कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
मसुरीतील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीच्या 61 व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांचे भाषण
पहिल्यांदाच अकादमीतर्फे 20 विविध शासकीय सेवा अभ्यासक्रम एकत्र करुन संयुक्त पायाभूत अभ्यासक्रमाची रचना- डॉ जितेंद्र सिंह
Posted On:
10 SEP 2020 7:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 सप्टेंबर 2020
केंद्रीय राज्यमंत्री, पंतप्रधान कार्यालय आणि कर्मचारी, सार्वजनिक तक्रार, पेन्शन अणुउर्जा आणि अवकाश मंत्रालयांचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज मसुरीतील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमी येथे भाषण केले. या अकादमीने, पहिल्यांदाच आपल्या अभ्यासक्रमाची व्याप्ती वाढवून, एक संयुक्त अभ्यासक्रम आयोजित केला आहे. आधी या अकादमीच्या पायाभूत अभ्यासक्रमात केवळ आयएएस आणि इतर काही सेवांचाचा समावेश होत असे, मात्र पहिल्यांदाच 20 विविध सेवांचा यात समावेश करण्यात आला आहे.
भविष्यात, या पायाभूत अभ्यासक्रमाची व्याप्ती आणखी वाढवली जाईल, असे त्यांनी सांगितले.
तुकड्यातुकड्यांमधून काम करण्याच्या प्रवृत्तीतून बाहेर पडत एकसामाईक दृष्टीकोन घेऊन काम करण्याचा विचार करावा या पंतप्रधानांच्या विचाराच्या अनुषंगाने, या सेवा एकत्र केल्या जातील असेही ते म्हणाले.

या अकादमीच्या 61 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलतांना जितेंद्र सिंह म्हणाले की, लाल बहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमी केवळ भारतीय उपखंडातच नव्हे तर, संपूर्ण जगातली महत्वाची संस्था मानली जाते. सहा दशकांच्या प्रदीर्घ वाटचालीत या अकादमीने अत्यंत परिश्रम आणि चिकाटीने स्वतःला विकसित केले आहे.
एक अभ्यासू व्यक्तिमत्व आणि उत्तम प्रशासक असलेल्या डॉ संजीव चोप्रा यांच्या नेतृत्वाखाली या अकादमीने सर्वसमावेशक प्रशिक्षण आणि शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या मदतीने, लवकरात लवकर अभिनव उपाययोजना केल्याबद्दल डॉ सिंह यांनी चोप्रा आणि त्यांच्या संपूर्ण चमूचे कौतुक केले.भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी ही अकादमी सातत्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांना तयार करत असल्याचे ते म्हणाले.
‘तटस्थ आणि निस्वार्थी भावनेने केलेला प्रत्येक प्रयत्न हा नव्या भारताचा भक्कम पाया आहे,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले असून तोच प्रशासकीय सुधारणांचा मंत्र असल्याचे त्यांनी सांगितले.
नव भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी, 21 व्या शतकातील विचार आणि स्वप्ने या आपल्या नोकरशाहीचा अविभाज्य घटक असायला हवा, अशी नोकरशाही, जी सृजनशील आणि विधायक असेल, कल्पक आणि अभिनव संशोधन करणारी असेल, सक्रीय आणि विनम्र असेल, व्यावसायिक आणि प्रगतीशील असेल, उर्जावान आणि सक्षम असेल, कार्यक्षम आणि प्रभावी असेल, पारदर्शक आणि तंत्रज्ञानस्नेही असेल, असे जितेंद्र सिंह म्हणाले.

सरकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी, केंद्रीय मंत्रिमंडळाने अलीकडेच कर्मयोगी अभियानाला मंजुरी दिली आहे. या अभियानामुळे नव्या भारतासाठीचे नवे सनदी अधिकारी तयार केले जाऊ शकतील, असे सिंह यांनी सांगितले.
गेल्या काही महिन्यात भारताने जगाला दाखवून दिले आहे की कोरोनाचे कठीण आव्हान समोर असतांनाही, कामे तितक्याच सुरळीतपणे केली जाऊ शकतात. अकादमीने या काळात सुरु केलेल्या सर्वात मोठ्या संयुक्त अभ्यासक्रमाविषयी आनंद व्यक्त करत, त्यांनी या संस्थेला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
* * *
B.Gokhale/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1653116)
Visitor Counter : 168