अंतराळ विभाग
विकासाच्या कार्यात इस्रो स्वतःची भूमिका ठळक करत आहे : जितेंद्र सिंह
Posted On:
11 AUG 2020 8:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2020
केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग (स्वतंत्र कार्यभार) ईशान्य प्रदेश विकास मंत्रालय, MOS पंतप्रधान कार्यालय, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, आण्विक उर्जा आणि अंतराळ यांनी सांगितले कि मोदी सरकारच्या कार्यातील एक उल्लेखनीय बाब म्हणजे गेल्या सहा वर्षात भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो फक्त उपग्रह प्रक्षेपणापुरतीच मर्यादित न रहाता विकासाच्या इतर कार्यात आपला सहभाग ठळक करत चालली आहे. आणि याद्वारे इस्रो पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘ट्रान्सफॉर्मिंग इंडिया’ या मोहिमेत आपला सहभाग नोंदवत आहे.
शेतीची परिस्थिती आणि कृषी क्षेत्रातील वाढती उत्पादक क्षमता याबद्दल बोलताना ते म्हणाले, जुलै 2019 आणि जुलै 2020 या वर्षांतील पिकांची तुलना रिमोट सेन्सिंग उपग्रहामुळे शक्य झाली आहे. पिकांचे वैविध्य याशिवाय त्यांची चांगली वाढ हे चांगल्या शेतीचे निदर्शक आहेत. या आघाडीवर गेल्या वर्षीच्या जुलै पेक्षा यावर्षी सुधारणा दिसून आली.

चार वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने एक चर्चासत्र दिल्लीत भरवण्यात आले होते. यामध्ये वेगवेगळी खाती तसेच विभागातील प्रतिनिधींनी इस्रोच्या वैमानिकांसोबत प्रदीर्घ, सखोल चर्चा केली. अंतराळ विज्ञान हे इतर मूलभूत विकासाला सहाय्यभूत आणि चालना देणारे कसे ठरेल यादृष्टीने हे चर्चासत्र होते असे जितेंद्र सिंग यांनी सांगितले. त्या अनुषंगाने आता अंतराळ विज्ञान हे विविध क्षेत्रात वापरण्यात येत आहे. यामध्ये कृषी, रेल्वे, रस्ते, पुल, वैद्यकीय व्यवस्थापन/टेलीमेडिसीन, आपत्ती अंदाज आणि व्यवस्थापन, हवामान, पाऊस किंवा पूर यांचा अंदाज या क्षेत्रांचा समावेश आहे.
कृषी क्षेत्राचा उल्लेख करताना जितेंद्र सिंग यांनी माहिती दिली की, इस्रोच्या तंत्रज्ञानामुळे आता किमान महत्त्वाच्या पिकांबाबत कृषी उत्पादनाचा अंदाज देता येतो. ही पिके म्हणजे गहू, खरीप आणि रब्बी भात, मोहोरी, ज्यूट, कपास, ऊस, रब्बी ज्वारी आणि रब्बी कडधान्ये.
रेल्वेसंबंधी उदाहरण देताना जितेंद्रसिंह यांनी गेल्या काही वर्षात अंतराळ तंत्रज्ञानाचा उपयोग करून निर्मनुष्य रेल्वे क्रॉसिंगच्या जवळ अडथळा आणणाऱ्या वस्तू रेल्वे रूळावर असल्यास त्या ओळखण्याच्या आणि त्याद्वारे रेल्वेचे अपघात टाळण्याच्या तंत्रज्ञानाचा उल्लेख केला. याशिवाय भारतीय सीमांचे रक्षण आणि त्यातून होणारी घुसखोरी टाळण्यासाठीही या तंत्रज्ञानाचा उपयोग होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इस्रो आणि अंतराळ खाते यांनी याअगोदरच आपल्या अंतराळ मोहिमेत अनेक देशांना समाविष्ट करून घेतले आहे. मास ऑर्बिटर मिशन (MOM) सारख्या अनेक मोहिमांतून मिळालेली छायाचित्रे महत्वाच्या अंतराळ संशोधन केंद्रात वापरली जातात. मूलभूत विकास आणि सार्वजनिक हिताचे प्रकल्प यामध्येही अंतराळ विज्ञानाच्या सहाय्याने भारत आघाडीवर आहे, असे त्यांनी सांगितले . याबाबतीत अन्य देशांनीही भारताचा कित्ता गिरवायला सुरुवात केली असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतात वेगाने जगातील एक महत्त्वाचा देश म्हणून उदयाला येत आहे आणि ह्या प्रवासात भारताचे अंतराळ तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक वारसा महत्त्वाची भूमिका बजावत आहे असे ते म्हणाले.
* * *
M.Jaitly/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1645176)