पंतप्रधान कार्यालय

74 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात लाल किल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राष्ट्राला उद्देशून भाषण

Posted On: 15 AUG 2020 8:07PM by PIB Mumbai

 

भाषणातील काही महत्वाचे मुद्दे

 1. माझ्या प्रिय देशबांधवांनो ,स्वातंत्र्यदिनाच्या या मंगल प्रसंगी मी सर्व देशवासियांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि  शुभेच्छा देतो.
 2. आज आपण कोरोनाच्या एका विशिष्ट परिस्थितीतून जात आहोत. या कोरोना कालावधीत लक्षावधी कोविड योद्धे, ‘सेवा परमो धर्माहा मंत्र अक्षरशः जगत आहेत. डॉक्टर्स, परिचारिका, सफाई कामगार, रुग्णवाहिका चालवणारे, पोलीस कर्मचारी, सेवा कर्मचारी आणि इतर अनेक लोक इतका दीर्घकाळ अविश्रांत काम करत आहेत.
 3. देशाच्या विविध भागात, विविध नैसर्गिक संकटांमुळे ज्यांना प्राण गमवावे लागले, अशा लोकांच्या कुटुंबियांप्रती पंतप्रधानांनी शोकसंवेदना व्यक्त केली. या संकटकाळात सरकार सर्व पीडितांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
 4. भारताचा स्वातंत्र्यलढा संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी होता. विस्तारवादि धोरणामुळे काही देशांना गुलाम करण्यात आले. मात्र दोन्ही महायुद्धाच्या सावटात असतांनाही भारताने आपला स्वातंत्र्यलढा तितक्याच कणखरपणे सुरु ठेवला.
 5. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १३० कोटी भारतीयांनी आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याचा संकल्प केला आहे.  आत्मनिर्भर भारत आज सगळ्या भारतीयांच्या मनबुद्धीत  रुजला आहे.  आज सगळीकडे त्याची छाप दिसते आहे. आत्मनिर्भर भारत आज १३० कोटी देशवासियांसाठी मंत्र बनला आहे. हे स्वप्न आज जणू प्रतिज्ञा झाले आहे.भारताच्या क्षमतांवर, भारतीयांमधल्या क्षमतांवर माझा पूर्ण विश्वास आहे. एकदा आपण काही करायचे ठरवले, तर आपण ते धेय्य पूर्ण करेपर्यंत स्वस्थ बसत नाही.
 6. आज संपूर्ण जग परस्परांशी जोडलेले आहे, परस्परावलंबी झाले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका पार पाडण्याची भारतासाठी  हीच योग्य वेळ आहे.मात्र, त्यासाठी आधी भारताला आत्मनिर्भर व्हावं लागेल. कृषीपासून आरोग्यापर्यंत, सायबर क्षेत्रापर्यंत, सगळीकडे आत्मनिर्भर होण्यासाठी भारताने महत्वाची पावले उचलली आहेत.या उपाययोजना, जसे अवकाश क्षेत्र खुले करणे, यातून रोजगाराच्या नव्या न्साधी उपलब्ध होतील आणि युवकांना त्यांची कौशल्ये अद्ययावत करण्याचे नवे मार्गही उपलब्ध होतील..
 7. केवळ काही महिन्यांपूर्वी, आपण एन -95 मास्क ची आयात करत होतो, कारण देशात एन-95 मास्क तयार होत नव्हते , ते आता निर्माण होऊ लागले, पीपीई बनत नव्हते, ते तयार होऊ लागले, व्हेंटीलेटर तयार होत नव्हते,आता तयार होऊ लागले, देशाच्या आवश्यकतेची पूर्तता तर झालीच त्याचबरोबर जगात निर्यात करण्याची आपली ताकद  निर्माण झाली.
 8. आता मेक इन इंडियाच्याबरोबरीने मेक फॉर वर्ल्डहा मंत्र घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे.
 9. नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन प्रकल्पासाठी एकशे दहा लाख कोटींपेक्षा जास्त खर्च केला जाणार आहे .त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात सुमारे सात हजार प्रकल्पांची  निवड करण्यात आली आहे. यातून देशाच्या पायाभूत सुविधा क्षेत्राला एक नवी दिशा मिळेल, एक नवी गती मिळेल. आता आपल्याला मल्टी मॉडेल दळणवळण पायाभूत सुविधांवर भर द्यायला हवा. आपण आता तुकड्यांमध्ये काम करु शकत नाही. आपल्या पायाभूत सुविधा सर्वंकष असाव्यात, एकीकृत असाव्यात, एकमेकाशी पूरक असाव्यात, रेल्वेशी  रस्ता पूरक आहे,रस्त्याशी बंदर पूरक, नव्या शतकासाठी, आपल्या बहुआयामी  पायाभूत  सुविधा एकमेकांशी जोडत आपण पुढे जात आहोत. हा नवा आयाम राहील. मोठे स्वप्न घेऊन यावर काम सुरु केले आहे, मला विश्वास आहे, हे तुकडे संपुष्टात आणून सर्वसमावेशक कामातून आपल्या सर्व व्यवस्थेला नवी ताकद मिळेल.
 10. आपण किती काल केवळ कच्चा माल पुरवत राहणार आणि तयार उत्पादनांची आयात करत राहणार? एक काळ असा होता, जेव्हा देशाची कृषीव्यवस्था अत्यंत बिकट होती. आपल्यासमोरसर्वात मोठे संकट होते की आपण आपल्या सर्व नागरिकांना काय खायला घालणार? आज आपण केवळ आपल्याच नागरिकांचे पोट भरु शकतोय, एवढेच नव्हे, तर अनेक देशांमध्ये अन्नाची निर्यातही करतो आहोत. आत्मनिर्भर भारत म्हणजे केवळ आयात घटवणे नव्हे, तर त्यातून आपल्या आपली कौशल्ये आणि जगाशी संपर्क देखील वाढवायचा आहे.
 11. भारतात होत असलेल्या या सुधारणांकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. म्हणूनच तर, अगदी कोविडच्या काळातही भारतात होणाऱ्या थेट परदेशी गुंतवणूकीत 18% टक्क्यांची वाढ झाली.
 12. कोणी  कल्पना करू शकत होते का,की कधी गरिबांच्या जनधन खात्यात लाखो करोडो रुपये थेट हस्तांतरित होऊ शकतातशेतकऱ्याच्या कल्याणासाठी एपीएमसी सारख्या कायद्यात इतके बदल आणले जाऊ शकतातएक देश एक रेशन कार्ड असो,एक देश एक ग्रीड असो, नादारी आणि दिवाळखोरी विषयीचा  कायदा असो, बँकांचे विलीनीकरण करण्याचा प्रयत्न असो, हे सगळे आज वास्तवात घडले आहे.
 13. आम्ही महिला सक्षमीकरणासाठी काम केले आहे. नौदल आणि हवाई दलात महिलांना लढावू क्षेत्रात घेतले जात आहे. महिला आज नेतृत्व करत आहेत, आम्ही तीन तलाकची प्रथा रद्द केई, महिलांसाठी केवळ 1 रुपयात सैनिटरी पैड देण्याची व्यवस्था केली.
 14. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्या शास्त्रात म्हटले गेले आहे-

सामर्थ्य मुलं स्वातंत्र्यम,

श्रम मुलंच वैभवं

म्हणजे कोणत्याही समाजाचा, कोणत्याही राष्ट्राच्या स्वातंत्र्याचा स्रोत म्हणजे त्याचे सामर्थ्य आणि त्याचे वैभव, उन्नती, तसेच प्रगतीचा स्रोत म्हणजे त्याची श्रमशक्ती होय

 1. सात कोटी गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर दिला गेला, शिधापत्रिका असो वा नसो 80 कोटींहून जास्त देशबांधवांच्या घरातील चूल पेटती ठेवण्यासाठी, त्यांना मोफत अन्नधान्य पुरविण्यात आले, 90 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त बँकेत थेट लाभ हस्तांतरण करण्यात आले. गरिबांना त्यांच्या गावातच रोजगार मिळवून देण्यासाठी गरीब कल्याण रोजगार अभियान सुरु करण्यात आले
 2. व्होकल फॉर लोकल, पुनर्कौशल्ये आणि कौशल्ये अद्ययावत करणे यातून देशातील दारिद्र्यरेषेखालील लोकांच्या आयुष्यात स्वयंपूर्णतेच्या आर्थिक संधी निर्माण होतील.
 3. देशातील काही प्रदेश असे आहेत जे अद्याप अविकसित राहिले आहेत. असे 110 पेक्षा जास्त आकांक्षी जिल्हे निवडले आहेत ते 110 जिल्हे जे  सरासरीपेक्षा सुद्धा मागासलेले आहेत त्यांना राज्याच्या राष्ट्राच्या सरासरी स्तरावर आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. जेणेकरून सर्वाना चांगले शिक्षण, चांगली आरोग्य सुविधा. तेथील लोकांना रोजगाराच्या स्थानिक संधी उपलब्ध होतील.
 4. आत्मनिर्भर भारताची महत्वपूर्ण प्राथमिकता म्हणजे आत्मनिर्भर कृषी आणि आत्मनिर्भर शेतकरी. कृषीक्षेत्रात अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करता याव्यात, यासाठी गेल्या काही दिवसांपूर्वी, सरकारने  एक लाख कोटी रुपयांचा कृषी पायाभूत निधी निर्माण केला आहे.
 5. गेल्या वर्षी  याच लाल किल्यावरुन मी जलजीवन अभियानाची घोषणा केली होती आज या अभियानाअंतर्गत दररोज एक लाखांपेक्षा जास्त घरांमध्ये नळजोडणी पूर्ण केली जात आहे.
 6. मध्यमवर्गातून तयार झालेले व्यावसायिक आज जगात आपले नाव गाजवीत आहेत, जगात आपली ओळख निर्माण करीत आहेत. म्हणूनच मध्यमवर्गाला सरकारी हस्तक्षेपापासून मुक्ती हवी आहे , त्यांना नवीन संधी हव्या आहेत, खुले मैदान हवे आहे.
 7. देशात पहिल्यांदाच कोणी घरासाठी कर्ज घेतले असले, तर त्या कर्जाची प्रतिपूर्ती करताना सुमारे सहा लाख रुपयांची सूट त्याला मिळण्याची व्यवस्था सरकारने केली.केवळ एका वर्षात अनेक अपूर्ण गृहप्रकल्प पूर्ण करण्यासाठी 25 हजार कोटी रुपये उभारण्यात आले.
 8. आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यात, आधुनिक भारताच्या निर्मितीत, नव्या भारताच्या निर्माणात, समृद्ध आणि सुखी भारताच्या निर्मितीत देशाच्या शिक्षण पद्धतीचे मोठे महत्व आहे. याच विचाराने देशाला तीन दशकानंतर नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण देण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.
 9. या कोरोनाच्या काळात आपण डिजिटल व्यवहारांची महत्वाची भूमिका देखील पहिली.भीम यूपीआयच्या माध्यमातून तीन लाख कोटी रूपयांचे व्यवहार अवघ्या एक महिन्यात झाले आहेत.
 10. 2014 च्या आधी फक्त पाच डझन पंचायती ऑप्टिकल फायबरने जोडण्यात आल्या होत्या. गेल्या पाच वर्षामध्ये 1.5 लाख ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबरने जोडण्याचे काम पूर्ण झाले. देशातील सर्व सहा लाख ग्रामपंचायती येत्या 1000 दिवसात ऑप्टिकल फायबरने जोडल्या जाणार आहेत.
 11. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपला अनुभव असे सांगतो, की भारतामध्ये महिला शक्तीला ज्या ज्या वेळी संधी मिळाली, त्या त्या वेळी त्यांनी देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. देशाला बळकट केले आहे. आज महिला केवळ भूमिगत कोळसा खाणीत काम करत नाहीत , तर लढावू विमानेही उडवत नवनव्या उंची गाठत आहेत.
 12. जी 40 कोटी जनधन खाती उघडण्यात आली, त्यापैकी 22 कोटी बँक खाती ही आमच्या भगिनींची आहेत. कोरोना काळामध्ये जवळपास 30 हजार कोटी रूपये, या माता-भगिनींच्या खात्यांमध्ये जमा करण्यात आले आहेत.
 13. कोरोनाच्या प्रारंभीच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये  चाचणी प्रयोगशाळा कार्यरत नव्हत्या. आज देशभरामध्ये 1400 चाचणी प्रयोगशाळा कार्यरत आहेत.
 14. आरोग्य क्षेत्रामध्ये आजपासून एक भव्य काम सुरू करण्यात येणार आहे. आजपासून नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनम्हणजेच राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानचा प्रारंभ करण्यात येत आहे. नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनआज सुरू होत आहे. प्रत्येक भारतीयाला एक हेल्थ आय.डी. म्हणजे आरोग्य ओळखपत्रदेण्यात येईल. प्रत्येकाने केलेल्या आरोग्य चाचण्या, प्रत्येकाचे आजार, तुम्ही कोणत्या आरोग्य चाचण्या केल्या, डॉक्टरकडून- कोणते औषध घेतले, त्यांनी तुमच्या आजाराचे नेमके काय निदान केले, कधी काय औषध दिले, केलेल्या चाचणीचा अहवाल काय आला, अशी सगळी माहिती त्या एकाच आरोग्य आय.डी.मध्ये आपल्याला मिळू शकणार आहे.
 15. भारतामध्ये एक नाही, दोन नाही, तीन- तीन तीन व्यक्ती, संस्था त्याच्या चाचण्यांच्या वेगवेगळ्या टप्प्यांपर्यंत पोहोचले आहेत. संशोधकांकडून ज्यावेळी हिरवा कंदिल दाखवला जाईल, त्यावेळी कोरोनाच्या लसीचे मोठ्या- व्यापक प्रमाणात निर्मितीचे काम केले जाईल.
 16. हे वर्ष जम्मू काश्मीरच्या विकासाच्या नव्या प्रवासाचे वर्ष आहे. हेव वर्ष जम्मू काश्मीर मधली महिला आणि दलितांच्या अधिकारांचे वर्ष आहे. जम्मू काश्मीरमधील शरणार्थी नागरिकांना प्रतिष्ठेचे जीवन मिळवून देणारे हे वर्ष आहे. जम्मू आणि काश्मीरमधील स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी विकासाच्या नव्या युगाला पुढे नेत आहेत, याचा आपल्या सर्वाना अभिमान वाटायला हवा.
 17. लडाखला केंद्रशासित प्रदेश बनविण्याची अनेक वर्षांपासूनची त्यांची मागणी होती , त्यांची आकांक्षा होती ती आकांक्षा पूर्ण करण्याचे आपण मोठे काम केले आहे. हिमालयाच्या  कुशीत, उंचावर  वसलेले लडाख विकासाच्या नव्या शिखराकडे वाटचाल करत आहे. जशी सिक्कीमने सेंद्रिय राज्य म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे, तसेच लदाखही येत्या काळात कार्बन न्यूट्रल प्रदेश म्हणून  म्हणून ओळख बनवू निर्माण करू शकेल.
 18. देशातल्या १०० निवडक शहरांमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी एकात्मिक दृष्टिकोन सह, सर्वांगीण दृष्टिकोनासह लोकसहभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत प्रदूषण कमी करण्यासाठी मिशन मोड पद्धतीने काम करणार आहोत.
 19. आपल्या जैवविविधतेच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी भारत संवेदनशील आहे. आपण प्रोजेक्ट टायगर, प्रोजेक्ट एलिफंट आपण यशस्वीपणे राबवले आहे. आपल्याकडे वाघांची संख्या वाढली आहे. आगामी काळात आशियाई सिंह प्रकल्पाची सुरुवात होत आहे. या पकल्पाअंतर्गत  भारतीय सिंहांची सुरक्षा , आवश्यक पायाभूत सुविधा, त्यांच्यासाठी आवश्यक विशेष आरोग्य सुविधा यावर काम होणार आहे. त्याचप्रमाणे प्रोजेक्ट डॉल्फिन देखील सुरु केले जाईल.
 20. एलओसी ते एलएसी पर्यंत देशाच्या सार्वभौमत्वाकडे ज्यांनी वाकड्या नजरेने पाहिले त्यांना आपल्या सैन्याने , आपल्या वीर जवानांनी त्याना त्यांच्या भाषेत प्रत्त्युत्तर दिले. भारताच्या सार्वभौमत्वाचे संरक्षण आपल्यासाठी  सर्वोच्च प्राथमिकता आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपले जवान काय करु शकतात, हे संपूर्ण जगाने लदाखमध्ये पहिले आहे.
 21. दक्षिण आशियात  जगातील एक चतुर्थांश लोकसंख्या राहते. आपण सहकार्य आणि संवादाच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या जनतेच्या समृद्धीसाठी अगणित संधी निर्माण करू शकतो.
 22. देशाच्या सुरक्षेत आपल्या सीमा आणि किनारी पायाभूत सुविधांची मोठी भूमिका आहे. आज हिमालयाची शिखरे असोत किंवा हिंदी महासागराची बेटे असोत, प्रत्येक दिशेने कनेक्टिव्हिटी विस्तारावर भर दिला जात आहे,.
 23. आपल्या देशात 1300 हून अधिक बेटे आहेत. त्यांच्या भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता, आणि देशाच्या विकासातील त्यांचे महत्व लक्षात घेऊन, त्या भागात नव्या विकास योजना सुरु करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लक्षद्वीपलाही नंतर आता पुढच्या एक हजार दिवसात लक्षद्वीपलाही वेगवान इंटरनेट सुविधेने जोडण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे.
 24. जे सीमा भाग आहेत, जे किनारी भाग आहेत तिथले सुमारे 173 जिल्हे आहेत, जे कोणत्या ना कोणत्या देशाची सीमा किंवा समुद्र किनाऱ्याला लागून आहेत, येत्या काळात एनसीसीचा विस्तार त्या सीमा भागातल्या युवकांसाठी करण्यात येईल. सीमा भागात आम्ही सुमारे एक लाख नवे एनसीसीचे कॅडेटस तयार करणार आहोत.
 25. आपली धोरणे सर्वोत्कृष्ट, आपल्या प्रक्रिया, आपली  उत्पादने सर्वश्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ मनुष्यबळ, सर्वश्रेष्ठ प्रशासन, प्रत्येक बाबतीत सर्वश्रेष्ठ बनण्याचे लक्ष्य ठेवले आहे, यातूनच आपण एक भारत श्रेष्ठ भारत चे स्वप्न साकारू शकू.
 26. आपल्या जीवनमान सुखकर करण्याचा धोरणाचा सर्वाधिक लाभ आपल्या मध्यमवर्गाला मिळणार आहे. स्वतः इंटरनेट सुविधेपासून ते स्वस्त विमान तिकीट, महामार्ग ते इ वे, आणि परवडणारी घरे ते करात सवलत- सर्व उपाययोजना देशाच्या मध्यमवर्गाला सशक्त करण्यासाठी केल्या जात आहेत.

<><><><><><>

M.Jaitly/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1646175) Visitor Counter : 159