शिक्षण मंत्रालय

लहान वयातील बालकांची काळजी आणि शिक्षण याविषयी शिक्षक पर्वांतर्गत राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन

Posted On: 25 SEP 2020 8:22PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 सप्‍टेंबर 2020

 

NEP 2020 अर्थात नवीन शैक्षणिक धोरणाचे विविध पैलू अधोरेखित करण्याच्या उद्देशाने शिक्षण मंत्रालयाने शिक्षकपर्व या उपक्रमांतर्गत, 'लहान बालकांची काळजी आणि शिक्षण' या विषयावर आज एका वेबिनारचे आयोजन केले होते. शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी आणि नव्या शैक्षणिक धोरणाच्या पुढील वाटचालीसाठी शिक्षण मंत्रालयाने 8 ते 25 सप्टेंबर 2020या काळात शिक्षक पर्व या उपक्रमाचे आयोजन केले होते.

ECCE म्हणजेच 'लहान बालकांची काळजी आणि शिक्षण' यावरील सत्राचे सूत्रसंचालन NCERT अर्थात, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. रोमिला सोनी यांनी केले. आंबेडकर विद्यापीठाच्या डॉ.वेनिता कौल, NCERTच्या प्रा.सुनीती सनवाल आणि सिक्कीममधील सरकारी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक मोतीलाल कोईराला यांनीही यात भाग घेतला..

प्रा.सुनीती यांनी चर्चेला सुरुवात करताना ECCE च्या संबंधाने राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या शिफारशी स्पष्ट केल्या. पुढे त्यांनी, गर्भधारणा होण्यापासून ते बाळाचे वय दोन वर्षे होईपर्यंतच्या काळातील पोषणाचे महत्त्व विशद केले. पोषण, आरोग्य आणि शिक्षणप्रक्रिया यातील संबंधही त्यांनी उलगडून दाखविला. जीवनाच्या पहिल्या दोन वर्षाच्या काळात बालकाची जलदगतीने होणारी वाढही यावेळी सविस्तर समजावण्यात आली. बालकाच्या अगदी सुरुवातीच्या जीवनकाळात आरोग्याशी आणि नंतर शैक्षणिक कामगिरीही पोषणाचा थेट संबंध असतो, असेही यावेळी त्यांनी सांगितले. 

NEP च्या अंमलबजावणीसाठी प्रमुख भागांबद्दल डॉ.कौल यांनी स्पष्टीकरण दिले. बालवयात शैक्षणिक कौशल्ये देण्याबरोबरच मुलांमध्ये सामाजिकतेचे कौशल्ये विकसित करणेही गरजेचे असते, यावर त्यांनी भर दिला. दर्जेदार ECCE साठी, समुदाय स्तरावर समर्थन आणि पालकांची भूमिका महत्त्वाची ठरते, असे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना वक्त्यांनी मुलांसाठी आनंददायक, खेळांवर आधारित आणि रुची निर्माण करणाऱ्या कृतिक्रमांच्या माध्यमातून अध्यापनशास्त्राचे आणि विकासाच्या दृष्टीने योग्य अशा मजकुराचे महत्त्व अधोरेखित केले. NEP 2020 चे कौतुक करत डॉ.कौल यांनी, पाठ्यक्रमाचा ऊर्ध्वदिशेने विस्तार अत्यंत परिणामकारक ठरणार असून, यामुळे शाळापूर्व स्थितीतून पहिल्या इयत्तेत जाण्याचा प्रवास मुलांच्या दृष्टीने सोयीस्कर होईल, असे सांगितले.

सिक्कीमच्या दक्षिण जिल्ह्यातील केव्झिंग येथील सरकारी उच्च माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक मोतीलाल कोईराला यांनी, ECCE अंतर्गत मुलांना सक्रिय, सुदृढ आणि शिकण्यासाठी तयार करण्याच्या दृष्टीने, बालयोगासारख्या अभिनव संकल्पना आणि कृतिक्रमांबद्दल माहिती दिली. खेळांच्या माध्यमातून मुले शिकण्याकडे वळवीत- अशा उद्देशाने बालकांना खेळणी, खेळण्याजोगी उपकरणे, पुस्तके आणि सुसंपन्न वर्गखोल्या शाळेत पुरविली असल्याचेही त्यांनी सांगितले. अशा सर्व खेळ आणि कृतिक्रमांमुळे मुले शाळेकडे आकर्षित होऊन, नावनोंदणीचे प्रमाण वाढण्यास मदत होईल असेही कोईराला यांनी सांगितले.

डॉ.सेनापती यांनी सत्राचा समारोप करताना, सत्रातील सर्व घडामोडींचा आणि चर्चांचा सारांश काढला. नवीन शैक्षणिक धोरण 2020 मुळे भारतीय संस्कृती अधिक संपन्न होण्यास मदत होईल असे सांगत ECCE पासूनच या संस्कृतीची मूल्ये रुजविण्यास सुरुवात होऊ शकते, असे स्पष्ट केले.

 

* * *

M.Chopade/J.Waishampayan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1659151) Visitor Counter : 191