रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
ग्वाल्हेर-मोरेना उड्डाणपूल राष्ट्राला समर्पित
Posted On:
28 SEP 2020 3:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 सप्टेंबर 2020
मध्यप्रदेशातील मोरेना येथील 1.420 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल आज केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, ग्रामविकास आणि पंचायती राज तथा अन्नप्रक्रिया उद्योगमंत्री श्री.नरेंद्रसिंग तोमर यांनी राष्ट्राला समर्पित केला. मुख्यमंत्री श्री.शिवराजसिंग चौहान हे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वर उभारलेल्या या उड्डाणपुलासाठी 108 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
राजस्थानातील ढोलपूर आणि मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर यांना जोडणारा हा उड्डाणपूल, EPC म्हणजेच अभियांत्रिकी-प्रापण-बांधकाम पद्धतीने 18 महिन्यांच्या नियोजित मुदतीआधीच पूर्ण झाला आहे. या चौपदरी उड्डाणपुलाची लांबी 780 मीटर असून त्याला धोलपूरच्या बाजूला 300 मीटर व ग्वाल्हेरच्या बाजूला 340 मीटर लांबीचा बांधीव मार्ग जोडलेला आहे. उड्डाणपुलाच्या दुतर्फा सर्व्हिस रस्ता आहे. या उड्डाणपुलामुळे मोरेना शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. एका अर्थी वेळ आणि इंधन वाचविण्यास याची मदत होऊ शकेल.
यावेळी बोलताना केंद्रीय कृषिमंत्री श्री.नरेंद्रसिंग तोमर यांनी, सदर प्रकल्पास त्वरित मान्यता दिल्याबद्दल व तो वेळेत पूर्ण केल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री.नितीन गडकरी यांचे अभिनंदन केले. तसेच या प्रकल्पाच्या जलद पूर्ततेसाठी जातीने लक्ष घातल्याबद्दल त्यांनी जनरल (निवृत्त) व्ही.के.सिंग यांचेही आभार मानले. या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्याच्या या पट्ट्याचा मोठा उपयोग होईल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
M.Chopade/J.Waishampayan/ P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1659740)
Visitor Counter : 157