उपराष्ट्रपती कार्यालय

राज्यसभा अध्यक्षांनी पावसाळी अधिवेशन सुरळीत पार पडावे यासाठी अभिरुप सत्राचे आयोजन केले


विविध ठिकाणांहून आणि अभिरुप विभागांच्या माध्यमातून मत प्रक्रियेची चाचणी

संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठीच्या विशेष तयारीचा वेंकैय्या नायडू यांनी घेतला आढावा

विविध मंत्रालय/विभागांकडून जारी करण्यात आलेल्या आरोग्य निकषांचे काटेकोर पालन करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

Posted On: 09 SEP 2020 8:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  9 सप्टेंबर  2020

 

राज्यसभेचे अध्यक्ष एम वेंकैय्या नायडू यांनी आज 14 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या विशेष तयारीचा आढावा घेतला.

अभिरुप सत्राचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात अध्यक्ष आणि सचिवालयाच्या कर्मचाऱ्यांनी सामाजिक अंतराचे निकष पाळत दालनात आणि चार गॅलरींमध्ये बसून चाचणी केली. कर्मचाऱ्यांना लोकसभेतही बसवण्यात आले आणि त्यांनी लोकसभा दालनातून कामकाजात सहभाग घेतला. 

प्रत्येक दालनातून ध्वनी आणि दृश्यव्यवस्थेची पूर्णपणे तपासणी केली. इंटरप्रिटेशन सिग्नल्सही व्यवस्थित काम करत असल्याचे दिसून आले. लोकसभेत बसलेल्या व्यक्तींना चर्चेत सहभागी होण्यास सांगितले. तसेच तीन ठिकाणांहून मतपत्रिका वितरीत करुन नमुना मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. सर्व व्यवस्थेवर अध्यक्ष नायडू यांनी समाधान व्यक्त केले.

नायडू यांनी सचिवालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले की, गृहमंत्रालय आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या नियमांचे अतिशय काटेकोर पालन करण्यात यावे. सभासदांना नियमावलीच्या माध्यमातून अधिवेशनापूर्वी आणि अधिवेशन काळात आरोग्य निकषांविषयी स्मरण करुन द्यावे.

सभागृहात कार्यरत प्रत्येक कर्मचाऱ्याची चाचणी करण्याची आवश्यकता असल्याचे नायडू म्हणाले. तर, दोन दिवसांपासून चाचणी प्रक्रिया सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अध्यक्षांनी आपल्या दालनात आंध्र प्रदेशातून निर्वाचीत सदस्य परिमल नथवानी यांना शपथ दिली. ज्या सदस्यांचा शपथविधी 22 जुलै रोजी होऊ शकला नाही, त्यांना अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 14 सप्टेंबर रोजी शपथ देण्यात येईल.    

 

M.Chopade/S.Thakur/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1652760) Visitor Counter : 169