आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

डिजिटल इंडियाचा मोठा विजय - आरोग्य मंत्रालयाच्या ‘ई-संजीवनी’ दूरवैद्यकीय सेवेव्दारे विक्रमी दोन लाख जणांना आरोग्यविषयक सल्ले

Posted On: 19 AUG 2020 4:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट 2020

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने प्रारंभ करण्यात आलेल्या ‘ई-संजीवनी’ या डिजिटल दूरवैद्यकीय(टेलीमेडिसिन) सेवेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. या सेवेव्दारे  विक्रमी दोन लाख जणांना आरोग्यविषयक सल्ले देण्यात आले आहेत.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली अवघ्या दहा दिवसांपूर्वी, दि. 9 ऑगस्ट,2020 रोजी या दूर-वैद्यकीय आरोग्य सुविधेले दीड लाखाचा टप्पा ओलांडला म्हणून एक बैठक आयोजित केली होती. त्यानंतर आता या सेवेने आणखी एक नवा विक्रम केला आणि दोन लाख गरजवंतांना ई-संजीवनीची डिजिटल सेवा पुरवली आहे. सध्या सर्वत्र कोविड-19 महामारीचा प्रसार झाला आहे, अशा वेळी ही डिजिटल सेवा सर्व स्तरावर उपयुक्त ठरत आहे. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणा-यांना आणि रूग्णांना ही सेवा लाभदायक ठरत आहे.

ई-संजीवनीच्या माध्यमातून प्रामुख्याने दोन प्रकारे दूरवैद्यकीय सेवा देण्यात येत आहे. यामध्ये डॉक्टर ते डॉक्टर (ई-संजीवनी )आणि रूग्ण ते डॉक्टर (ई-संजीवनी ओपीडी) अशा पद्धतीने सल्लामसलत केली जात आहे. डॉक्टर ते डॉक्टर (ई-संजीवनी ) सेवा  आयुष्मान  भारत -आरोग्य आणि निरामय केंद्र याच्या अंतर्गत राबविण्यात येत आहे. देशभरातल्या सर्व 1.5 लाख आरोग्य आणि वेलनेस केंद्राच्या माध्यमातून तसेच वैद्यकीय महाविद्यालयांची रूग्णालये यांच्याशी ‘हब अँड स्पोक’ मॉडेलने जोडण्याची कल्पना आहे. राज्यांनी ‘स्पोकस्’ म्हणजेच एसएचएस, पीएचसीज, आणि एचडब्ल्यूसी, तसेच जिल्हा रूग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये यांना दूर वैद्यकीय सेवेमार्फत जोडायचे आहे. आरोग्य मंत्रालयाने एप्रिल,2020 मध्ये कोविड-19 चा झालेला उद्रेक लक्षात घेवून जिल्हा रूग्णालयांसाठी असे वैद्यकीय ‘हब’ तयार करण्याचे महत्व ओळखले. आणि ही सेवा अधिक सक्षम करण्यासाठी देशभरामध्ये दूरध्वनीव्दारे आरोग्य सेवा ‘ई संजीवनी ओपीडी’ सुरू केली. कोविड-19 सारख्या अतिशय गरजेच्या वेळी ही अत्यावश्यक आरोग्य सेवा लोकांना उपयोगी पडत आहे.

ई-संजीवनीची सेवा आत्तापर्यंत देशभरातल्या 23 राज्यांमध्ये सुरू झाली आहे. इतर राज्यांमध्येही या सेवेला प्रारंभ करण्याच्यादृष्टीने कार्य प्रगतीपथावर आहे.

ई-संजीवनी सेवा सुरू करणाऱ्या पहिल्या पाच राज्यांमध्ये तामिळनाडू (56,346 जणांना सल्ले दिले), उत्तर प्रदेश (33,325 जणांना सल्ले दिले), आंध्र प्रदेश (29,400 जणांना सल्ले दिले), हिमाचल प्रदेश (26,535 जणांना सल्ले दिले) आणि केरळ (21,433 जणांना सल्ले दिले) यांचा समावेश आहे. आंध्र प्रदेशात सर्वाधिक वैद्यकीय महाविद्यालयामार्फत एचडब्ल्यूसीना (25,478) आरोग्य विषयक सल्ले देण्यात आले आहेत. तसेच तामिळनाडू ओपीडी सेवा देण्यात आघाडीवर आहे. तामिळनाडूमध्ये 56,346 जणांना वैद्यकीय सल्ले मिळाले आहेत.

 

M.Chopade/S.Bedekar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1646934) Visitor Counter : 264