आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व अशिया क्षेत्राचे 73 वे सत्र


कोविड-19 महामारी आपतकालीन तयारीविषयी मंत्रीस्तरीय अधिवेशनामध्ये डॉ. हर्षवर्धन यांचे भाषण

‘‘प्रधानमंत्री-आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना देशाच्या आरोग्य क्षेत्राला बळकटी देईल‘‘

Posted On: 10 SEP 2020 9:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 सप्‍टेंबर 2020


केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन  आज जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व अशिया क्षेत्राच्या 73 व्या सत्रांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते. मंत्री स्तरावरच्या या परिषदेला जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व अशिया क्षेत्राच्या संचालिका डॉ. पूनम क्षेत्रपाल सिंग आणि  जागतिक आरोग्य संघटनेच्या आपतकालिन कार्यक्रमाचे संचालक तसेच जागतिक आरोग्य संघटनेचे देशातले प्रतिनिधी डॉ. रोडेरिको आॅफ्रिन उपस्थित होते. 

या कोविड-19 महामारी आपतकालीन तयारीविषयीच्या मंत्रीस्तरीय अधिवेशनामध्ये भारताचे प्रतिनिधित्व डॉ. हर्षवर्धन यांनी केले. यामध्ये त्यांनी सर्वात प्रथम कोविड-19 महामारीच्या काळात आरोग्य सेवांच्या व्यवस्थापनाविषयी माहिती दिली. तसेच कोविड-19 महामारीमुळे भारतामध्ये आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये गुंतवणुकीत वाढ सुनिश्चित करण्यासाठी भारताने कशा पद्धतीने धोरण तयार केले आहे, याची माहिती दिली. तसेच अशा महामारीच्या काळामध्ये आपतकालीन सिद्धता राखण्यासाठी तसेच साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्याासाठी आंतरराष्ट्रीय आरोग्य विषयक नियमनांचे (आयएचआर)  पालन करण्यासाठी पायाभूत आरोग्य सेवा वाढवणे आवश्यक आहे, यावर भारत भर देत असल्याचे  डॉ. हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले. 

जानेवारी 2020 पासून भारत कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे. सार्वजनिक आरोग्यविषयक उपाय योजले जात आहेत. या उपाय योजनांमध्ये प्रवाशांसाठी मार्गदर्शन सल्ला जारी, बाहेरच्या देशातून मायदेशी आलेल्या प्रवाशांना विलगीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम भारताने केले आहे. कोविड-19 चा सामाजिक प्रसार रोखण्यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. यामध्ये संशयित रूग्णांच्या चाचण्या करणे, त्यांची तपासणी करणे, तसेच कोविड समर्पित दक्षता केंद्रामध्ये त्रिस्तरीय आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सौम्य, किरकोळ लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी तसेच गंभीर आजार झाला असेल तर त्यांच्यासाठी आणि अतिगंभीर रुग्णांसाठी अति दक्षता विभागांची सुविधा करण्यात आली आहे. 

कोविड रूग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय कर्मचा-यांसाठी आवश्यक असणारे पीपीई संचांच्या उत्पादनाची क्षमता भारताची खूप मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचे डॉ. हर्षवर्धन यांनी नमूद करून गंभीर कोविड रुग्णांसाठी व्हँटिलेटर्स आणि इतर वैद्यकीय सामुग्री उपलब्ध करून देण्यात असल्याचे सांगितले. संक्रमणाचा प्रसार होवू नये, यासाठी भारताने मार्गदर्शक नियम तयार केले आहेत. त्यांचे काटेकोर पालन वैद्यकीय व्यवस्थापन करताना आणि वैद्यकीय घनकचरा व्यवस्थापन करताना केले जात आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या कोविड केंद्रामध्ये रुग्णांची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी पोर्टल तयार करण्यात आले आहे. सर्व रुग्णांलयांमध्ये किती रुग्णांना दाखल करण्यात आले, त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना कधी घरी पाठविण्यात आले, तसेच रुग्णाचे निधन झाले असेल तर त्याचा तपशील अशी माहिती या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासंबंधी सर्व आवश्यक असलेल्या सूचना आरोग्य केंद्रांना पाठविण्यात आल्या आहेत. तसेच बिगर कोविड आरोग्य केंद्राना अत्यावश्यक वैद्यकीय सेवा प्रदान करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

भारताने कोविड व्यवस्थापन केले आहेच, त्याचबरोबर बिगर कोविड आरोग्य सेवा कायम ठेवण्यासाठीही कार्य केले आहे, असे डॉ. हर्षवर्धन यांनी नमूद केले. 

  1. देशामध्ये जानेवारीमध्ये फक्त एका प्रयोगशाळेमध्ये कोविडची चाचणी होवू शकत होती. सध्या देशात 1678 प्रयोगशाळांमध्ये चाचण्या होत असून दररोज लाखो चाचण्या होत आहेत. 
  2. कोविड रुग्णांना आरोग्यसेवा पुरविताना त्रिस्तरीय व्यवस्थापन करण्यात आले आहे. यामध्ये सौम्य, मध्यम आणि गंभीर कोविड रुग्ण असे वर्गिकरण करून त्यानुसार  मार्गदर्शक तत्वांचे पालन करून उपचार केले जात आहेत. चाचण्या, सातत्याने अवलोकन आणि प्रसार रोखण्यासाठी काम केले जात आहे. यासाठी वैद्यकीय कर्मचा-यांनाही सातत्याने प्रशिक्षण दिले जात आहे. 
  3. गंभीर रूग्ण, विकृती, रक्तविकार, गर्भवती आणि वृद्ध रूग्ण तसेच जास्त लक्ष देण्याची आवश्यकता असलेले रूग्ण यांना जीवनरक्षक प्रणाली सेवा उपलब्ध होईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे, यासाठी देश वचनबद्ध आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड रूग्णांच्या उपचारांसाठी सर्वतोपरी मदत देण्यात येत आहे. 

या सत्रामध्ये डॉ. हर्षवर्धन यांनी आरोग्य, वैद्यकीय आपतकाळामध्ये केलेली तयारी आणि भविष्यात कोणत्याही साथीच्या आजारामध्ये प्रतिकूल परिणाम होवू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून  भारताने केलेली वैद्यकीय सिद्धता, यांची माहिती दिली. ‘‘प्रधानमंत्री- आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना’’ याविषयीही त्यांनी माहिती दिली. या योजनेअंतर्गत, आरोग्य सेवांसाठी अर्थसंकल्पामध्ये केलेली तरतूद, आरोग्य सेवांची तयारी आणि प्रतिसाद तसेच आयएचआरनुसार मूलभत क्षमता बळकट करण्यासाठी केलेले कार्य, आरोग्य सेवांच्या गुणवत्तेमध्ये झालेली सुधारणा, रूग्णाच्या देखभालीची कार्यपद्धती, यांच्याविषयी संशोधन करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांच्याशी समन्वय साधून संयुक्त चौकटीमध्ये कार्य करताना वैद्यकीय सेवा क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर होण्याचा व्यापक दृष्टिकोण ठेवण्यात आला असल्याचे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. त्याचबरोबर याचा संबंध जैव-वैद्यकीय संशोधन आणि जैव-सुरक्षा धोरण, अन्न आणि औषध सुरक्षा यांची व्याप्ती वाढविण्याशी आहे. यासाठी खाजगी क्षेत्रामधून होणा-या गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यात येत आहे.  पीपीई, एन 95 मास्क बनविणे तसेच इतर वैद्यकीय साधने बनविण्यासाठी सरकारी आणि खाजगी क्षेत्रांबरोबर भागीदारी करून भारताने ही उत्पादने आता देशातच सुरू केली आहेत. अशाच प्रकारे वैद्यकीय क्षेत्रामध्ये स्वावलंबी होण्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसेच वित्त मंत्रालय एकत्रित प्रयत्न करीत आहेत. इतर भागीदारांबरोबर यासाठी सखोल चर्चा करण्यात येवून ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाअंतर्गत स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी येणारे अडथळे दूर करण्यात येत असल्याचे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. 

 

* * *

B.Gokhale/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1653181) Visitor Counter : 246