संरक्षण मंत्रालय

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे नौदल कमांडर्सना प्रमुख क्षेत्रांबाबत चर्चा करण्याचे आवाहन


राष्ट्राच्या सागरी हितसंबंधांचे संरक्षण करण्यात नौदलाने बजावलेल्या भूमिकेची केली प्रशंसा

Posted On: 19 AUG 2020 7:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट 2020

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 19 ऑगस्ट  2020 रोजी नौदल कमांडर्स परिषदेच्या उद्‌घाटन दिनी नौदल कमांडर्सना संबोधित केले. राष्ट्राच्या सागरी हितसंबंधांचे संरक्षण करण्यात भारतीय नौदलातील पुरुष आणि स्त्रियांनी बजावलेल्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली आणि जहाजे आणि विमाने तैनात करण्यात सक्रिय प्रतिसाद देत कोणत्याही आव्हानाचा सामना करण्याची भारतीय नौदलाची तयारी असल्याचा आत्मविश्वास  व्यक्त केला.

कोविड -19 महामारीमुळे निर्माण झालेल्या  अभूतपूर्व आव्हानाबाबत बोलताना त्यांनी  परदेशात  अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्याच्या  आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या  ऑपरेशन समुद्र सेतू मोहिमेबद्दल भारतीय नौदलाचे अभिनंदन केले ज्यांनी राष्ट्रीय हितात मोठे योगदान दिले आहे. कठीण सागरी परिस्थिती आणि कोरोना विषाणूच्या रूपात न पाहिलेल्या शत्रूचा सामना करण्याचे आव्हान असूनही, हिंद महासागर क्षेत्रातील शेजारी देशांमधून  सुमारे 4000 लोकांना मायदेशी आणण्यात नौदलाची महत्वाची भूमिका होती. तसेच 'मिशन सागर' अंतर्गत दक्षिण पश्चिम हिंद महासागर प्रदेशातील  (मालदीव, मॉरिशस, कोमोरोस, सेशेल्स आणि मादागास्कर ) देशांना वैद्यकीय मदत पुरवली गेली. कोविड -19.च्या व्यवस्थापनात नागरी प्रशासनाला मदत करण्यासाठी विलगीकरण  सुविधांची स्थापना करण्यात सर्व नौदल  कमांडच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

राजनाथ सिंह म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सागर (प्रांतातील सर्वांची सुरक्षा आणि विकास) या कल्पनेने  प्रेरित होऊन भारतीय नौदलाने प्रमुख आणि  संवेदनशील ठिकाणी नौदल व विमाने तैनात करून सागरी हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी मिशन आधारित तैनाती प्रभावीपणे राबवली आहे. जून 2017 मध्ये मिशन आधारित  तैनाती सुरू झाल्यापासून या तैनातीतून सागरी क्षेत्र  जागरूकता (एमडीए) वाढली आहे , हिंद महासागर प्रदेशातील समुद्रकिनाऱ्यावर  जलद मानवतावादी मदत पुरवण्यात आली आणि आपत्ती निवारण करण्यात आले आणि आंतरराष्ट्रीय सागरी समुदायाला सुरक्षा पुरवण्यात  आली आहे.

सशस्त्र दलात होत असलेल्या धाडसी बदलांविषयी बोलताना, संरक्षण मंत्र्यांनी तिन्ही सैन्यदलांमध्ये विशेषत: प्रशिक्षण, खरेदी आणि कार्मिक  यामध्ये अधिक समन्वय घडवून आणण्यासाठी संरक्षणदल प्रमुख (सीडीएस ) पदाची आणि लष्करी कामकाज  विभाग (डीएमए) ची निर्मिती केल्याचे अधोरेखित केले.

चालू आर्थिक वर्षात कोविड 19 परिस्थितीमुळे उद्भवलेल्या आव्हानांचा स्वीकार करत  भारतीय नौदलाने क्रियाशील , प्रशासकीय आणि आधुनिकीकरणाच्या प्रयत्नांमध्ये सातत्याने प्रगती केली आहे असे संरक्षण मंत्री म्हणाले. आर्थिक आव्हानांना न जुमानता, सरकारने सेवांच्या आपत्कालीन गरजा पूर्ण करण्यासाठी आपत्कालीन अधिकार देण्याचे आवाहन केले असेही ते म्हणाले.

सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाच्या अनुषंगाने ‘आत्मनिर्भर भारत’ च्या दिशेने  भारतीय नौदलाच्या सिद्ध वचनबद्धतेबाबत भाष्य करताना, स्वदेशीकरण प्रक्रियेत नौदल आघाडीवर राहिल्याबद्दल कौतुक केले.  आतापर्यंत मिळवलेले यश  आपण कायम राखणे महत्वाचे असल्याचे ते म्हणाले.   नुकत्याच उद्‌घाटन झालेल्या एनआयआयओ (नेव्हल इनोव्हेशन अँड इंडिजेनायजेशन  ऑर्गनायझेशन) हे त्या दिशेने एक पाऊल आहे. परिषदेला यश चिंतत संरक्षण मंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आणि आत्मविश्वास व्यक्त केला की प्रमुख लक्षित क्षेत्रे आणि रणनीतीबाबत विस्तृत चर्चा होईल.

आगमनानंतर संरक्षण मंत्र्यांचे  नौदल  प्रमुख ऍडमिरल करमबीर सिंह यांनी स्वागत केले आणि कोविड -19 महामारीचा सामना करण्यासाठी  भारतीय नौदलाने केलेल्या नाविन्यपूर्ण गोष्टींची त्यांना माहिती दिली. यामध्ये नौदलाद्वारे विकसित / संरचित  विविध उपकरणे यांचा समावेश होता, ज्याचा उपयोग विविध संस्थांकडून  प्रभावीपणे केला जात आहे.

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1647068) Visitor Counter : 198