले. जेव्हा भारत प्रगती करतो, तेव्हाच जग प्रगती करते, असेही पंतप्रधान म्हणाले.
वैभव शिखर संमेलनामुळे, सर्वाना एकत्र येण्याची आणि योगदान देण्याची संधी मिळते. जेव्हा भारत प्रगती करतो, तेव्हाच जगही पुढे जाते. वैभव हे देशातील प्रतिभावान लोकांचे संमेलन असून, यातून संशोधनासाठीची आदर्श व्यवस्था निर्माण करण्यास मदत होईल, परंपरेचा आधुनिकतेशी संगम करुन आपल्याला समृद्धी निर्माण करायची आहे, असे ते म्हणाले. या देवघेवीतून त्यासाठी निश्चित लाभ मिळेल आणि शिक्षण तसेच संशोधन यांच्यात समन्वयासाठी देखील हा अनुभव उपयुक्त ठरेल असे ते म्हणाले.
जगभरात विखुरलेले भारतीय नागरिक, जागतिक पटलावर देशाचे सर्वोत्तम दूत आहेत, असे मोदी म्हणाले. या शिखर परिषदेतून आगामी पिढ्यांसाठी एक सुरक्षित आणि समृद्ध भविष्य निर्माण करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचे प्रयत्न केले जातील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
वैभव शिखर परिषदेत, 55 देशांमधील 3000 पेक्षा अधिक भारतीय वंशाचे अभ्यासक आणी वैज्ञानिक सहभागी झाले आहेत. तसेच भारतातील 10000 संशोधक आहेत. 200 संस्था आणि माहिती तंत्रज्ञान संस्थांनी ही परिषद आयोजित केली आहे. 40 देशातील 700 व्याख्याते आणि 629 भारतीय व्याख्याते या परिषदेत सहभागी होणार आहेत. एकूण 213 सत्र या परिषदेत होणार असून त्यात विविध विषयांवर मंथन होणार आहे.
तीन ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर या काळात या चर्चा आणि विचारमंथन होईल आणि त्यातून समोर आलेले निष्कर्ष 28 ऑक्टोबरला मांडले जातील. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 31 ऑक्टोबरला या परिषदेचा समारोप होईल.या उपक्रमात, विविध स्तरातील संवाद आणि चर्चासत्रे, वेबिनार आणि व्हिडीओ कॉन्फरन्स होणे अपेक्षित आहे.
या परिषदेत ढोबळमानाने, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील काम्प्युटेशनल सायन्स,इलेक्ट्रॉनिक आणि दूरसंचार, क्वांटम तंत्रज्ञान, फोटोनिक्स, एअरोस्पेस तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्र,जैवतंत्रज्ञान, कृषी, अन्नप्रक्रिया, आधुनिक उत्पादन क्षेत्र, पृथ्वी विज्ञान, पर्यावरण विज्ञान आणि व्यवस्थापन या विषयांवर चर्चा होईल.
या शिखर परिषदेचा उद्देश जागतिक भारतीय संशोधकांचे अनुभव आणि ज्ञान याचा लाभ घेत जागतिक आव्हानांचा सामना करत जगाचा विकास करणे हा आहे. या परिषदेत, देश आणि बाहेरचे संशोधक आणि अभ्यासक यांच्यातील समन्वय आणि सहकार्य वाढण्यास मदत होईल.जागतिक वैज्ञानिकांशी समन्वय राखून, भारतात, ज्ञान आणि संशोधनाची व्यवस्था निर्माण करणे हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे.
मुख्य वैज्ञानिक सल्लागार, प्रा. के विजयराघवन आणि विविध देशातले, विविध विषयातील तज्ञ असे 16 व्याख्याते यांनी या उद्घाटन सत्रात पंतप्रधानांशी संवाद साधला.
*****
B.Gokhale/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1661185)
Visitor Counter : 340
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam