राष्ट्रपती कार्यालय
जेव्हा सारे जग अवकाशाचा वापर लष्करी वर्चस्वासाठी करत होते, तेव्हा "अवकाश विज्ञान हे भारताच्या जलद विकासासाठी सुयोग्य व्यासपीठ ठरेल" असा विचार डॉ.साराभाई यांनी केला : राष्ट्रपती कोविंद
विक्रम साराभाई जन्मशताब्दी समारोप समारंभाला राष्ट्रपतींनी व्हिडीओ संदेशाद्वारे केले संबोधित
Posted On:
25 SEP 2020 4:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 सप्टेंबर 2020
‘सारे जग लष्करी वर्चस्वासाठी अवकाशाचा वापर करत होते तेव्हा, "भारतासारख्या खंडप्राय आणि विविधतासंपन्न देशाच्या जलद विकासाकरिता अवकाश विज्ञान हे सुयोग्य व्यासपीठ ठरेल", असा विचार डॉ.साराभाई यांनीच केला’- असे प्रतिपादन राष्ट्रपती श्री.रामनाथ कोविंद यांनी केले. ते आज (25 सप्टेंबर 2020) अवकाश विभाग आणि अणू ऊर्जा विभागाद्वारे आयोजित, डॉ.विक्रम साराभाई जन्मशताब्दी सोहळ्याच्या समारोप समारंभाला व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून संबोधित करत होते.
डॉ.विक्रम साराभाई यांच्या स्मृती जागविताना राष्ट्रपती म्हणाले की- "असे काही लोक असतात ज्यांच्या जीवनामुळे आणि त्यांनी गाजविलेल्या कर्तृत्वामुळे आपले मनोबल उंचावते. 'भारताच्या अवकाश कार्यक्रमाचे जनक' असणारे डॉ.विक्रम साराभाई हे असेच व्यक्तिमत्त्व होते. स्वतःच्या कर्तृत्वाच्या तेजाने झळकणारे आणि तरीही अतिशय विनयशील असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या उत्तुंग कर्तृत्वाचा अजिबात दिमाख न मिरवणारा असा त्यांचा विनयशील स्वभाव होता. ते एक जागतिक उंचीचे शास्त्रज्ञ तर होतेच त्याशिवाय, धोरणकर्ते आणि संस्थांची उभारणी करणारे असे ते एक थोर नेतृत्व होते. गुणांचा असा मिलाफ अतिशय दुर्मिळ म्हटला पाहिजे. हे सारे यश त्यांनी तुलनेने अतिशय कमी काळात संपादन केले, जणू काही त्यांचा अंतकाळ जवळ आल्याचे त्यांना ठाऊकच असावे. दुर्दैवाने त्यांच्या आयुष्याचा अंत फार लवकर झाला. ते दीर्घकाळ राष्ट्राची सेवा करू शकले असते, तर भारतातील अवकाश विज्ञानाने आश्चर्यकारक उंची गाठली असती, असे आपल्याला वाटत राहते."
"एक शास्त्रज्ञ म्हणून केवळ निरीक्षणे नोंदवून डॉ.साराभाई कधीच स्वस्थ बसू शकले नाहीत. प्रयोगातून हाती आलेल्या माहितीचा अर्थ लावून आंतरग्रहीय अवकाशाचा अधिक चांगला अभ्यास करण्यासाठी ते सतत प्रयत्न करीत असत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विज्ञानविषयक नियतकालिकांध्ये 1947 ते 1971 दरम्यान, त्यांनी 85 संशोधन पत्रिका प्रसिद्ध केल्या." असेही राष्ट्रपती म्हणाले.
राष्ट्रपती म्हणाले, "डॉ.साराभाई हे थोर व्यवहार्यतावादी होते. अवकाशात कार्यरत असणाऱ्या अन्य देशांच्या धाटणीनुसार त्यांनी कधीच भारताच्या अवकाश कार्यक्रमाला दिशा दिली नाही. टप्प्याटप्प्याने पुढे जात राहण्यापेक्षा, तंत्रज्ञानाच्या मदतीने एकदम मोठी झेप घेण्यावर त्यांचा भर असे. भारतासारख्या विकसनशील देशाने थेट उपग्रह संदेशवहनात उडी घेतली पाहिजे असे त्यांचे ठाम मत होते. देशाच्या विकासाच्या दृष्टीने उपग्रह प्रणालीची उपयोगिता दाखवून देण्याची त्यांची इच्छा होती. कोविड-19 साथीतही शालेय शिक्षणात बाधा न येता, दूरशिक्षण पद्धतीचा अवलंब करता येत असल्याचे पाहून, आज आपल्याला त्यांच्या त्या स्वप्नाचे मोल समजते."
"डॉ.साराभाई यांच्या जन्मशताब्दीदरम्यान अंतराळ क्षेत्रासाठीच्या सुधारणा जाहीर करून सरकारने या महान शास्त्रज्ञाला उचित पद्धतीने आदरांजली वाहिली आहे. डॉ.साराभाई यांनी म्हटलेच होते, "मानवाच्या नि समाजाच्या खऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्तम वापर करण्यात आपण प्रथम स्थानावर असले पाहिजे." आता अधिकाधिक 'आत्मनिर्भर' होण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरु असताना, त्यांच्या या शब्दांचे औचित्य आपल्याला अधिकच जाणवते."- असेही राष्ट्रपती म्हणाले.
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा-
* * *
M.Chopade/J.Waishampayan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1659015)
Visitor Counter : 220