आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

राज्यांनी पूर्ण सक्रीयतेने संक्रमण साखळी नियंत्रित करण्याचा आणि मृत्यूदर 1% पेक्षा खाली आणण्याचा केंद्र सरकारचा सल्ला


आरोग्य मंत्रालयाकडून उच्च रुग्णदर आणि मृत्यूदर असलेल्या 4 राज्यांतील 15 जिल्ह्यांच्या कोविड व्यवस्थापन आणि प्रतिसादाविषयी आढावा

Posted On: 04 SEP 2020 8:32PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 सप्‍टेंबर 2020

 

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आंध्र प्रदेश, पंजाब, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांतील 15 जिल्ह्यांतील आरोग्यसचिवांशी संवाद साधला. चित्तूर, प्रकाशम, मैसुरु, बेंगळुरु अर्बन, बल्लारी, कोप्पल, दक्षिण कन्नड, दावनगिरी, लुधियाना, पतियाला, चेन्नई, कोईम्बतूर, सालेम, लखनऊ आणि कानपूर नगर ही 15 जिल्हे आहेत. या जिल्ह्यांमध्ये गेल्या चार आठवड्यात सक्रीय रुग्णांची उच्च संख्या, उच्च मृत्यूदर आढळून आला आहे. आरोग्य सचिवांशिवाय, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांची बैठकीसाठी उपस्थिती होती.

केंद्रीय आरोग्य सचिवांनी या जिल्ह्यांचा चाचणी, सक्रीयता (पॉझिटीव्हीटी), रुग्ण मृत्यूदर या निकषांवर सर्वंकष आढावा आणि कामगिरी सामायिक केली. सातत्यपूर्ण प्रतिबंधित उपाययोजना, चाचण्यांची संख्या वाढवणे, रुग्णांचे प्रभावी रुग्णालय व्यवस्थापन यावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले. राज्याच्या आरोग्य सचिवांनी 15 जिल्ह्यांतील सद्यस्थितीचे तपशीलवार विश्लेषण केले आणि पुढील एक महिन्यासाठीचे नियोजन सादर केले.    

जिल्ह्यांमध्ये घेण्यात आलेल्या आरटी-पीसीआर आणि रॅपिड अ‍ॅन्टीजेन चाचण्यांची विभागणी, लक्षणे असलेल्या अ‍ॅन्टीजेन चाचण्यांमधील नकारात्मक अहवालांची पुन्हा चाचणी, चाचणी प्रयोगशाळांचा वापर, गृह अलगीकरण स्थिती, रुग्णालय स्थिती आणि ऑक्सिजन-जोडणी असलेल्या खाटा, आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर याबाबतची माहिती केंद्र सरकारला दिली.

राज्यांना पुढील विशिष्ट क्षेत्रांसंदर्भात पावलं उचलण्याचा सल्ला देण्यात आला आहे:

  1. प्रतिबंधित उपाय आणि सामाजिक अंतराचे नियम पाळून, कडक परिघीय नियंत्रण, सक्रीयतेने घरोघरी जाऊन रुग्णशोधन या उपायांच्या माध्यमातून संक्रमणाचा प्रसार कमी करणे आणि पर्यायाने रोखणे.
  2. आरटी-पीसीआर चाचण्यांची संख्या वाढवून लवकर निदान करणे आणि रॅपिड अ‍ॅन्टीजेन चाचण्या हॉटस्पॉटस आणि जास्त लोकसंख्या असलेल्या क्षेत्रांमध्ये कराव्या.
  3. गृह अलगीकरणाचे प्रभावी व्यवस्थापन आणि रुग्णाची स्थिती पाहून तातडीने रुग्णालयात दाखल करावे.
  4. सुरळीत रुग्णालय सेवा आणि ज्यांना वैद्यकीय मदतीची आवश्यकता आहे, जसे सह-रुग्णता असेलेल आणि ज्येष्ठ नागरीक यांना लवकर दवाखान्यात दाखल करावे.
  5. रुग्णालयांमध्ये संसर्ग नियंत्रणापासून बचाव करण्यासाठी आरोग्य सेवा कामगारांना प्रभावीपणे संक्रमण नियंत्रण उपायांचे अनुसरण करण्यास सांगणे.
  6. जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांनी जिल्ह्याशी संबंधित आराखडा तयार करुन संक्रमणाचे व्यवस्थापन करावे.

 

* * *

B.Gokhale/S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1651419) Visitor Counter : 159