रसायन आणि खते मंत्रालय

भारतामध्ये औषध आणि वैद्यकीय उपकरण निर्मिती क्षेत्रामध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम काळ, 2030 पर्यंत 120 अब्ज डॉलर्सपर्यंत उद्योग वृद्धीची शक्यता: गौडा


जागतिक स्तरावर अग्रगण्य औषध पुरवठादार बनण्यासाठी औषध निर्माण उद्योगाने संशोधन आणि विकास कार्याकडे लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता: गौडा

Posted On: 01 OCT 2020 10:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 ऑक्‍टोबर 2020

 

भारतामध्ये औषध आणि वैद्यकीय उपकरण निर्मिती क्षेत्रामध्ये गुंतवणुकीसाठी सध्या अतिशय उत्तम काळ आहे. या क्षेत्रामध्ये सन 2024 पर्यंत  65 अब्ज डॉलर्सपर्यंत तर सन 2030 पर्यंत यामध्ये 120 अब्ज डॉलर्सपर्यंत  उद्योग वृद्धी होण्याची शक्यता आहे.  तर 2025  पर्यंत  वैद्यकीय उपकरणे क्षेत्राची उलाढाल 50 अब्ज डॉलर्स इतकी होईल, अशी अपेक्षा आहे,  असे केंद्रीय रसायन आणि खते  मंत्री गौडा यांनी म्हटले आहे.  

नवी दिल्ली येथे काल आयोजित करण्यात आलेल्या सीआयआय लाइफ सायन्स 2020 च्या परिषदेचे उद्घाटन गौडा यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. 

सरकारने उद्योग व्यवसायाला अनुकूल सुधारणा केल्यामुळे भारत हा उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये गुंतवणुकीसाठी सर्वात उत्तम स्थान बनला आहे. आर्थिक समावेशनाला चालना देऊन आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी सरकारने धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याचबरोबर कामगार विषयक कायदे आणि नियम यांचे पालन केले जात असल्यामुळे भारतामध्ये उद्योग सुलभता निर्माण झाली आहे. सन 2018-19 मध्ये भारताने 73 अब्ज डॉलर्सची थेट परदेशी गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित केली आहे. त्या आधीच्या वर्षाबरोबर तुलना केली असता ही गुंतवणूक 18 टक्क्यांनी जास्त आहे, अशी माहिती देऊन गौडा औषध आणि वैद्यकीय उपकरणे निर्मिती क्षेत्राविषयी म्हणाले की, सध्याचा काळ म्हणजे, या क्षेत्रात भारतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी खूप चांगली संधी आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे, भारतात या क्षेत्रामध्ये सन 2024 पर्यंत 65 अब्ज डॉलर्सपर्यंत तर सन 2030 पर्यंत यामध्ये 120 अब्ज डॉलर्सपर्यंत उद्योग वृद्धी होण्याची शक्यता आहे. वैद्यकीय उपकरण उत्पादन क्षेत्रामध्ये सन 2025 पर्यंत भारताचा वृद्धीदर 28 टक्क्यांपर्यंत पोहोचविण्याची क्षमता आपल्या उद्योगांमध्ये आहे, असेही गौडा यावेळी म्हणाले. 

आगामी 4-5 वर्षात देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरची बनविण्यासाठी भारताच्या औषध आणि वैद्यकीय उपकरणे निर्मिती क्षेत्रामध्ये अपार क्षमता आहे, असे केंद्रीय मंत्री यावेळी म्हणाले. भारतातील औषध आणि वैद्यकीय उपकरणे निर्मिती क्षेत्रामध्ये प्रतिवर्षी 28 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानुसार या उद्योगामध्ये सन 2025 पर्यंत 50 अब्ज डॉलर्सची उलाढाल होणार आहे. या पाश्र्वभूमीवर भारत सरकारने देशात तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणावर औषधनिर्मिती आणि चार स्थानी वैद्यकीय उपकरण निर्मिती केंद्रांची उभारणी करण्यासाठी पाठिंबा दिला आहे. तसेच यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. देशभरामध्ये जागतिक दर्जाच्या उत्कृष्टता केंद्राचा विचार करून उत्पादकांना मदत केली जात आहे. त्याचबरोबर या क्षेत्रात नव्याने येणा-या उत्पादकांना उत्पादनाशी संलग्न प्रोत्साहन सवलती सरकारने देवू केल्या आहेत. 

कोविड-19 महामारी उद्रेकाच्या काळामध्ये औषध निर्माण उद्योगाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीवर प्रकाश टाकताना मंत्री गौडा म्हणाले, भारतीय औषण आणि वैद्यकीय निर्मिती क्षेत्राने आव्हानाचे संधीमध्ये  रूपांतर केले. आता ही संधी सरकारच्या मदतीमुळे विकसित होत असलेल्या मोठ्या प्रमाणावर औषध निर्मिती केंद्रांच्या आणि  वैद्यकीय उपकरण निर्मिती पार्कच्या रूपाने या क्षेत्रातल्या उद्योजकांना मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला या प्रकल्पांमध्ये लक्ष देत आहेत, विशेष म्हणजे अगदी संकल्पनेच्या पहिल्या टप्प्यापासूनच पंतप्रधान या प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. घावूक औषध आणि वैद्यकीय उपकरण निर्मिती केंद्रांच्या विकासासाठी एकूण 78000 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. यामधून 2.5 लाख जणांना रोजगाराच्या संधी मिळतील अशी अपेक्षा आहे. 

भारत आता पीपीईसंच निर्मिती करणा-या देशांमध्ये जगात दुस-या स्थानावर आहे. आधी भारत पीपीई संचाची आयात करीत होता, आता निर्यातदारांमध्ये आघाडीवर आहे. भारतामध्ये प्रतिदिनी 5 लाखांपेक्षा जास्त पीपीई संचांचे उत्पादन केले जात आहे,  ही भारतीयांसाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे, असे गौडा यांनी सांगितले. अगदी याचप्रमाणे, अतिशय कमी कालावधीमध्ये भारताने स्वदेशी तंत्रज्ञान वापरून व्हँटिलेटर उत्पादनाची क्षमता 3 लाख प्रतिवर्षापर्यंत वाढवली आहे. एन-95 मास्कची बनविण्यात भारत आत्मनिर्भर झाला आहे. 

जागतिक स्तरावर अग्रगण्य औषध पुरवठादार बनण्यासाठी औषध निर्माण उद्योगाने संशोधन आणि विकास कार्याकडे लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मंत्री गौडा यांनी यावेळी केले. जोपर्यंत आपण भारतामध्येच नवीन औषधाचा शोध लावत नाही  तोपर्यंत विकास कार्यामध्ये असलेल्या संभाव्य क्षमतांचा पूर्ण उपयोग होवू शकत नाही. कोविड-19 महामारीवर सर्वांना परवडणा-या किंमतीमध्ये लस विकसित करून त्याचा पुरवठा करण्यासाठी भारतामधील औषध निर्माण क्षेत्र आघाडीवर असेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. 

कोविड-19 महामारी उद्रेकानंतर सीआयआय लाइफ सायन्सच्यावतीने घेण्यात आलेल्या या परिषदेमुळे औषध आणि वैद्यकीय उपकरणे निर्मिती क्षेत्रामध्ये असलेल्या भागधारकांना एकत्रित करून त्यांना स्पर्धेच्या नवीन युगामध्ये प्रवेश करण्यासाठी जे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, त्याचे गौडा यांनी कौतुक केले.

 

* * *

M.Chopade/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1660810) Visitor Counter : 268