पंतप्रधान कार्यालय

राज्यसभा उपाध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल पंतप्रधानांकडून हरिवंश नारायण सिंग यांचे अभिनंदन

Posted On: 15 SEP 2020 12:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  15 सप्टेंबर  2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहाच्या तसेच सर्व देशवासियांच्या वतीने हरिवंश नारायण सिंग यांचे राज्यसभेच्या उपाध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल अभिनंदन केले.

समाजसेवा आणि पत्रकारितेच्या   दोन्ही क्षेत्रात स्वतःची प्रामाणिक ओळख निर्माण केलेल्या हरिवंश यांच्याबद्दल आपल्याला आदर वाटतो, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. सदनातील प्रत्येक सदस्याची त्यांच्याबद्दल अशीच आदराची भावना आहे याबद्दल आपल्याला खात्री आहे, असेही पंतप्रधान पुढे म्हणाले.

हरिवंश यांची कामाची पद्धत आणि सदनातील कामकाज चालवण्याचे कौशल्य याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले. सदनातील त्यांची भूमिका लोकशाहीला बळकट करेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

अध्यक्षांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की सदनाचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी राज्यसभा सदस्य उपाध्यक्षांना योग्य ते सहकार्य करतील. हरीवंश हे सर्वांचे अगदी विरोधी पक्षीयांना देखील आपले मानणारे आहेत, आणि कुठल्याही पक्षाला ते झुकते माप देत नाहीत, असेही पंतप्रधान म्हणाले. सदनातील सदस्यांपैकी प्रत्येकाला त्याची भूमिका मांडायला देणे हे  आव्हानात्मक काम आहे, पण प्रत्येकाचा विश्वास जिंकलेले हरिवंश ते लीलया करतात.

विधेयक मंजूर करण्यासाठी हरीवंश हे तासनतास सदनात थांबतात.  गेली दोन वर्षे त्यांच्या या कार्यपद्धतीला यश मिळाल्याचे आपल्याला दिसत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. देशाचे भविष्य बदलणारी ऐतिहासिक  विधेयके यामुळे मंजूर झाली.  गेल्या दहा वर्षाच्या तुलनेत गेल्या दोन वर्षात विक्रमी संख्येने विधेयके पारित झाली; तीसुद्धा त्यातील एक वर्ष लोकसभा निवडणुका असताना , याचा उल्लेख करून पंतप्रधानांनी याबद्दल सदनाचे अभिनंदन केले. सदनातील उत्पादकतेसोबतच सकारात्मकताही वाढल्यामुळे प्रत्येकजण आपले म्हणणे मांडू शकतो असेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले. अगदी तळागाळातून काम सुरू केलेले

हरीवंश हे जमिनीवर पाय असलेले व्यक्ती आहेत. पहिल्यांदा शिष्यवृत्ती मिळाल्यावर हरिवंश यांनी शिष्यवृत्तीचे पैसे घरी नेण्याऐवजी त्यातून पुस्तके घेतली, याचा उल्लेख करत पंतप्रधानांनी त्यांना पुस्तकांची आवड असल्याचे सांगितले. हरिवंश यांच्यावर जयप्रकाश नारायण यांचा प्रभाव आहे. सामाजिक कार्यात 4 दशके व्यतित केल्यानंतर 2014 मध्ये त्यांनी संसदेत प्रवेश केला.

हरीवंश हे त्यांची सौजन्यपूर्ण वागणूक  आणि माणुसकी यासाठी ओळखले जातात असेही ते म्हणाले. आंतर संसदीय मंडळ तसेच परदेशात जाणारे अनेक सांस्कृतिक प्रतिनिधी मंडळ या माध्यमातून त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताचे प्रतिमा उज्वल केल्याचे पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.

राज्यसभेच्या विविध समित्यांवर अध्यक्ष म्हणून काम केलेले हरिवंश यांनी राज्यसभेच्या कार्यपद्धतीत अनेक बदल घडवून आणले. स्वतः संसद सदस्य झाल्यानंतर हरिवंश यांनी इतर सदस्यांच्या वागणुकीत अधिकाधिक नेमस्तपणा कसा येईल यासाठी प्रयत्न केले. सदनातील कामकाज आणि आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना हरिवंश यांनी एक विचारवंत तसेच कार्यकुशल व्यक्ती म्हणून आपले योगदान कायम दिले, असा उल्लेख पंतप्रधानांनी केला. संसदीय कामकाजाची जबाबदारी पार पाडत असतानाच आणि हरिवंश हे अजूनही भारतभर फिरून देशाच्या सामाजिक आर्थिक आणि धोरणात्मक तसंच राजकीय परिस्थितीचा आढावा घेतात. त्यांच्या उत्कृष्ट लेखणीतून उतरलेल्या पुस्तकातून माजी पंतप्रधान चंद्रशेखरजी यांची ओळख होते . असे चतुरस्त्र व्यक्तिमत्व उपाध्यक्षपदी लाभणे हे राज्यसभेच्या सदस्यांचे भाग्य आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

हरिवंश यांना शुभेच्छा देताना पंतप्रधान म्हणाले की, संसदेची 250 हून जास्त सत्रे पार पडली हे भारतीय लोकशाही परिपक्व होत असल्याचे लक्षण  आहे.

 

U.Ujgare/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1654401) Visitor Counter : 148