आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य सचिव रूग्णसंख्येत जास्त वाढ होत असलेल्या, आणि मृत्युदर जास्त असलेल्या 6 राज्यांतील/ केंद्रशासित प्रदेशातील आरोग्य सचिवांची बैठक घेणार
राज्यांना कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना आखून आणि आरटी-पीसीआर चाचण्यांचा पूर्णतः उपयोग करून रोगप्रसाराची साखळी तोडून मृत्यु दर 1%पेक्षा कमी आणण्यास बजाविले
प्रविष्टि तिथि:
06 SEP 2020 7:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 सप्टेंबर 2020
केंद्रीय आरोग्य मंत्रालय कोविड महामारीच्या प्रसारावर कृतीशीलपणे लक्ष ठेवून आहे आणि ज्या जिल्ह्यातील सक्रिय कोविड रूग्णांची संख्या आणि मृत्यु दर वाढत आहे अशा सर्व संबंधित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील अधिकाऱ्यांशी प्रभावीपणे संवाद साधत असून त्यांना या संकटाचे व्यवस्थापन करण्यासाठी मार्गदर्शन करत आहे.
या संदर्भात केंद्रीय आरोग्य सचिवांनी महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, गुजरात, पुडूचेरी ,झारखंड आणि दिल्ली या राज्यांतील आरोग्य सचिवांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन संवाद साधला आणि त्यांच्या अधिपत्याखाली येणाऱ्या 33 जिल्ह्यांतील प्रतिबंधात्मक योजना आणि कोविड व्यवस्थापनाचा आढावा घेतला.
यात महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगरे,कोल्हापूर, सांगली,नाशिक, अहमदनगर ,रायगड, जळगाव, सोलापूर, सातारा, पालघर, औरंगाबाद, धुळे आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे.
बैठकीतील सदस्यांना संबोधित करताना केंद्रीय सचिवांनी या रोगावर अंकुश ठेवण्यासाठी आणि पर्यायाने रोगाच्या प्रसाराची साखळी तोडण्यासाठी सक्रीय रुग्णांचा शोध घेत ,इतर रोगांनी ग्रस्त आणि वयोवृद्धांवर लक्ष केंद्रित करून ,बाधित भागात पुन्हा भेट देऊन आणि तेथील प्रतिबंधात्मक उपाययोजना वाढविण्याची तसेच चाचण्यांचा वेग वाढवत सक्रीय दर 5%हून कमी करण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले.
यावेळी विविध राज्यांतील आरोग्य सचिवांनी आपापल्या जिल्ह्यांतील कोविड -19 च्या सध्याच्या परिस्थितीचे तपशीलवार विश्लेषण सादर केले. त्यांनी पुढील महिन्यात हाती घेत असलेल्या कार्यक्रमाची आणि कृती आराखड्याची सांगोपांग चर्चा केली.
राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना विशिष्ट भागात पावले उचलण्याचा सल्ला दिला आहे:
- रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलात आणाव्यात आणि सामाजिक अंतर राखण्याचे पालन आणि कडक परीमितीचे पालन करणे , तसेच घराघरांत जाऊन सक्रीय रुग्णांचा शोध घेणे.
- जिल्ह्यात सर्वत्र चाचण्यांचा वेग वाढवत रूग्ण ओळखणे आणि गरज भासल्यास आरटी-पीसीआर चाचण्यांची क्षमता वाढविणे.
- आजार वाढल्यास, गृह विलगीकरणातील रुग्णांवर चांगल्या प्रकारे लक्ष ठेवणे आणि रूग्णालयात लवकर दाखल करून घेण्यासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी करणे.
- वयोवृद्ध आणि इतर रोगांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना त्वरीत आणि लवकर रुग्णालयात दाखल करून वैद्यकीय उपचार पुरविणे.
- वैद्यकीय कर्मचाऱ्यांना या रोगाची लागण होऊ नये यासाठी रुग्णालयांमध्ये प्रभावी संसर्ग नियंत्रण ठेवणे.
- जिल्हाधिकारी आणि इतर कार्यकारी अधिकारी व्यक्तींनी जिल्ह्यासाठी विशिष्ट योजना तयार करून आणि ती अद्ययावत करत या महामारीचे व्यवस्थापन करण्यासाठी कठोरपणे प्रयत्न करणे.
B.Gokhale/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1651841)
आगंतुक पटल : 297